हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने व्याख्याने, स्वरक्षण प्रात्यक्षिके आणि क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन आदी विविध उपक्रमांचे आयोजन !
मुंबई – येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्याने, फलक प्रदर्शन, स्वरक्षण प्रात्यक्षिके यांसारखे विविध उपक्रम घेण्यात आले. समितीच्या वतीने घेण्यात आलेला ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि सुराज्य’ हा विषय ५०० हून अधिक लोकांपर्यंत पोहोचला.
विरार
विरार (पूर्व) मनवेलपाडा येथील विष्णु विहार वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भारतीय लष्करातील मराठा बटालियनमध्ये सेवा बजावलेले, सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभाग घेतलेले सैनिक श्री. पंढरीनाथ पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद काळे यांनी स्वतंत्र भारताची सद्य:स्थिती, क्रांतीकारकांचे बलीदान, राष्ट्रध्वजाचा सन्मान या विषयावर मार्गदर्शन केले आणि नंतर वैशाली भंडारी आणि हेमंत पुजारे यांनी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवली. असोसिएशनचे अध्यक्ष रविकांत तेंडुलकर आणि उपसचिव श्री. सुनील आंब्रे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘स्वरक्षणासाठी प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे, समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून ते आम्हाला नीट समजावून सांगितले’, असे अध्यक्ष रविकांत तेंडुलकर यांनी सांगितले.
क्षणचित्रे
१. सह्याद्रीनगर गणेशोत्सव मित्र मंडळात समितीच्या वतीने गेल्या वर्षी संपूर्ण ‘वन्दे मातरम’चे गायन करण्यात आले होते. त्यापासून प्रेरणा घेत मंडळातील लहान मुलांनी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हटले.
२. पाऊस पडत असूनही सह्याद्रीनगर गणेशोत्सव मंडळ आणि श्री गणेश मित्र मंडळ येथील रहिवाशांनी स्वरक्षण प्रात्यक्षिके पाहिली आणि तेथे स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी केली.
प्रभादेवी
प्रभादेवी येथील जे.के. स्पोर्ट्स क्लब आणि विकास क्रीडा मंडळ, वाणीची चाळ येथे श्री. राहुल पाटेकर यांनी विषय मांडला, सौ. मेघना सागवेकर यांनी जे. के. स्पोर्ट्स क्लब येथे ‘संपूर्ण वन्दे मातरम्’ म्हटले.
अंधेरी-विलेपार्ले
अंधेरी आणि विलेपार्ले परिसरातील जे.बी. नगर येथील क्रांतीवीर वेल्फेअर गार्डन येथे क्रांतीकारकांच्या शौर्याची माहिती सांगणार्या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. साईवाडी गणेशोत्सव मंडळ, कलाईवाला काळ गणेशोत्सव मंडळ, सुभाष नगर, सुखसागर गणेश हाऊसिंग सोसायटी, एम्.आय.डी.सी. येथील ओम कल्पतरू सोसायटी, गौतम नगर, महाकाली रोड येथील बिंद्रा कॉम्प्लेक्स या सोसायट्यांमध्ये समितीचे श्री. सुयोग्य मांडवकर, संतोष बंदरकर, सुनील ठाकूर यांनी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा आणि सुराज्य’ हे विषय मांडले.
भांडुप
भांडुप येथील सह्याद्रीनगर गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मित्र मंडळाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सौ. प्राजक्ता सावंत यांनी विषय मांडला, तर श्री. निलेश पवार, श्री. श्रीराम यादव आणि कु. भाग्यश्री हडकर यांनी स्वरक्षण प्रात्यक्षिके करून दाखवली. ओम मित्र मंडळ येथे श्री. सचिन घाग यांनी विषय मांडला, तर कु. भाग्यश्री हडकर आणि कु. कोमल यांनी संपूर्ण वन्दे मातरम् म्हटले.
कांदिवली
कांदिवली येथील नवदीप मित्र मंडळ आणि शिवशम्भो चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अश्विनी पवार यांनी उपस्थितांना राष्ट्रध्वजाचे महत्त्व, ध्वजसंहिता आणि क्रांतीकारकांचे बलीदान यांविषयी अवगत केले. या वेळी ७० जण उपस्थित होते. या वेळी कार्याध्यक्ष श्री. अरविंद मोरे आणि अध्यक्ष श्री. सुयोग महाडिक यांनी महाशिवरात्री तसेच येणार्या सणांच्या वेळी अशा प्रकारचे प्रबोधन करण्याची मागणी केली.
कृष्णा टाँवर, अशोकनगर, कांदिवली (पूर्व) येथे हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनिता शहाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सौ. शहाणे यांनी ‘संपूर्ण वन्दे मातरम्’ म्हटले आणि विषय मांडला. प्रजासत्ताक दिनालाही येण्याचे निमंत्रण समितीला देण्यात आले.
यवतमाळ येथे ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहिमेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
यवतमाळ : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ ऑगस्टला धामणगाव रस्त्यावरील ‘एल्आयसी चौक’ येथे ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात आली. या वेळी राष्ट्रध्वज सन्मान पेटी ठेवण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत खराब झालेले आणि खाली पडलेले ध्वज सन्मान पेटीमध्ये जमा केले. वाहनधारकांनी वाहनावर लावलेले ध्वज सन्मान पेटीमध्ये जमा केले. या वेळी क्रांतीकारकांची माहिती सांगणारे सचित्र फलक प्रदर्शन लावण्यात आले होते, तसेच प्रबोधनपर हस्तपत्रके वितरित करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जमा झालेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करण्यात येणार आहेत.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मागील १० वर्षांपासून येथे मोहीम राबवण्यात येते. पूर्वीच्या तुलनेत या वर्षी वाहनावर लावलेले ध्वज अत्यल्प होते.
नागपूर येथेही व्यापक स्तरावर जनजागृती !
नागपूर : शहरात २२ शाळांत ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयी व्याख्याने घेण्यात आली, तर २ शाळांमध्ये क्रांतीकारकांची माहिती देणारे ‘क्रांतीगाथा’ हे फलक प्रदर्शन लावण्यात आले. ‘या प्रदर्शनाद्वारे सर्व विद्यार्थ्यांमध्ये क्रांतीकारकांनी केलेल्या बलीदानाविषयी आदर आणि राष्ट्रभक्ती निर्माण होण्यास निश्चितच साहाय्य होईल’, असे मत शाळेच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.
मोहिमेच्या अंतर्गत प्रबोधनपर हस्तपत्रके वितरित करणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे, सामाजिक संकेतस्थळाद्वारे जनप्रबोधन करणे, आदी गोष्टीही करण्यात आल्या. जिल्हाधिकारी नागपूर, उपआयुक्त पोलीस विशेष शाखा नागपूर, विविध शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी निवेदने देण्यात आली.