निर्दोष वैभव राऊत यांची मुक्तता न केल्यास यापेक्षा प्रचंड आंदोलन उभारू ! : आंदोलकांची पोलीस आणि प्रशासन यांना चेतावणी
नालासोपारा : वैभव राऊत यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणार्या आतंकवादविरोधी पथकाचा निषेध असो, ‘वैभव राऊत निर्दोष आहेत’, ‘वन्दे मातरम्’, ‘भारतमातेचा विजय’, ‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो’ अशा घोषणा देत १७ ऑगस्ट या दिवशी ९ सहस्रांहून अधिक लोकांनी गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना पाठिंबा दर्शवला. गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना स्फोटके बाळगल्याच्या कथित गुन्ह्याखाली आतंकवादविरोधी पथकाने अटक केली. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे श्री. राऊत यांच्या समर्थनासाठी या मोर्च्यामध्ये सहस्रोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या. ‘निर्दोष श्री. वैभव राऊत यांची मुक्तता न केल्यास यापेक्षा प्रचंड आंदोलन उभारू’, अशी चेतावणी या जनआक्रोश आंदोलनात जनसमुदायाने पोलीस आणि प्रशासन यांना दिली. मोर्च्यातील प्रत्येक आंदोलक ‘श्री. राऊत निर्दोष असून त्यांची मुक्तता करा’, यासाठी पोटतिडकीने घोषणा देत होता. आंदोलनकर्त्यांकडून हाताला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. संपूर्ण नालासोपारा भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. थोड्या थोड्या अंतरावर पोलिसांचा फौजफाटा उभा होता. आंदोलनस्थळी दंगल नियंत्रण पथकाचे पोलीसही उपस्थित होते. अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि आगरी समाज यांनी मोर्च्याच्या वेळी गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे घोषित केले.
मोर्च्यात सहभागी मान्यवर
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख श्री. शिरीष चव्हाण, इस्कॉन संप्रदायाचे अखिल भारतीय गोरक्षा दलाचे प्रमुख श्री. दामोदरदास, आगरी समाजाचे श्री. जनार्दन पाटील (मामा), शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री. हर्षद राऊत, शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक श्री. प्रवीण म्हाप्रळकर, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शिवकुमार पांडे, लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल, गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार, अधिवक्ता खुश खंडेलवाल, भाजपचे श्री. संदीप सिंह, भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके, भाजपच्या उत्तर भारतीय समाजाचे पालघर जिल्हा सचिव श्री. नरेंद्र पाठक यांसह मोठ्या प्रमाणात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय आणि स्थानिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्च्यात सहभागी संघटना
आगरी सेना, भंडारी समाज, लष्कर-ए-हिंद, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, अखिल भारतीय भंडारी समाज, वसई, विरार, नालासोपारा येथील स्थानिक नागरिक, तसेच पालघर, रामनाथ (अलिबाग) येथूनही नागरिक सहभागी झाले होते.
यापेक्षा प्रचंड आंदोलन उभारू ! – ग्रामस्थ
श्री. वैभव राऊत हे गेली अनेक वर्षे गोहत्येच्या विरोधात कार्यरत आहेत. त्यांनी कायम संवैधानिक मार्गाने जनजागृती केलेली आहे. श्री. राऊत हे गोरक्षणासाठी सदैव तत्पर असून त्यांनी गोरक्षणासाठी कधीही कायदा मोडलेला नाही. श्री. राऊत यांनी गोतस्कर (बीफमाफिया) यांच्या विरोधात ३५ हून अधिक पोलीस तक्रारी केल्या आहेत. असे असतांना श्री. राऊत यांचा समाज आणि राष्ट्र विघातक कामांत सहभाग असणे केवळ अशक्य आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. श्री. राऊत यांच्यावर कारवाई करतांना ‘एटीएस्’च्या पोलिसांनी अनेक कायदाबाह्य कृती केल्या आहेत. त्यातून पोलिसांचे वागणे संशयास्पद असल्याचे अनेक गोष्टींतून स्पष्ट होते. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांच्या कायदाबाह्य वर्तनाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. आतापर्यंत ‘एटीएस्’कडून अनेक प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना षड्यंत्रपूर्वक अडकवण्याचा कलंकित पूर्वेतिहास पहाता निष्पाप श्री. वैभव राऊत यांना सन्मानाने मुक्त करण्यात यावे, तसे न केल्यास वेळप्रसंगी यापेक्षा मोठे आंदोलन उभारू, अशी चेतावणी वसई तालुका स्थानिक रहिवाशांनी या निषेध मोर्चातून दिली.
पोलिसांच्या संशयास्पद कारवाईवर विश्वास तरी का ठेवायचा ? – सौ. लक्ष्मी राऊत (श्री. वैभव राऊत यांच्या पत्नी)
या वेळी मोर्च्यामध्ये सहभागी झालेल्या श्री. राऊत यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी राऊत म्हणाल्या, ‘‘वैभव राऊत यांनी कधीही काही अवैध अथवा चुकीच्या कृती केल्या नाहीत. त्यांनी धर्मकार्य म्हणून केलेल्या गोरक्षणाच्या कार्यामुळेच त्यांच्यावर आकसातून कारवाई केली जात आहे. श्री. राऊत यांना या प्रकरणी नाहक गोवले जात आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून नेतांना आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही. चौकशी चालू असेपर्यंत मला आणि माझ्या सासूबाईंना एका खोलीत डांबून ठेवले. रात्री-अपरात्री आमच्या घरी आले, तर त्यांच्यासोबत महिला पोलीसही नव्हत्या. आमच्या घरातून काय नेले, काय आणले, काहीही आम्हाला सांगितले नाही. घराबाहेर शेकडो ग्रामस्थ जमले असतांनाही त्यांनाही पोलिसांनी काही सांगितले नाही. पंचनामा केला नाही. अशा पोलिसांच्या संशयास्पद कारवाईवर आम्ही विश्वास तरी का ठेवायचा ?’’
या वेळी श्री. वैभव राऊत यांचे कुटुंबीय, मित्र परिवार, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनीही पोलिसांच्या संशयास्पद कारवाईचा निषेध केला. ‘पोलिसांच्या कायदाबाह्य वर्तनाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, श्री. वैभव राऊत यांना गोतस्करांच्या दबावामुळे या प्रकरणी गोवण्यात आले आहे, याचीही चौकशी करण्यात यावी आणि श्री. राऊत यांची चालू असलेली ‘मिडीया ट्रायल’ थांबवावी’, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.
मोर्चा शांततेत असूनही तसेच बंद नसूनही बाजारपेठेतील लोकांनी स्वत:हून दुकाने बंद केली होती. लोक जथ्याजथ्याने मोर्च्यात सहभागी होत होते. मोर्च्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
‘माझा वैभव राऊत यांना पाठिंबा’ या स्टीकर आणि फलक यांनी लोकांचे लक्ष वेधले !
प्रत्येकाने ‘माझा वैभव राऊत यांना पाठिंबा’ या मथळ्याचे स्टीकर स्वत:च्या कपड्यांवर लावले होते. या स्टिकरवर ‘मीसुद्धा गोरक्षक, मी वैभव राऊत’, असे हिंदीमध्ये लिखाण होते. तसेच हेच लिखाण लोकांनी घेतलेल्या फलकांवरही होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात