गोवा सरकारने नियम धाब्यावर बसवून बकरी ईदच्या निमित्ताने गोवा मांस प्रकल्प चालू करण्यास अनुज्ञप्ती दिल्याचे प्रकरण !
डिचोली : गोवा सरकारने नियम धाब्यावर बसवून बकरी ईदच्या निमित्ताने उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प चालू करण्यास अनुज्ञप्ती देणे, तसेच गोसेवा करणार्या गोरक्षकांवर बिनबुडाचे आरोप करणारे आमदार यांचा गोवंश रक्षा अभियान आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी डिचोली येथे १८ ऑगस्ट या दिवशी बुडकुलो (मडके) फोडून निषेध केला. गोमंतक हिंदु प्रतिष्ठान, शिवयोद्धा संघटना, गायत्री परिवार, भारत माता की जय संघटना, हिंदु जनजागृती समिती, शिवप्रेमी आणि गोप्रेमी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. गोवा सरकारमधील मंत्री विश्वजीत राणे, मंत्री विजय सरदेसाई, मंत्री माविन गुदिन्हो, विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो, आमदार फ्रान्सिस सिल्व्हेरा, आमदार नीलेश काब्राल, आमदार चर्चिल आलेमाव, तसेच गोवा सरकार यांच्या नावांचे बुडकुलो (मडके) फोडून त्यांचा निषेध करण्यात आला.
गोवंश रक्षा अभियानचे श्री. हनुमंत परब या वेळी प्रस्तावना करतांना म्हणाले, बकरी ईद साजरी करण्यास आमचा विरोध नाही, तर गोवंशियांची हत्या करण्याला आमचा विरोध आहे. बंगाल आणि केरळ येथे सर्वाधिक प्रमाणात गोवंशियांची हत्या केली जाते; म्हणून त्या भागात आज महापूरासारखी परिस्थिती उद्भवून अराजक माजले आहे. या प्रसंगी गोमंतक हिंदू प्रतिष्ठानचे श्री. शैलेंद्र वेलींगकर म्हणाले, जो पंथ भाजपच्या बाजूने कधीच झुकलेला नाही किंवा पुढे झुकणार नाही, त्या पंथाच्या तुष्टीकरणासाठी सरकार हिंदूंच्या भावनांशी खेळत आहे. वास्तविक भारताची संकल्पना हिंदु संस्कृतीवर आधारित आहे. सरकार ही संस्कृतीच नष्ट करू पहात आहे. या वेळी विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी त्यांचे विचार मांडले.