बकरी ईदच्या पूर्वी गोवा मांस प्रकल्प पूर्णत्वाने कार्यान्वित करण्याची घोषणा करणारे मंत्री गुदिन्हो यांचा निषेध !
फोंडा : सरकारने मुसलमान बांधवांना ‘कुराणा’तील कुर्बानीचे नियम सांगून ‘इको फ्रेंडली बकरी ईद’ साजरी करण्याविषयी प्रबोधन करावे. तसेच प्रशासनाने सतर्क राहून गोहत्या होणार नाही, यासाठी ठिकठिकाणी टेहळणीसाठी पोलीस पथके सिद्ध ठेवावीत आणि ‘बकरी ईद’च्या निमित्ताने होणारी गोवंशियांची हत्या रोखावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोव्याचे समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी केली. ११ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी येथील जुन्या बसस्थानकात विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी श्री. नाईक बोलत होते. आंदोलनाला शिवसेनेचे माजी गोवा राज्य प्रमुख श्री. रमेश नाईक, राष्ट्रीय हिंदू संघाचे महासचिव श्री. मधुसूदन देसाई आणि रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. सत्यविजय नाईक पुढे म्हणाले,
१. ‘‘२२ ऑगस्टला असणार्या ‘बकरी ईद’च्या दिवशी ‘कुर्बानी’ देण्यासाठी अडचण येऊ नये; यासाठी बकरी ईदच्या पूर्वी गोवा मांस प्रकल्प पूर्णत्वाने कार्यान्वित करण्याची घोषणा राज्याचे पशूसंवर्धनमंत्री माविन गुदिन्हो यांनी केली आहे. गोवंशियांच्या हत्येमुळे हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या जात आहेत. यास्तव समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पशूसंवर्धनमंत्री गुदिन्हो यांचा निषेध !
२. पारतंत्र्यातील कुठल्याही राष्ट्राला स्वातंत्र्य मिळताच राष्ट्रातील पारतंत्र्याच्या खुणा उखडून फेकून देणे, हे राष्ट्रहिताचे असते; मात्र काही मोजके अपवाद वगळता कोणत्याच शासनकर्त्यांनी याकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. आता मुंबईचा मानबिंदू असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’चे परकीय आक्रमकांनी दिलेले नाव पालटून त्याचे नामकरण ‘भारत द्वार’ करावे.
३. आसामसह देशभरातील केवळ बांगलादेशीच नाही, तर पाकिस्तानी आणि रोहिंग्या घुसखोर मुसलमानांनाही बाहेर काढावे.’’
भारतात होणार्या घुसखोरीचे कारण पंतप्रधानांनी सांगावे ! – मधुसूदन देसाई, महासचिव, राष्ट्रीय हिंदू संघ
राष्ट्रीय हिंदू संघाचे महासचिव श्री. मधुसूदन देसाई या वेळी म्हणाले की, देशाचे पंतप्रधान जगभरातील अनेक देशांत जाऊन येतात. तेथे घुसखोरीची समस्या आहे का ? तेथे ही समस्या नसेल, तर भारतात ती कोणत्या कारणामुळे होते, हे त्यांनी सांगावे.
‘लवरात्री’ चित्रपटाचे नाव पालटण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा ! – सौ. राजश्री गडेकर, रणरागिणी
सौ. राजश्री गडेकर या वेळी म्हणाल्या, ‘‘यंदा १० ऑक्टोबर या दिवशी नवरात्र उत्सवाला आरंभ होत असून त्याच्या ५ दिवस आधी म्हणजेच ५ ऑक्टोबर या दिवशी सलमान खानची निर्मिती असलेला ‘लवरात्री’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘लवरात्री’ चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये एक सहअभिनेता मुख्य अभिनेत्याला उद्देशून ‘तिला पटवण्यासाठी तुझ्याकडे ९ दिवस आणि ९ रात्रीच आहेत’, असे म्हणतो. हिंदूंच्या धार्मिक उत्सवांचा वापर प्रेमप्रकरणे दाखवण्यासाठी करणे, म्हणजे एक चुकीचा संदेश समाजाला देण्यासारखे आहे. या चित्रपटाचे ‘लवरात्री’ हे नाव हिंदूंच्या ‘नवरात्री’ या उत्सवाचा अवमान करणारे आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यातील कथा आणि हिंदूंच्या सणांशी निगडीत काही चुकीचे प्रसंग दाखवले गेले असल्यास त्याची खात्री करून सरकारने योग्यअयोग्य ठरवावे; मात्र शासनाने चित्रपत्र परिनिरीक्षण मंडळाला या चित्रपटाचे नाव पालटण्यासाठी त्वरित कळवावे.’’
आंदोलनाच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला. या आंदोलनाला शिवयोद्धा, गोमंतक हिंदू प्रतिष्ठान, गोमंतक मंदिर आणि धार्मिक महासंघ, मराठी राजभाषा समिती अन् सनातन संस्था या संघटनांचे कार्यकर्ते, तसेच धर्म आणि राष्ट्र प्रेमी नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. शैलेश बेहरे यांनी, तर समितीचे श्री. जयेश थळी यांनी शेवटी ठराव मांडले.
पत्रकारांना कह्यात घेतलेले बॉम्ब न दाखवता पोलिसांनी केवळ माहिती दिली असल्याने वैभव राऊत यांच्यावरील पोलिसांची कारवाई संशयास्पद ! – रमेश नाईक, शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख
नालासोपारा येथून गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना आतंकवादविरोधी पथकाने कह्यात घेतल्यावर त्यांच्याकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य असल्याचे सांगितले; मात्र पथकाने कह्यात घेतलेले बॉम्ब न दाखवता केवळ पिशव्या दाखवल्या आहेत. पिशव्यांमधील साहित्य दाखवले असते, तर संशयास जागा रहिली नसती. यावरून आतंकवादविरोधी पथकाची कारवाई संशयास्पद असल्याचे लक्षात येते.
क्षणचित्र :‘फेसबूक लाइव्ह’च्या माध्यमातून आंदोलनाचा विषय २५ सहस्र जणांपर्यंत पोहोचला.