Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरा’चे आयोजन

आदर्श गणेशोत्सव साजरा करून श्री गणरायाची कृपा संपादन करण्याचा जळगाव येथील मंडळांचा निर्धार !

व्यासपिठावर उपस्थित डावीकडून ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज, श्री. दत्तात्रेय वाघुळदे, सौ. क्षिप्रा जुवेकर

जळगाव : सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक दृष्टीने उत्सव आदर्श पद्धतीने साजरे करण्यासाठी उत्सवांतील अपप्रकार रोखू, तसेच राष्ट्र-धर्मजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करू आणि आदर्श गणेशोत्सव साजरा करून श्री गणरायाची कृपा संपादन करू, असा निर्धार येथील मंडळांनी केला आहे. येथे ५ ऑगस्टला झालेल्या ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरात हा निर्धार करण्यात आला.

शिबिरास शहरातील भागवतकार ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज, सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर, श्री. प्रशांत जुवेकर यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराला विविध गणेशोत्सव मंडळांचे ४० पदाधिकारी अन् कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिराचा आरंभ शंखनाद आणि दीपप्रज्वलन यांनी झाला. सूत्रसंचालन कु. अदिती जाधव हिने केले. या वेळी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ याविषयीची सनातन संस्थेची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.

मान्यवरांचे मार्गदर्शन गणेशोत्सव केवळ १० दिवसांचा नसून तो आयुष्याचा उत्सव आहे !- ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज, नवरात्र मित्र मंडळ, जळगाव

गणेशोत्सव केवळ १० दिवसांचा नसून तो आयुष्याचा आहे. गणेशोत्सवानंतर वर्षभर आपण धर्मासाठी काहीतरी कृती केली, तरच गणेशोत्सव साजरा करण्यात अर्थ आहे. समाजाला धर्माची जाणीवच राहिलेली नाही. धर्म समजलाच नाही. धर्म आम्हाला जगवतो, शिकवतो आणि सांभाळतो; म्हणून प्रत्येकाने धर्माचरण करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव मंडळांनी होणार्‍या व्ययाविषयी पारदर्शकता ठेवावी. आरतीची वेळ सर्वच गणेशोत्सव मंडळांनी एक ठेवावी आणि वेळेतच आरती करावी.

आदर्श गणेशोत्सव साजरा करूया ! – दत्तात्रेय वाघुळदे, सनातन संस्था

गणपति ही बुद्धी, प्राणशक्ती देणारी, विघ्नांचे हरण करणारी देवता आहे. मंडपात आपले आचरण मंदिराप्रमाणे असायला हवे. गणेशोत्सव काळात चित्रपटाची गाणी लावणे, मंडपात जुगार खेळणे, मद्य प्राशन करून आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढणे यांसारख्या अपप्रकारांना आळा घालून आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करूया.

लोकमान्य टिळकांनी आरंभिलेल्या गणेशोत्सवाच्या उद्देशाने वाटचाल करावी ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, हिंदु रणरागिणी शाखा

गणेशोत्सवाचा लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला उद्देश समोर ठेवून मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. आपापसातील वाद बाजूला सारून संघटितपणे उत्सव साजरा करूया.

गणेशोत्सवात मंडळांनी राष्ट्र-धर्म जागृतीपर उपक्रम राबवून नवा आदर्श निर्माण करावा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

काही मंडळांकडून गणेशोत्सवाला ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चे रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात मनोरंजनात्मक कार्यक्रम, पाश्‍चात्त्य विचारांचे आक्रमण होत आहे. अन्य धर्मियांपेक्षाही अज्ञानापोटी हिंदु धर्मियांकडूनच देव-देवतांची विटंबना होतांना दिसते. वर्गणी ही ‘खंडणी’ मागितल्याप्रमाणे गोळा करणे, ध्वनीक्षेपक यंत्रणेवरून चित्रपटातील अश्‍लील गाणी लावून मंडपासमोर हिडीस अंगविक्षेप करणे, नृत्य स्पर्धांचे आयोजन करणे, आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत मद्यपान करून नाचणे यांसारख्या अपप्रकारांचे सण-उत्सवांत प्रमाण वाढले आहे. यामुळे श्री गणेशाची कृपा संपादन करण्यापेक्षा आपण अवकृपाच करून घेतो.

श्री गणेशाची कृपा संपादित करावयाची असेल, तर गणेशोत्सवकाळात ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ किंवा ‘श्री गणेशाय नम: ।’ असा किमान एक घंटा सामूहिक नामजप करावा. ध्वनीक्षेपक यंत्रणेवरून पोवाडे, राष्ट्रीय विषयावरील कीर्तने, भजने लावावीत. गोरक्षण, स्वदेशी या विषयांसह क्रांतीकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लावणे, ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’, ‘भारताचा गौरवशाली इतिहास’ यांसारख्या विषयांवर व्याख्यान आयोजित करणे यांसारखे उपक्रम राबवून नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण करावा.

शिबिरानंतर कृतीशील होणार्‍या मंडळांचे अभिनंदन !

‘सार्वजनिक उत्सव आदर्श होण्यासाठी मी काय करणार ?’ या विषयावरील आयोजित गटचर्चेत मंडळांनी केलेला निर्धार

१. चित्रपट गीतांऐवजी श्री गणेशाचा नामजप आणि स्तोत्र लावू.

२. नृत्याच्या स्पर्धांऐवजी राष्ट्र-धर्म जागृतीपर, तसेच ‘श्री गणपति अर्थर्वशीर्ष पठण’, ‘हनुमान चालिसा पठण’ यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करू.

३. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करू.

मंडळांचा कृतीशील प्रतिसाद

मंडळांनी व्याख्यान, प्रथमोपचार, स्वरक्षण प्रशिक्षण यांची मागणी केली, तर काहींनी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ या ध्वनीचित्र-चकतीद्वारे त्यांच्या गावात जनजागृती करणार असल्याचे सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *