राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे केला जाणारा अवमान रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांनी काटेकोरपणे उपाययोजना राबवावी ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती
पोलीस आणि प्रशासन यांना असे प्रत्येक वर्षी का सांगावे लागते ? पोलीस किंवा प्रशासन राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी ठोस उपाययोजना स्वत:हून का करत नाहीत ?
चिपळूण : राष्ट्रध्वज ही राष्ट्रीय अस्मिता आहे; मात्र १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवलेे जातात. हेच प्लास्टिक आणि कागदाचे छोटे राष्ट्रध्वज मात्र दुसर्या दिवसापासून रस्त्यांवर, कचर्यात, गटारांत पडलेले आढळतात. राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याविषयीची सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले आहेत. याविषयी चिपळूणचे नायब तहसीलदार आणि पोलीस यांना अवगत करण्यात आले आहे, तसेच याविषयासंबंधी निवेदन पत्र या वेळी देण्यात आले. या वेळी हरि ॐ सतनाम वारकरी सांप्रदायचे ह.भ.प. बारकू बबन जावळे, राजे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. विशाल राऊत, श्री. प्रशांत पोतदार, श्री. प्रथमेश शिंदे, श्री. अभय विठ्ठळ जुवळे, कालुस्ते येथील सरपंच श्री रामकृष्ण कदम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे, डॉ. हेमंत चाळके आणि सनातन संस्थेचे श्री. केशव अष्टेकर उपस्थित होते.
राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबवणार ! – निवासी नायब तहसीलदार टी.एस्. शेजाळ
आम्ही पत्राद्वारे शाळा – महाविद्यालयांना, तसेच व्यापारी वर्गाला याविषयी अवगत करू आणि राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे होणारा अवमान रोखण्यासाठी प्रशासनाकडून काटेकोर उपाययोजना राबवू !
हिंदु जनजागृती समिती चिकाटीने आणि सातत्यपूर्ण राष्ट्रध्वज अवमान रोखण्यासाठीची मोहीम राबवते, हे खरोखर स्तुत्य आहे ! – व्ही.एस्. आंबेरकर, पोलीस हवालदार
गेली काही वर्षे हिंदु जनजागृती समिती अनेक प्रकारे चांगले कार्य करत आहे. यातील राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठीची ही मोहीम अतिशय आवश्यक उपक्रम आहे. समाजाला दिशा देण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन अशी कामे करावी लागतात, हिंदु जनजागृती समिती चिकाटीने आणि सातत्यापूर्ण राष्ट्रध्वज अवमान रोखण्यासाठीची ही मोहीम राबवते, हे खरोखर स्तुत्य आहे. पोलिसांचे तुम्हाला याविषयी सहकार्य राहील.