Menu Close

सनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा

पुरोगाम्यांनी अन्वेषणाची दिशा भरकटवल्यानेच खरे मारेकरी मोकाट ! – पराग गोखले

  • ‘आम्ही सारे सनातन… सनातन…’चे नारे !
  • सनातनला पाठिंबा देण्यासाठी भर पावसात ४०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ रस्त्यावर उतरले !

पुणे : डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर पुरोगामी गोतावळ्याने हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सनातन संस्था यांच्याकडे अंगुलीनिर्देश करून अन्वेषणाची दिशा भरकटवली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्ध्या घंट्याच्या आतच उजव्या विचारसरणीच्या लोकांनी ती हत्या केल्याचे वक्तव्य केले होते. पृथ्वीराज चव्हाण आणि पुरोगामी गोतवळा यांनी दाभोलकरांच्या हत्यांची दिशा भरकटवल्यानेच खरे मारेकरी मोकाट आहेत. हिंदुत्वनिष्ठांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानेच त्यांना तोंड दाखवायला जागा न उरल्याने ते सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. राष्ट्र आणि धर्म यांवर गरळ ओकणारे पक्ष, संघटना यांच्यावर बंदीची मागणी केली जात नाही; मात्र धर्मनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदीची मागणी केली जाते, हे आश्‍चर्यजनक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. सनातनच्या समर्थनार्थ २१ ऑगस्टला येथे काढण्यात आलेल्या मोर्च्यामध्ये ते बोलत होते. येथील महाराणा प्रताप उद्यानापासून प्रारंभ झालेल्या या मोर्च्याची श्री कसबा गणपती मंदिर येथे सांगता करण्यात आली.

सनातनला पाठिंबा देण्यासाठी पावसातही पुण्यातील हिंदुत्वनिष्ठ रस्त्यावर !

पुणे : अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ५ वर्षे पूर्ण होत असतांना अन्वेषण यंत्रणांकडून काही हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली. सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या परिचितांनी ते निर्दोष असल्याचा ठाम विश्‍वास व्यक्त केला आहे. या प्रकरणी कथित पुरोगामी आणि सनातन धर्मविरोधी राजकीय पक्षांकडून पूर्वग्रहदूषितपणे सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाई आणि सनातन संस्थेवरील संभाव्य बंदी यांच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. भर पावसात काढण्यात आलेल्या या मोर्च्यामध्ये ४०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी सहभागी होऊन सनातन संस्थेला भरभक्कम पाठिंबा दर्शवला. ‘अंनिस नव्हे, वैज्ञानिक भोंदू !’, ‘जवाब दो अंनिस !’, ‘हत्येचा खटला चालू नये; म्हणून उच्च न्यायालयात जाण्याचे कारण काय ?’, ‘सत्याची बाजू आम्ही नेहमीच मांडू, आम्ही सारे हिंदू !’ असे फलक हिंदुत्वनिष्ठांनी हातात धरले होते. ‘सनातन निर्दोष आहे !’, ‘आम्ही सारे सनातन… सनातन…!’ असे नारे या वेळी देण्यात आले.

आम्ही सारे सनातनी ! – डॉ. नीलेश लोणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव

सनातन संस्थेच्या ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ या घोषामुळेच म्हणजे भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नांच्या भीतीपोटीच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे; मात्र आम्ही ठामपणे सनातनच्या पाठीशी उभे आहोत. नित्यनूतन म्हणजे सनातन; पण आज ‘सनातन’ या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जात असला, तरी आम्ही सनातनी म्हणजे ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणारे आहोत, असे सांगत डॉ. लोणकर यांनी सनातनला भक्कम पाठिंबा घोषित केला.

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हिंदुत्व दडपण्याचा प्रयत्न ! – अधिवक्ता मोहनराव डोंगरे

सनातन हिंदु धर्म प्रत्येक धर्मनिष्ठ हिंदूच्या मनात आहे. सनातनचे कार्य म्हणजे देव, देश आणि धर्म यांचे कार्य आहे. वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या निवडणुका समोर ठेवूनच हिंदुत्व दडपण्याचा प्रयत्न होत आहे. सनातनच्या साधकांच्या मनात, कृतीमध्ये, विचारांमध्ये परमेश्‍वराचा नामजप आहे. अशा सनातनवर बंदी कुठून आणणार ? सनातनवर बंदी आणणे म्हणजे सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. बंदी आणायचीच असेल, तर धर्म आणि राष्ट्र यांचा दु:स्वास करणार्‍या काँग्रेस पक्षावरच बंदी आणायला हवी.

हिंदुत्वाला लक्ष्य करण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाही ! – अधिवक्ता नीलेश निढाळकर

या देशात हिंदुत्वाचे कार्य करणे म्हणजे पाप करणे आहे, असे वातावरण निर्माण झाले आहे. राजकारण्यांनी ‘भगवा आतंकवाद’ हे पिल्लू सोडले आणि प्रसारमाध्यमांनी ते मोठे केले. असे असले, तरी हिंदू असण्याचा आम्हाला स्वाभिमान आहे. आज काही हत्यांच्या अन्वेषणाच्या नावाखाली निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना गोवले जात आहे. हिंदुत्वाला लक्ष्य करण्याचे हे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत. सनातनचे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते हे संस्कृतीचे रक्षक आहेत. प्रसारमाध्यमांनी न्यायाधिशांच्या भूमिकेत जाऊन कितीही आरोप केले, तरी हे सर्व हिंदुत्वनिष्ठ निर्दोष सिद्ध होतील.

एक व्यक्ती – एखाद्या व्यक्तीने जरी गुन्हा केला, तरी त्या संस्थेला दोषी कसे मानता येईल ? तो व्यक्तीचा दोष आहे. संस्थेला अपकीर्त कशासाठी केले जात आहे ? राजकीय पक्षांमध्ये गुन्हेगार व्यक्ती असूनही त्यांच्यावर बंदीची मागणी केली जाते. मग सनातन संस्थेवर आरोप का केले जात आहे ?

क्षणचित्रे

१. सनातनवरील जिव्हाळ्यापोटी स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचारमंचचे डॉ. नीलेश लोणकर पुण्यापासून ६० किलोमीटर दूर असणार्‍या केडगाव येथून मोर्च्याला उपस्थित राहिले होते.

२. निपार चौकाजवळून जात असतांना एक व्यक्ती जाता जाता ‘पाठिंबा, पाठिंबा’ असे म्हणत गेली.

विशेष

सनातनच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्च्याचे फेसबूकवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. ९,७०० हून अधिक जणांनी फेसबूकवरून हा मोर्चा पाहिला आणि ४८,२०९ लोकांपर्यंत पोहोचला.

मोर्च्याच्या वार्तांकनासाठी उपस्थित प्रसारमाध्यमे

इलेक्ट्रॉनिक माध्यमे – टाइम्स नाऊ, पुणे दर्पण, सीएन्एन् न्यूज १८, साम टीव्ही, जय महाराष्ट्र, झी २४ तास, दिनमान, एबीपी माझा, झी न्यूज , टीव्ही ९, जागृती न्यूज, दूरदर्शन

प्रसारमाध्यमे – लोकसत्ता, पुणे मिरर, दिव्यमराठी, सकाळ यांसह २४ प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदू एकता आंदोलन पक्षाचे पदाधिकारी अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे मोर्च्याला उपस्थित राहू शकले नाही; मात्र त्यांनी आवर्जून ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला भ्रमणभाष करून सनातनला पाठिंबा व्यक्त केला. अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे म्हणाले, ‘‘देव, देश, धर्म यांच्यासाठी निरपेक्षपणे कार्य करणारी सनातन संस्था आहे. त्यांचा राजकीय अभिनिवेष नाही. कुठल्याही राजकीय पक्षाचे ते संलग्न नाहीत. त्यामुळेच पुरोगामी विचारांची मंडळी सनातनवर बंदी आणू पहात आहेत; मात्र सनातनवर बंदीची मागणी करणे, हे अधर्मी कृत्य आहे. आम्ही सर्व हिंदुत्वनिष्ठ सनातनच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *