वैभव राऊत यांच्यावर अन्याय्य कारवाई करणार्या अधिकार्यांवर योग्य ती कारवाई करावी ! – दिलीप ढाकणे-पाटील, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
नंदुरबार : हिंदू जनता आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते संघटित नाहीत म्हणूनच हा अन्याय चालू आहे.गोहत्याबंदी शासनाने आणली; परंतु प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना गोरक्षणासाठी पुढे यावे लागते.पुरोगामी संघटनांच्या दबावातून सरकार गोरक्षकांना त्रास देत आहेत. वैभव राऊत यांच्यावर होणार्या अन्याय्य कारवाई करणार्या अधिकार्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. दिलीप ढाकणे–पाटील यांनी केले.हिंदुत्वनिष्ठांवर अन्याय्य कारवाई करणार्या पोलिसांवर कारवाई करावी, बकरी ईदनिमित्त केली जाणारी गोवंश हत्या शासनाने थांबवावी, प्रदूषण वाढवणार्या कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींना शासनाने प्रोत्साहन देऊ नये, रोहिंग्या आणि पाकिस्तानी मुसलमानांना देशाबाहेर काढावे, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १५ ऑगस्टला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. हिंदु कार्यकर्त्यांवर अन्याय्य कारवाई करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी केली. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. भिका गिरनार यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी श्री. गिरनार म्हणाले, ‘बांगलादेशी घुसखोरांना भारतातून हाकलून लावावे.’
‘बकरी ईदनिमित्त होणारी गोवंशाची कत्तल शासनाने थांबवावी’, या विषयावर बोलतांना हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मयुर चौधरी म्हणाले, ‘इको फ्रेंडली गणपती साजरे करा’, असे आवाहन शासनाकडून केले जाते; पण ‘इको–फ्रेंडली बकरी ईद साजरी करा’, असे आवाहन केले जात नाही. सरकारच धर्मनिरपेक्ष कार्यपद्धती न राबवता हिंदूंच्या भावनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते.’
सौरभ पंडित या वेळी म्हणाले, ‘‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सवच्या नावाखाली शासन कागदी लगद्यापासून निर्माण केलेल्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देत आहे. प्रत्यक्षात कागदी लगद्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तींनी पर्यावरणाची हानी होत आहे. त्याने जलप्रदूषणात वृद्धी होत आहे, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. म्हणून प्रत्येकाने पर्यावरणपूरक अशी शाडू मातीची किंवा चिकण मातीची गणेशमूर्ती त्यांच्या घरी स्थापन करावी.’’
हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील म्हणाले, ‘‘वैभव राऊत यांच्याकडे स्फोटक जप्त करण्याची कारवाई अनेक अंगाने संशयास्पद असून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला खिळ घालण्याच्या हेतूने रचलेले हे कारस्थान आहे का ?, असा प्रश्न पडतो.गोवंशहत्या न थांबणे, गणेशोत्सवावर बंधने लादली जाणे, हिंदु कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे प्रविष्ट होणे, हे थांबवायचे असेल, तर विविध संघटनांच्या माध्यमातून कार्यरत हिंदुत्वनिष्ठांनी संघटित होणे, हीच काळाची आवश्यकता आहे.’’
या वेळी विविध संघटनांचेे, व्यायाम शाळेचे कार्यकर्ते, मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.