हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नूतन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, लोटे येथे क्रांतीगाथा प्रदर्शन
चिपळूण : क्रांतीकारकांनी ब्रिटिशांशी झुंज दिली. क्रांतीकारकांच्या बलीदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मोजक्याच क्रांतीकारकांची आपण पुण्यतिथी वा जयंती साजरी करतो; परंतु अनेक क्रांतीकारकांची माहिती या प्रदर्शनातून आपल्याला मिळणार आहे. अनेक क्रांतीकारक हसत हसत देशासाठी फाशी गेले. या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन देशासाठी आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. आदर्श नागरिक होण्यासाठी हे प्रदर्शन प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राप्रतीच्या दायित्वाची जाणीव निर्माण करणारे प्रदर्शन आहे. यातूनच राष्ट्रप्रेमी पिढी सिद्ध (तयार) होईल, असे प्रतिपादन लोटे येथील नूतन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनिल जाधव यांनी केले. नूतन विद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या क्रांतीगाथा प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या प्रदर्शनाचा प्रारंभ भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. विजय बसवंत, शिक्षक श्री. नितीन जाधव, श्री. ए.आर्. लवटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विष्णु साळुंखे, श्री. सागर काते, सनातन संस्थेच्या सौ. पुष्पा मोरे आणि अन्य शिक्षकवर्ग उपस्थित होते. या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक श्री. संजय भोकरे यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी क्रांतीगाथा प्रदर्शनाचा उद्देश सांगितला आणि ‘राष्ट्रध्वजाचा मान कसा राखावा’, याविषयी प्रबोधन केले. या प्रदर्शनाचा लाभ ५५० विद्यार्थ्यांनी घेतला.
या वेळी क्रीडाशिक्षक श्री. संजय भोकरे हे म्हणाले की, राष्ट्राविषयी स्फूर्ती निर्माण करणारे हे प्रदर्शन असून या संधीचे सोने करून घ्या. क्रांतीकारकांचे वय आणि त्यांनी बालवयात कसे कार्य केले, हे समजून घ्या.
विशेष :
१. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी सामूहिक क्रांतीगीत सादर केले.
२. शिक्षकांनी प्रदर्शन पहाण्यासाठी प्रत्येक वर्गाचे नियोजन उत्तमरित्या केले.
३. संस्थाचालकांचे प्रदर्शनासाठी चांगले सहकार्य लाभले.
शिक्षकांचे अभिप्राय
१. श्री. विजय बसवंत, पर्यवेक्षक : क्रांतीकारकांमुळेच आपल्याला स्वराज्य मिळाले, म्हणून आज आपण आनंदात रहातो. या क्रांतीकारकांचे ऋण आपल्यावर कायम आहे. या विरपुरुषांच्या स्मृतीतून आपण प्रेरणा घेऊया. समितीच्या अशा उपक्रमांसाठी आमचे सदैव सहकार्य राहील.
२. श्री. नितीन कुळे, शिक्षक : या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व आणि धाडस आदी गुण निर्माण होतील. सामाजिक आणि राष्ट्रीय जाणीव निर्माण होईल. शालेय पुस्तकांतून क्रांतीकारकांविषयी एवढी माहिती मिळत नाही.
३. श्री. नीलेश देवरुखकर, शिक्षक : प्रदर्शनातील क्रांतीकारकांची माहिती विद्यार्थ्यांसाठी बोधप्रद आहे. काही क्रांतीकारकांविषयी माहिती नव्याने मिळाली. समितीचे कार्यकर्ते झोकून देऊन कार्य करत आहेत.
विद्यार्थ्यांचे अभिप्राय :
१. नट-नट्यांचा आदर्श न ठेवता देशासाठी प्राण देणार्या क्रांतीकारकांचा आपण आदर्श ठेवला पाहिजे.
२. क्रांतीकारकांनी पुढच्या पिढीचा विचार केला, तसा आपणही केला पाहिजे.
३. क्रांतीकारकांचा आदर्श घेऊन राष्ट्रासाठी कार्य करू.