मुंबई : घरात पिस्तुले आणि स्फोटके सापडली असल्याचा आरोप ठेवून गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना ९ ऑगस्टच्या पहाटे आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. श्री. वैभव यांच्या अटकेमुळे समस्त वसईवासियांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. श्री. वैभव राऊत हे गोरक्षणाचे कार्य वैध मार्गाने करत असून त्यांना या प्रकरणात गोवण्यासाठी षड्यंत्र आखण्यात आले आहे, असा ठाम विश्वास वसईवासियांनी व्यक्त केला आहे. निर्दोष श्री. वैभव राऊत यांची तात्काळ मुक्तता करून या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी १७ ऑगस्ट या दिवशी ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी सायंकाळ ५ वाजता नालासोपारा (पश्चिम) येथील भंडारआळी गाव येथून निघणार आहे. याविषयी अधिक माहितीसाठी ७५५८६३३२२९ आणि ९००४५२३३३५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.
नालासोपारा भंडारआळी ते सिव्हिक सेंटरपर्यंत १७ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी मोर्चा काढण्यात येणार असल्याच्या अनुमतीसाठी लेखी निवेदन आले आहे; मात्र अनुमती द्यायची कि नाही, याविषयी निर्णय पोलीस अधीक्षक घेतील.
– के.डी. कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा
नालासोपार्यात मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
हिंदुत्वनिष्ठांवर होणार्या अन्यायाच्या निषेधार्थ वैध मार्गाने केल्या जाणार्या आंदोलनासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवणार्या पोलिसांनी हीच शक्ती आणि वेळ जिहादी आतंकवाद्यांना, तसेच बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना पकडण्यासाठी वापरली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !
मुंबई : गोरक्षक श्री. वैभव राऊत याच्या घरातून आतंकवादविरोधी पथकाने स्फोटके आणि शस्त्रास्त्रे कह्यात घेतल्याच्या कथित घटनेनंतर नालासोपार्यातील स्थानिक ग्रामस्थ अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या असून त्यांनी १७ ऑगस्ट या दिवशी मोर्चा आयोजित केला आहे. त्यासाठी जय्यत सिद्धता चालू झाली आहे. त्याच वेळी नालासोपारा शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नालासोपारा शहरात जाणार्या सहाही मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली असून स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि साध्या वेशातील पोलीसही जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. मोर्चाच्या निमित्ताने होणार्या सभांवरही पोलीस लक्ष ठेवणार आहेत. समाजमाध्यमांवर या संदर्भात पसरवले जाणारे संदेश, प्रक्षोभक वक्तव्ये पोलिसांकडून पडताळली जाणार आहेत. बाहेरून येणार्या लोकांवरही लक्ष ठेवले जाणार आहे. रेल्वे पोलिसांनीही सर्व उपनगरी रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानक परिसराची कसून तपासणी चालू केली आहे. शहरातील लॉज, हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी हिंदु आणि मुसलमान समाजाच्या बैठका घेऊन शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
गोरक्षक वैभव राऊत यांना घेऊन आतंकवादविरोधी पथकाकडून घराची पुन्हा झडती, चारचाकी गाडी जप्त !
- वैभव राऊत यांना ३०० हून अधिक नागरिकांनी एकवटून दिला पाठिंबा !
- मी कोणताही गुन्हा केलेला नाही ! – वैभव राऊत
मुंबई : १५ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ वाजता आतंकवादविरोधी पथकाने गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना घेऊन त्यांच्या निवासस्थानी ५० मिनिटे झडती घेतली. अटक केल्याच्या वेळी करण्यात आलेल्या झडतीनंतर पोलिसांनी पुन्हा ही झडती घेतली. श्री. राऊत यांना पोलीस घरी घेऊन आल्याची बातमी समजताच स्थानिकांसह आजूबाजूच्या गावांतील ३०० हून अधिक ग्रामस्थ त्यांच्या निवासस्थानी एकत्र आले. पोलीस घेऊन जात असतांना उपस्थित ग्रामस्थांनी श्री. वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणा देत हात उंचावून त्यांना पाठिंबा दर्शवला. या वेळी पोलीस हे श्री. वैभव राऊत यांची चारचाकी गाडी घेऊन गेले.
एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी ‘श्री. वैभव राऊत यांच्याशी बोलायला द्यावे, तसेच त्यांना घातलेला बुरखा काढावा’, अशी मागणी केली; मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या वेळी घराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता.
या वेळी श्री. वैभव राऊत यांनी कुटुंबियांना ‘मी कोणताही गुन्हा केला नसून मला यात विनाकारण गोवण्यात आले आहे. माझी काळजी करू नका. माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे. या संकटातून तोच मला बाहेर काढील. आतंकवादविरोधी पथक चौकशी करत आहे, त्यांना तुम्हीही सहकार्य करा’, असे सांगितल्याचे समजते.
सौ. लक्ष्मी राऊत (श्री. वैभव राऊत यांची पत्नी) यांची प्रतिक्रिया
पोलीस श्री. वैभव यांना आज का आणि कशासाठी घेऊन आले होते, हे कळले नाही. पोलिसांनी चारचाकी गाडीच्या विम्याची कागदपत्रे सोबत नेली. श्री. वैभव यांच्याशी आम्हाला नीट बोलूही दिले नाही.