हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील होण्याचा धर्माभिमान्यांचा निर्धार !
केडगाव (जिल्हा पुणे) : २९ जुलै या दिवशी येथील श्री बोरमलनाथ मंदिराच्या सभागृहात ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ पार पडली. रामनाथी, गोवा येथे जूनमध्ये झालेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातून प्रेरणा घेऊन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच’चे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी हे आयोजन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीकडून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि समितीचे श्री. दीपक आगावणे यांनी ‘हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना’ यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर समितीचे श्री. हेमंत मणेरीकर आणि श्री. सम्राट देशपांडे यांनी ‘साधना आणि स्वभावदोष-अहंनिर्मूलन प्रक्रिया’ यांवर मार्गदर्शन केले. त्यांनी गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व सांगितले. या सत्रात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. काही धर्माभिमान्यांनी स्वतःहून ‘दिवसभरात होणार्या चुका टाळण्यासाठी कसे प्रयत्न करणार’, हे सांगितले.
या वेळी सर्व उपस्थित धर्माभिमान्यांनी हिंदु धर्मासाठी प्रतिदिन किमान १ घंटा देणार अशी प्रतिज्ञा केली.
डॉ. नीलेश लोणकर, आयोजक : मी गेली १८ वर्षे कार्य करीत आहे; पण गोव्यातील ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त सहभागी होण्याचे मला भाग्य लाभले. यातून मिळालेल्या प्रेरणा आणि मार्गदर्शन यांमुळे या कार्यशाळेचे आयोजन करू शकलो. हिंदु जनजागृती समितीमुळे पुष्कळ काही शिकायला मिळाले. साधकांकडून साधना आणि धर्मसेवा यांची तळमळ शिकायला मिळाली. माझ्याकडून जे काही कार्य होत आहे, ते ईश्वरी कृपेमुळेच घडत आहे. या आयोजनात काही चुका झाल्या असल्यास मी सर्वांची क्षमा मागतो आणि यापुढे समितीचे उपक्रम गावागावांमध्ये राबवून या कार्यात सतत सहभागी राहीन.
धर्माभिमान्यांनी व्यक्त केलेले मनोगत
धर्मकार्यापासून वंचित राहिल्याची खंत वाटणारे श्री. महादेव टकले : श्री. महादेव टकले म्हणाले, ‘‘मी समितीच्या कार्यात सहभागी होतो; पण नंतर काही कारणास्तव कार्यापासून दूर झालो. धर्मकार्यापासून वंचित राहिलो. याची आज मला जाणीव होऊन खंत वाटत आहे. यासाठी मी सर्वांची क्षमा मागतो. या कार्यशाळेतून मला पुष्कळ प्रेरणा मिळाली असून मी चांगला संघटक होऊन सतत देशकार्य करत राहीन.’’
श्री. परमेश्वर संघशेट्टी : मला धर्मकार्य तर करायचे होते; पण नेमके काय करायचे हे ठाऊक नव्हते. आज मला या कार्यशाळेच्या माध्यमातून धर्मकार्याची दिशा मिळाली. हिंदु राष्ट्राचे ध्येय घेऊन मी अधिकाधिक वेळ धर्मकार्यासाठी देईन.
श्री. अनिरुद्ध शेळके : आपण जसे या कार्यशाळेत हिंदु राष्ट्र संघटक म्हणून सिद्ध झालो, तसेच आपण प्रत्येकाने आणखी १० संघटक सिद्ध करून या १० संघटकांकडून अजून १० संघटक सिद्ध करायचे आणि धर्माचा प्रसार करायचा.
श्री. प्रकाश देशमुख : या कार्यशाळेमुळे मला साधनेची शक्ती आणि महत्त्व कळले. मी सतत साधनेचे प्रयत्न करत हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अधिकाधिक वेळ देईन. श्री. कैलास (आबा) शेलार, विश्वस्त, श्री बोरमलनाथ मंदिर : असे कार्यक्रम नेहमीच आमच्या भागात व्हावेत आणि यासाठी मी सहकार्य करीन. मंदिराचे सभागृह नेहमी उपलब्ध करून देईन. तुम्ही मला सेवेची संधी द्यावी. मी नेहमीच वाट पहात राहीन.