हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनावर कार्यवाही व्हावी, यासाठी शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांची वनमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
सरकारकडे अशी मागणी करावी लागणे अपेक्षित नाही, तर सरकारने आयुर्वेदाचे महत्त्व जाणून स्वतःहून आयुर्वेदाचे जतन आणि संवर्धन करणे अपेक्षित आहे !
मुंबई : तुळस ही अन्य कोणत्याही वृक्ष-वनस्पती यांच्या तुलनेत सर्वाधिक प्रमाणात प्राणवायू (ऑक्सिजन) बाहेर सोडणारी आणि हवेतील कार्बन डाय ऑक्साईड शोषून वातावरण शुद्ध करणारी वनस्पती आहे. तुळस आणि अन्य आयुर्वेदीय वनस्पतींमुळे विविध प्रकारचे रोग-विकार बरे होतात. अशी तुळशीची आणि त्यासमवेत अन्य आयुर्वेदीय वनस्पती यांची राज्यभरात सर्वत्र लागवड करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी ३१ जुलै या दिवशी एका पत्राद्वारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार गोगावले यांना हिंदु जनजागृती समितीने निवेदन दिले होते. हिंदु जनजागृती समितीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना या संदर्भात वेगळे निवेदनही दिले आहे.
‘याविषयी मला हिंदु जनजागृती समितीकडून कडून निवेदन प्राप्त झाले असून याकडे शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालावे. तुळस आणि अन्य आयुर्वेदीक वृक्ष यांच्या लागवडीमुळे पर्यावरण अन् आरोग्य यांचा स्तर उंचावेल, असे माझ्यासह अनेकांना वाटते’, असे या संदर्भात आमदार भरतशेठ गोगावले यांनी शासनाकडे केलेल्या मागणीमध्ये नमूद केले आहे.
या पत्रामध्ये आमदार गोगावले यांनी म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्र शासनाने वृक्ष लागवडीचे मोठे अभियान हाती घेतलेले आहे; मात्र सध्या वृक्ष लागवडीच्या राज्यस्तरीय अभियानाच्या अंतर्गत, तसेच शासनाच्या आणि अन्य रोपवाटिका यांमध्ये तुळशीची आणि अन्य आयुर्वेदीय रोपे लावण्याची सूचना/नियम शासन निर्णयात अंतर्भूत नाही. तुळस आणि आयुर्वेदीय वनस्पती यांचे महत्त्व लक्षात घेता शासनाने संबंधित शासन निर्णयात/सूचनेत सुधारणा करून अन्य वृक्षांसमवेत तुळस आणि अन्य आयुर्वेदीय रोपे लावण्याची महत्त्वपूर्ण सूचना त्यात अंतर्भूत करावी. त्यासाठी कृती कार्यक्रम राज्यभर राबवावा.
स्वयंसेवी, सामाजिक आणि आध्यात्मिक संस्था, वारकरी संप्रदाय आदींचे सहकार्य घेऊन राज्यभरात तुळशीची रोपे लावण्याचा व्यापक कृती कार्यक्रम शासनाने राबवावा ! – हिंदु जनजागृती समिती
वाढते प्रदूषण रोखून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, तसेच महाराष्ट्रातील भूमी हरित करण्यासाठी शासनाने वृक्ष लागवडीचे चालवलेले अभियान स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे. तुळशीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे ती विविध प्रकारच्या रोगांपासून मुक्ती देणारी आयुर्वेदीय गुणकारी वनस्पती आहे. त्यामुळे पुरातन काळापासून प्रत्येकाच्या दारापुढे तुळस लावण्याची परंपरा आहे. पूर्वीच्या काळी सर्वत्र तुळशीची वृंदावने असायची. सध्या वाहनांमुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण होत आहे. काही शहरांमध्ये तर वायूप्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. अशा वेळी रस्त्याच्या मध्यभागी असणार्या दुभाजकाच्या मोकळ्या जागेत आणि रस्त्याच्या कडेला तुळशीची रोपे लावण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात याव्यात, तसेच स्वयंसेवी, सामाजिक आणि आध्यात्मिक संस्था, वारकरी संप्रदाय आदींचे सहकार्य घेऊन राज्यभरात तुळशीची रोपे लावण्याचा व्यापक कृती कार्यक्रम शासनाने राबवावा, असेही हिंदु जनजागृती समितीने आमदार भरतशेठ गोगावले आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.