महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्या वेळी पत्रकारांनी त्यांना तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात येणार्या आंदोलनाविषयी विचारले असता ते म्हणाले, मीदेखील आज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मी अर्धवस्त्र नेसून गेलेलो नसल्यामुळे मला गाभार्यात सोडले नाही. मी त्या सूचनेचा आदर केला. त्यांनी केलेली मागणी, त्याला केला जाणारा विरोध आणि राज्यघटना या सर्वांना एकत्र करून चर्चा आणि संवाद साधल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढला पाहिजे. शासन सर्वांशी संवाद साधून निर्णय घेईल. सध्या परिस्थितीत जिल्हा प्रशासन स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकते. प्रत्येक वेळी शासनाने चर्चा करायला पाहिजे असे नाही. तृप्ती देसाई आणि मंदिराचे पुरोहित, ग्रामस्थ हेही चर्चेने प्रश्न सोडवू शकतात.
नास्तिकवादी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर
नास्तिकवादी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या अशास्त्रीय आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तृप्ती देसाई आणि ब्रिगेडी महिलांना तात्काळ नाशिक जिल्हा बंदी घोषित करावी. ब्रिगेडी महिलांकडून चुकीचे आंदोलन करून जनतेला वेठीस धरले जाते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची हानी केली जात आहे. त्यामुळे होणार्या आर्थिक हानीची वसुली भूमाता ब्रिगेडकडून करण्यात यावी, असे मागणीपर निवेदन राज्याचे अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी दिले. श्री. मुनगंटीवार हे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्या वेळी त्यांची भेट घेण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात