हिंदु जनजागृती समितीच्या मागणीला पाठिंबा देत शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, अजय चौधरी, सदानंद चव्हाण आणि भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई : विज्ञापने, नाटक, चित्रपट, चित्रप्रदर्शन, पुस्तके, व्यासपीठ, यू-ट्यूब, सामाजिक संकेतस्थळे, वृत्तपत्रे आणि अन्य माध्यमांतून हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे उघडपणे विडंबन आणि विटंबना केली जात आहे. हे रोखण्यासाठी भारतीय दंड विधेयक २९५ आणि २९५ (अ) हे कायदे कारवाई करण्यास पुष्कळ अपुरे पडत आहेत. यावर कठोर कायदा करण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. या मागणीला शिवसेनेचे आमदार सर्वश्री सुनील राऊत, अजय चौधरी, सदानंद चव्हाण आणि भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. यासाठी ३१ जुलै या दिवशी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन ‘देवतांचा अवमान रोखण्यासाठी तत्परतेने नवीन कायदा करावा’, अशी मागणी या लोकप्रतिनिधींनी केली आहे. यापूर्वी शिवसेनेचे आमदार सर्वश्री भरतशेठ गोगावले, बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगुले, सुरेश गोरे, शशिकांत खेडेकर, रूपेश म्हात्रे, मनोहरशेठ भोईर, राजेश क्षीरसागर यांनी या विषयासाठीच मुख्यमंत्र्यांना यापूर्वीच पत्र दिले आहे. (या लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीची नोंद शासन घेणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,
१. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला धार्मिक आचार-विचार यांचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचे रक्षण करणे, हे शासनाचे संविधानिक दायित्व आहे.
२. भारतीय समाज हा श्रद्धावान असून भक्तीभावाने देवी, देवता आणि आपली श्रद्धास्थाने यांची पूजा करतो. तो धार्मिक आणि भावनिकदृष्ट्या पुष्कळ संवेदनशील असतो; मात्र आज काही गल्लाभरू, जातीयवादी, देशद्रोही, तथाकथित पुरोगामी लोक हे विचार, कला, आविष्कार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदींच्या नावाखाली अतिरेक अन् स्वैराचार करून जाणीवपूर्वक लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम करत आहेत. त्यातून समाजात कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होत आहेत. पुढे हिंसक प्रकार, हत्या, दंगली घडण्यापर्यंत वातावरण दूषित होते.
३. यापूर्वी ‘फेसबूक’वर माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, प्रभु श्रीराम, श्री हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज यांची अत्यंत आक्षेपार्ह आणि विडंबनात्मक चित्रे प्रसारित करून हिंदूंच्या भावना भडकावण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते.
४. लोकांनी थुंकू नये, कचरा टाकू नये आणि लघुशंका करू नये, यासाठी राज्यभरात जागोजागी भिंतींवर देवतांची चित्रे असलेल्या फरश्या बसवल्या जातात.
५. त्यामुळे शासनाने तातडीने कठोर आणि सक्षम कायदा करण्याची आवश्यकता आहे. असा नवा कायदा शासनाने येत्या ३ मासांत करावा.
६. पोलीस खाते त्यांच्या स्तरावर काही वेळा परिपत्रके काढून अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करते; मात्र ते पुरेसे नसून सक्षम नवीन कायदा होईपर्यंत संपूर्ण राज्यस्तरावर कायमस्वरूपी मार्गदर्शक आणि परिपूर्ण असे परिपत्रक आपण निगर्मित करावे.
श्रद्धास्थानांच्या अवमानाविषयी कारवाई करण्यास विद्यमान कायदे अपुरे ! – हिंदु जनजागृती समिती
देवता आणि श्रद्धास्थाने यांचे विडंबन रोखण्यासाठी समितीने याविषयी अनेक वेळा सरकारला निवेदने दिली आहेत. यासाठी आंदोलने केली आहेत, तसेच विधीमंडळात अनेक वर्षे मागणी करूनही अद्याप शासनाने यासाठी कायदा केलेला नाही. आता इतक्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीवरून तरी सरकार याविषयी कायदा करणार का, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. विद्यमान कायद्यानुसार दोषींवर कायदेशीर कारवाई करायची असेल, तर राज्यशासनाची अनुमती लागते. शासनाला वाटले की, धार्मिक भावना दुखावल्या आहेत किंवा कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाला आहे, तरच दोषींवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे गुन्हेगारांना अभय मिळते. परिणामी बहुतांशप्रसंगी देवतांच्या विटंबनेविषयी कायदेशीर कारवाई करण्यात फार मर्यादा येतात. हे आम्ही मागील अनेक वर्षे अनुभवत आहोत.
२. केरळ येथील डाव्या विचारसरणीच्या प्रा. दुर्गा मालती यांनी स्वत:च्या फेसबूक खात्यावर कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान शिव, त्रिशूल आणि अन्य श्रद्धास्थाने यांना पुरुषाच्या लिंगाच्या स्वरूपात रेखाटून कोट्यवधी लोकांपर्यंत प्रसारित केले. ‘ओ माय गॉड’, ‘पीके’, ‘बहन होगी तेरी’, ‘पद्मावत’ आदी चित्रपटांनंतर आता ‘३ देव अंडरकव्हर भगवान’ या हिंदी चित्रपटात ब्रह्मा, विष्णु आणि महेश या देवतांना आधुनिक अभिनेत्यांच्या ठिकाणी दाखवण्यात आले आहे. या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलन झाली, तक्रारी नोंदवण्यात आल्या; मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.
३. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने विविध माध्यमांतून हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात