प्रयाग : येथे जानेवारी २०१९ मध्ये कुंभपर्वास प्रारंभ होणार आहे. यात आयोजित करण्यात येणार्या साधू आणि संत यांच्या सर्वांत मोठ्या धर्मसंसदेमध्ये धर्मांतराविषयीच्या सूत्रावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच धर्मांतर होऊ नये, यासाठी रणनीती ठरवण्यात येणार आहे. या धर्मसंसदेमध्ये २ सहस्रांहून अधिक साधू, संत आणि धर्माचार्य सहभागी होणार आहेत.
१. यापूर्वी याच वर्षीच्या जून मासामध्ये गौहत्ती येथील श्री कामाख्यादेवी मंदिराजळील अम्बूबाची मेळ्यामध्ये सर्व १३ आखाड्यांचे साधू आणि संत एकत्रित आले होते. त्यांनी सनातन धर्म वाचवणे आणि परंपरांना पुढे नेणे यांवर चर्चा केली होती. या वेळी धर्मांतर ही सनातन धर्मासमोर मोठी समस्या आहे. यावर प्रयाग कुंभपर्वातील धर्मसंसदेत चर्चा करण्याचे ठरवण्यात आले होते.
२. ईशान्य राज्यांतील आसाम, नागालॅण्ड आणि त्रिपुरा येथे धर्मांतराची समस्या पुष्कळ मोठी आहे. हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आखाडा परिषदेने साधू आणि संत यांना ईशान्य भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
३. प्रयाग येथील कुंभपर्वात प्रत्येक गावातील ४ भाविकांनी दर्शनासाठी जावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात