नाशिक : अनैतिक संबंधांतून रॉकेल ओतल्याने गंभीर भाजलेली कथित प्रेयसी संगीता देवरेचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, प्रेयसीची मुलगी प्रीती शेंडगेची प्रकृती गंभीर असून संशयित जलालुद्दीन खान यास अलीगढ येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता देवरे या महिलेचे संशयित जलालुद्दीन खानशी कथित प्रेमससंबध होते. सोमवारी सायंकाळी कालिकानगर फुलेनगर येथे संगीताने १ तारखेला भाडे करारावर खोली घेतली होती. आईला भेटण्यास विवाहीत मुलगी प्रिती शेंडगे तिची ९ महिन्यांची मुलगी सिद्धीवासोबत आली होती. संशयित जलालुद्दीन आणि संगीतात यादरम्यान वाद झाले. पहाटे तिघी जणी गाढ झोपेत असतांना संशयिताने त्यांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात चिमुकल्या सिद्धीचा लागलीच मृत्यू झाला होता. संगीता आणि प्रिती यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगीता देवरेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर प्रितीची प्रकृती गंभीर आहे.
घरात आग लागल्याची चर्चा
पंचवटी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, वाल्मीक शार्दूल यांनी घटनास्थळी धाव घेत शेजारील नागरिकांकडून माहिती घेतली. एक जण घरातून पळून जाताना पाहिल्याचे शेजारच्या नागरिकांनी सांगितले. रुग्णालयात गंभीर भाजलेल्या संगीता देवरे हिचाही जबाब घेतला असता तिने जलालुद्दीन याने आपल्याला पेटवून दिल्याचा जबाब दिला. प्रथमदर्शनी घरात आग लागल्याची चर्चा सुरू होती. मात्र, पोलिसांनी तत्परता दर्शवत घातपात असल्याचे निष्पन्न केले.
विवाहित जलालुद्दीन यूपीचा रहिवासी
संशयित जलालुद्दीन हा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. त्याला पत्नी, मुले, नातू असा परिवार आहे. कामानिमित्त तो नाशिकमध्ये आला होता. पाच वर्षांपूर्वी संगीता देवरे हिच्या पतीचे निधन झाले. तेव्हापासून दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण होते. संगीताला दोन मुले आहेत. एक मुलगा मावशीकडे तर दुसरा मुलगा सासुरवाडीला राहतो. मुलीने प्रेमविवाह केला आहे. या दोघांच्या अनैतिक संबंधांनी दुर्दैवी सिद्धीचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, जलालुद्दीन याला पोलिसांनी इटारसी येथून ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
संदर्भ : दिव्य मराठी