Menu Close

रत्नागिरी येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

धर्मावरील आघातांविषयी हिंदूंनी जागृत रहाणे अत्यंत आवश्यक ! – विनोद गादीकर, जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

रत्नागिरी : आपला देश हिंदूबहुल असूनही हिंदूंवरच सातत्याने अन्याय होत आहे; म्हणूनच हिंदूंना सातत्याने आंदोलने करावी लागतात. धर्मावरील आघातांविषयी हिंदूंनी जागृत रहाणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. विनोद गादीकर यांनी केले.

शहरातील जयस्तंभ येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हिंदु धर्मावरील विविध आघातांच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ते बोलत होते. आंदोलनाला अनुमाने १०० धर्मप्रेमी उपस्थित होते. या आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. फड यांनी ते स्वीकारले.

श्री. गादीकर पुढे म्हणाले की, हिंदूंच्या एकेका मंदिराचे सरकारीकरण करणे चालू आहे. सरकारीकरण झालेल्या मंदिरांची स्थिती पाहिली, तर तेथे राजरोसपणे भ्रष्टाचार चालू आहे. शिर्डीच्या श्री साईमंदिरातील प्रसादाच्या तुपात झुरळ सापडले. म्हणजे भाविकांना देण्यात येणार्‍या प्रसादामध्येही भ्रष्टाचार होत आहे. भाविक आणि भक्त यांच्या जिवाशी खेळणार्‍या मंदिर व्यवस्थापनातील संबंधित सरकारी कर्मचारी अन् अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

हिंदु धर्मातील प्रथांविषयी जाणीवपूर्वक वाद निर्माण करून स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचे हिंदी चित्रपटसृष्टीतील काहींचे प्रयत्न !- महेश मयेकर, अध्यक्ष, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, राजापूर

हिंदी चित्रपटसृष्टीत जाणीवपूर्वक देवतांची विटंबना अथवा धर्मातील प्रथांविषयी वाद निर्माण करून स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न काही निर्माते आणि दिग्दर्शक करत आहेत. या वर्षी १० ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव चालू होत आहे आणि त्याच्या आधी म्हणजे ५ ऑक्टोबरला सलमान खाननिर्मित ‘लव्हरात्री’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सहअभिनेता अभिनेत्याला ‘तुझ्याकडे या मुलीला पटवण्यासाठी ९ दिवस आणि ९ रात्री आहेत’, असे सांगतांना पहायला मिळत आहे. हिंदूंच्या धार्मिक सणांविषयी असे विवादास्पद संवाद वापरून सणांचा वापर प्रेमप्रकरणासाठी करणे अत्यंत निषेधार्ह आहे.

‘लव्हरात्री’ चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्यावर हिंदूंनी बहिष्कार घालावा ! – साईजित शिवलकर, कोकणप्रांत वसतीगृह प्रमुख, अ.भा.वि.प.

नवरात्राचे ९ दिवस हे उपासनेचे आहेत, देवीच्या भक्तीचे आहेत. ‘लव्हरात्री’ हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये. जर प्रदर्शित केला गेला, तर आम्ही सर्वजण त्यावर बहिष्कार घालू. समस्त हिंदूंनीही या चित्रपटावर बहिष्कार घालावा.

धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंनी झगडले पाहिजे ! – ह.भ.प. श्रीमती अरुणाताई साळवी, गणपतीपुळे

हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती इतकी महान आहे की, ती सर्व जगाला आपल्या समवेत नेते. विकृत गोष्टी आम्ही कदापि सहन करणार नाही. आईच्या रक्षणासाठी झटतो त्याप्रमाणे आपण आपल्या धर्माच्या रक्षणासाठी झगडले पाहिजे. हिंदूंच्या मंदिरांना कह्यात घेणार्‍या शासनाने एखादी मशिद अथवा चर्च कह्यात घेण्याचे धाडस करून दाखवावे.

सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे हिंदूंच्या कह्यात देण्यात यावीत ! – श्री. साईनाथ नागवेकर, विश्‍वस्त, श्री दत्तमंदिर, गुढेवठार, रत्नागिरी

आंदोलन करणारे मुठभर हिंदू काय करणार असा विचार धर्मविरोधकांनी करू नये.  अशांनी मूठभर मावळ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता इतिहास घडवला ते आठवावे. आज आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच मंदिरांचे सरकारीकरण करत आहेत. अशांना आपण निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. यापुढे कोणत्याही मंदिराचे सरकारीकरण होऊ नये आणि सरकारीकरण झालेली मंदिरे पुन्हा भाविक अन् भक्त यांच्या कह्यात देण्यात यावीत.

प्रदूषणकारी कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींना शासनाने प्रोत्साहन देऊ नये ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

‘इको फ्रेंडली’च्या नावाखाली हिंदूंच्या सणांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. राष्ट्रीय हरित लवादाने कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री. गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याचे घोषित केले आहे. सांगली येथील पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या संशोधनानुसार १० किलो कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे १००० लिटर पाणी प्रदूषित होऊ शकते. असे असूनही अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटना कोणताही अभ्यास न करता कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती पर्यावरणपूरक असल्याचे सांगून हिंदूंची दिशाभूल करत आहेत. शाडूची मातीच्या श्री गणेशमूर्तीमुळे कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण न होता उलट त्यामधील चैतन्यामुळे संपूर्ण सृष्टीला फायदा होत असल्याने हिंदूंनी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार सण आणि उत्सव साजरे करावेत.

आंदोलनाला उपस्थित असलेले मान्यवर

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान रत्नागिरीचे सर्वश्री गणेश गायकवाड, देवेंद्र झापडेकर, पंकज सुर्वे, दत्ताराम खांडगे, अभिजित गिरकर, नारायण घुशींगे आणि सुशील कदम; नाचणे-बाणेवाडी येथील श्री नवलाई पावणाई जाकादेवी मंदिराचे विश्‍वस्त सर्वश्री मंगेश सावंत आणि लंबोदर करमरकर; रामभोलकरीण क्रीडा मंडळ, मिरजोळेचे श्री. प्रशांत नाखरेकर; पाटीदार समाज रत्नागिरीचे श्री. रमेशभाई पटेल; श्री. दयानंद शिवलकर; गणपतीपुळे येथील श्री जय गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री. सूरज पवार; श्री चंडिका मंदिराचे विश्‍वस्त सर्वश्री श्रीधर केदार, गणपत केदार, मधुकर पवार आणि गणेश ठावरे; मालगुंड येथील सनातन प्रभातचे वाचक श्री. आणि सौ. रेवाळे; सनातन संस्थेचे सर्वश्री हनुमंत करंबेळकर, सौ. पल्लवी लांजेकर आणि सौ. शुभांगी मुळ्ये; हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अशोक पाटील, विनोद माने, सौ. साधना माने, भार्गव वझे आणि प्रभाकर रसाळ आदी.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *