Menu Close

स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे मालवण शहरात वाहनफेरीद्वारे आवाहन

मालवण : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रध्वजाचा मान राखा ही मोहीम जिल्ह्यात राबवण्यात आली. या अंतर्गत पोलीस, प्रशासकीय अधिकारी, शाळा आणि महाविद्यालये येथे निवेदने देणे, क्रांतीकारकांची माहिती देणार्‍या प्रवचनांचे आयोजन, वाहनफेरीद्वारे समाजप्रबोधन करणे आदी उपक्रमांच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. समाजातील सर्वच स्तरांतून या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला. याचाच एक भाग म्हणून मालवण येथे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट या दिवशी वाहनफेरी काढून जनजागृती करण्यात आली. या वेळी राष्ट्रध्वजाचा मान राखून त्याची विटंबना होणार नाही, याची दक्षता घ्या, असे आवाहन करण्यात आले.

फेरीचा प्रारंभ देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिरापासून झाला. तत्पूर्वी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन धर्मप्रेमी श्री. संजय गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मालवण येथील डॉ. सुभाष दिघे यांनी श्रीफळ वाढवल्यानंतर फेरीला प्रारंभ होऊन बसस्थानक, भरड नाका, बाजारपेठ, नगर वाचन मंदिर मार्गे शहरातून फोवकांड पिंपळ येथे आल्यावर फेरीची सांगता झाली. या वेळी मालवण येथील धर्मप्रेमी सौ. वैदेही महेश जुवाटकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दैवेश रेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिवानी रेडकर यांनी केले.

क्षणचित्रे

१. या फेरीत भैरवी सक्षम महिला ढोल-ताशा पथक, स्वराज्य महिला ढोल-ताशा पथक यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला.

२. फेरीत एकूण ५० दुचाकीस्वार भगवे ध्वज बांधून सहभागी झाले होते.

३. पाऊस पडत असतांनाही कोणीही फेरीतून बाहेर गेले नाही.

४. फेरीच्या मार्गात लोक थांबून विषय समजून घेत होते, तसेच भ्रमणभाषवर फेरीचे ध्वनीचित्रीकरण करत होते.

५. फेरीच्या सांगतेच्या वेळी सहभागी महिला ढोल-ताशा पथकांचे आभार मानण्यात आले असता या पथकांनी फेरीत सहभागी होणे, हे आमचे राष्ट्रकर्तव्य आहे. आम्ही प्रत्येक वेळी सहभागी होऊ, असे सांगितले.

६. भारतमातेचा विजय असो, वन्दे मातरम् आदी उत्स्फूर्तपणे देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

आभार

कुंभारमाठ, मालवण येथील हॉटेल जानकीचे मालक श्री. विनय गावकर यांनी चारचाकी वाहन फेरीसाठी उपलब्ध देण्यासह पूर्ण फेरीत वाहन चालवण्याची सेवा केली. फोवकांड रिक्शाचालक संघटनेने फेरीच्या सांगतेसाठी तेथील भूमी उपलब्ध करून दिली. तसेच पूजनासाठी महापुरुष देऊळवाडा बालगोपाल मंडळाने जागा उपलब्ध करून दिली. यासह सहकार्य केलेल्या सर्वांचे हिंदु जनजागृती समितीने आभार व्यक्त केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *