आतंकवादविरोधी पथकाने गावातील एका तरी प्रतिष्ठित व्यक्तीला पंच म्हणून राऊत यांच्या घरी सापडलेल्या वस्तू का दाखवल्या नाहीत ? – ग्रामस्थांचा प्रश्न
मुंबई : गोरक्षक वैभव राऊत यांना अपरात्री अटक करण्याच्या कारवाईमुळे नालासोपार्यातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून २ दिवसांनंतर गावातील व्यवहार पूर्वपदावर येत असले, तरी अजूनही लोक भेदरलेलेच असल्याचे वृत्त येथील स्थानिक ‘दैनिक वृत्तमानस’ने दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, ग्रामस्थ, कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या वृत्तात नमूद करण्यात आले आहे की,
१. रात्री केलेली ही कारवाई समजल्यामुळे आजूबाजूचे लोक घराबाहेर आले. वैभव राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची कोणालाही अनुमती नव्हती. त्यांच्या घराजवळही कोणाला जाऊ दिले नाही. राऊत यांच्याविषयी ग्रामस्थांमध्ये आस्था आहे. ते गोहत्येच्या विरोधात असून या विषयीच्या उपक्रमात सहभागी असतात. ते हिंदुत्वनिष्ठ आहेत; परंतु समाजविघातक कार्य करणार नाहीत, असे अनेक तरुणांपासून वृद्धांपर्यंत सांगत असून विशेष म्हणजे यात सर्वपक्षियांचाही समावेश आहे.
२. या कारवाईमुळे अनेक जण दुसर्या दिवशी कामावर गेले नाहीत कि घरात चूलसुद्धा पेटवली गेली नाही. आतंकवादविरोधी पथकाच्या कारवाईवर अप्रसन्न असलेल्या ग्रामस्थांनी गुन्हा सिद्ध झालेला नसतांनाही राऊत यांना ‘भगवा अतिरेकी’ ठरवणार्या माध्यमांवरही टीका केली.
३. वैभव राऊत यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी राऊत यांनी सांगितले की, आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी एका खोलीत होते. त्यांनी काय सामान आणले ? काय नेले ? याची कोणतीही माहिती आम्हाला दिली नाही आणि नंतर दूरध्वनी करून वैभव यांना अटक केल्याचे सांगितले. ही कामाची कोणती पद्धत आहे ?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
४. वैभव यांच्या घरात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, तर पोलिसांनी गावातील किमान एका तरी प्रतिष्ठित व्यक्तीला पंच म्हणून दाखवल्या असत्या, तर आम्ही विश्वास ठेवला असता, असे ग्रामस्थ प्राजक्ता पाटील यांनी सांगितले.
५. आता आतंकवादविरोधी पथकाने ‘वैभवने गुन्हा मान्य केला’, असे सांगितले, तरी आम्ही विश्वास ठेवणार नाही; कारण त्याला गुन्हा मान्य करायला भाग पाडले जाऊ शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. या घटनेमुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या मनात वैभव राऊत यांच्याविषयी असलेला आपलेपणा आणि विश्वास दिसून आला असून पोलिसांच्या अन्याय्य कारवाईमुळे त्याला कोणताही तडा गेलेला नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात