Menu Close

राष्ट्रप्रतिकांचा सन्मान राखण्याविषयी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागृती

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम

महापौर श्री. राहुल जाधव (उजवीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते, १. भाजपचे नगरसेवक श्री. विलास मडेगिरी

पुणे : मह. राष्ट्रीय अस्मिता राखली जावी आणि त्या निमित्ताने राष्ट्राभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने या मोहिमेच्या अंतर्गत पोलीस, तसेच प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देण्यासह शाळा-महाविद्यालयांमधून क्रांतिकारकांची माहिती देणारे सचित्र प्रदर्शन, प्रवचन (व्याख्याने) आदी उपक्रमांच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. समाजातील सर्वच स्तरातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

पोलीस-प्रशासन यांचा सकारात्मक प्रतिसाद

१. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर श्री. राहुल जाधव यांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखला जावा, शासनाने बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी निवेदन देण्यात आले. तळेगाव दाभाडे येथील भाजपचे आमदार श्री. बाळासाहेब भेगडे, पुणे महानगरपालिकेच्या सदस्या सौ. निताताई दांगटपाटील, नगरसेविका सौ. ज्योती गोसावी आदींनाही राष्ट्रध्वजाच्या सन्मानाविषयीचे निवेदन देण्यात आले.

२. खंडाळा (जिल्हा सातारा) येथील तहसीलदार, भोर येथील निवासी नायब तहसीलदार, वडगाव मावळ आणि तळेगाव दाभाडे येथील तहसीलदार कार्यालय, नगर परिषद, शिक्षणमंडळ यांना निवेदन देण्यात आले.

३. या व्यतिरिक्त पिंपरी येथील साहाय्यक पोलीस आयुक्त, भोसरी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले. सर्वांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले.

फरासखाना येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किशोर नावंदे यांनीही समितीच्या कार्याविषयी सकारात्मक प्रतिसाद देऊन तेथील साहाय्यक पोलीस अधिकार्‍यांना बोलवून प्लास्टिकचे राष्ट्र्रध्वज विकणार्‍यांना नोटीस देण्यास सांगितले, तसेच वानवडी, भोर, हडपसर, सासवड येथील पोलीस ठाण्यांत पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

खंडाळा (जिल्हा सातारा) येथे पोलीस उपनिरीक्षकांना निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरही उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये जागृती

१. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवचनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. शाळांमध्ये लावण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या सचित्र प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवडसह वडगाव, भोर, शिरवळ, खेड शिवापूर, ससेवाडी, कासुर्डी, चंदननगर, तळेगाव या भागातील शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासंदर्भात निवेदन दिले, तसेच प्रवचनही घेण्यात आले.

२. ससेवाडी येथील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत, तसेच खेड शिवापूर येथील पी.आय.व्ही. मिशन मराठी मुलींची शाळा आणि कासुर्डी येथील गुड शेफर्ड अकादमी येथे क्रांतिकारकांच्या शौर्यगाथेचे प्रदर्शन लावण्यात आले होते. कासुर्डी आणि शिरवळ (जिल्हा सातारा) येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी महिला आणि पुरुषही निवेदन देण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले होते. बोराटे वस्ती, खराडी यांसह कै. तुकाराम धोंडिबा पठारे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, संत तुकाराम माध्यमिक विद्यालय, कै. हंभीरराव कृष्णनाथ मोझे प्राथमिक विद्यालय, विकास प्राथमिक विद्यालय येथे निवेदन देण्यात आले.

३. खंडाळा (जिल्हा सातारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तसेच राजेंद्र विद्यालय येथे निवेदन दिल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा विषय शाळेच्या परिपाठामध्ये घेण्याचे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचे आश्‍वासन दिले.

प्रबोधन कक्ष

१. पुणे शहरातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देऊन विषय सांगितल्यावर त्यांनी महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीचा प्रबोधन कक्ष लावण्यास अनुमती दिली.

२. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल येथे १२ ऑगस्टला प्रबोधन कक्ष लावण्यात आला होता. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक पालकांनी प्रबोधन कक्षावर दाखवली जाणारी जागृतीपर चलचित्रे आवर्जून थांबून पाहिली. मॉलचे व्यवस्थापक श्री. केशब दास यांनी ‘राष्ट्रकार्यामध्ये आम्ही सहकार्य केलेच पाहिजे’, अशी प्रतिक्रिया दिली.

केयूर टी.व्ही शोरूम येथे लावण्यात आलेली प्रबोधनपर चित्रफीत

कर्वेनगर येथील केयूर टी.व्ही. शोरूममध्ये हिंदु जनजागृती समितीची प्रस्तुती असलेली राष्ट्र्रध्वजाचा मान राखा ही व्हिडियो क्लिप दाखवण्यात येत होती. अनेक ग्राहकही आवर्जून ते चलचित्र पहात होते.

ठाणे जिल्ह्यात पोलीस अधिकार्‍यांना निवेदने

शांतीनगर (भिवंडी) पोलीस ठाण्यात निवेदन स्वीकरतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक

१५ ऑगस्टनिमित्त राष्ट्रध्वजाचा मान राखण्याच्या हेतूने डोंबिवली येथील मानपाडा आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या वेळी दावडी येथील हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदी भाषिक जनता परिषदेचे श्री. हरिशंकर पांडे, श्री. विमलेश पांडे, श्री. अवधेश दुबे, श्री. मनिष पांडे, श्री. मनोज तिवारी आणि श्री. रामआश्रय यादव उपस्थित होते.

भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाणे, निजामपूर पोलीस स्टेशन, नारपोली पोलीस स्टेशन आणि कुंभारवाडा पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भिवंडी येथील धर्माभिमानी उपस्थित होते.

शाळेत निवेदन आणि प्रवचन

डोंबिवली पश्‍चिम येथील महात्मा गांधी शाळा, सरस्वती शाळा यांमध्ये निवेदन देण्यात आले. तसेच आर्.जे. ठाकूर महाविद्यालय, वर्तकनगर येथे प्रवचनही घेण्यात आले. सौ. धनश्री केळशीकर यांनी विषय मांडला. या वेळी १०८ विद्यार्थिनींनी लाभ घेतला.

गडचिरोली येथेही निवेदन सादर आणि शाळेत प्रबोधन

गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, निवासी जिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे आणि उच्च शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

भगवंतराव हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, लखमापूर बोरी आणि जिल्हा परिषद लखमापूर येथील विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि क्रांतीकारकांचे कार्य’ यांविषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. समितीच्या वतीने सौ. प्रगती मामीडवार यांना ३६० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमातून राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम जागृत होऊन राष्ट्रासाठी काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा निर्माण होत आहे, असे मत शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी व्यक्त केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *