मुंबई : हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची आज देशाला आवश्यकता आहे. समितीचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार मुंबई महानगरपालिकेचे महापौर श्री. विश्वनाथ महाडेश्वर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी काढले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजांचा इतरत्र भूमीवर पडून होत असलेला अवमान रोखण्याच्या दृष्टीने समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या मोहिमेच्या अंतर्गत समितीचे कार्यकर्ते श्री. सतीश सोनार यांनी ९ ऑगस्ट या दिवशी शिवाजी पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये उद्घोषणा करण्यात यावी, यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी वरील गौरवोद्गार काढले. ‘याविषयी निश्चित कार्यवाही करू’, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
या वेळी श्री. महाडेश्वर म्हणाले, ‘‘देशात समान नागरी कायदा झाला पाहिजे. हे केवळ कोणत्या पक्षाशी संबंधित राजकीय सूत्र नाही, तर यावर पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी याविषयी एकमत करायला हवे. ज्यांनी राममंदिर उभारण्याचे आणि समान नागरी कायदा करण्याचे आश्वासन दिले, ते सत्ता आल्यावर आश्वासन विसरले आहेत. राष्ट्रहितासाठी समान नागरी कायदा व्हायला हवा, असे सर्वसामान्यांना वाटते.’’