- हिंदुद्वेषींच्या विरोधाला न जुमानता सभा यशस्वी करून दाखवणारे धारकरी हिंदूंना आदर्शवत !
- जानेवारी आणि एप्रिलमध्ये संवेदनशील स्थितीमुळे रहित झालेल्या श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानने सभेचे आयोजन करून स्वत:ची प्रतिज्ञा खरी करून दाखवली !
- पोलिसांचा चोख बंदोबस्त
- छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाचे मार्गदर्शन
चिपळूण : श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या येथील सभेस संभाजी ब्रिगेड, आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांनी प्रखर विरोध दर्शवला असतांनाही ही सभा यशस्वी झाली आहे. या सभेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास, देशावर झालेली परकीय आक्रमणे, त्यानुसार आपण कसे वागावे, याचे विविध दाखले दिले. या सभेला विविध तालुक्यांतून धारकरी उपस्थित होते.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे ३२ मण सोन्याचे सिंहासन करण्याचे कार्य शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान करत आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी येथील चितळे मंगल कार्यालयात पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या सभेचे आयोजन केले होते. जानेवारी आणि एप्रिलमध्ये ही बैठक होणार होती; मात्र जिल्ह्यामध्ये संवेदनशील स्थिती निर्माण झाल्यामुळे ती रहित करण्यात आली होती.
प्रखर विरोधामुळे ४ वाजता होणार सभा सायंकाळी ५.४५ वाजता चालू झाली
२२ ऑगस्ट या दिवशी दुपारी ४ वाजता या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीला विविध संघटनांनी प्रखर विरोध केल्यामुळे ५.४५ वाजता चालू झाली. पू. गुरुजींना पोलीस फौजफाट्यासह सभेच्या ठिकाणी आणण्यात आले. पू. गुरुजींचे शिवचरित्र आणि सिंहासन उभारणीसंदर्भात केलेले मार्गदर्शन रात्री ९.१० ला संपले.
सामर्थ्य छत्रपती शिवरायांच्या इतिहासात आहे ! – पू. संभाजी भिडेगुरुजी
छत्रपती शिवरायांनी १४ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. देशाच्या सीमेवरील सैनिकांचे जसे जीवन असते तशी जीवनातील ३६ वर्षे अखंड संघर्ष केला. एक क्षणही वाया घालवला नाही. हताश, निराश असे शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी २८९ लढाया केल्या, परंतु त्यातील २०० हून अधिक लढाया बदमाश स्वकीयांशी कराव्या लागल्या. त्यांचाच रक्तगट पुढे चालत हिंदुत्वास कडवा विरोध करणारा तयार झाला. देशाचे हे चित्र पालटवण्याचे सामर्थ्य छत्रपती शिवरायांच्या इतिहासात आहे, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजींनी केले.
पू. भिडेगुरुजी यांनी प्रसिद्धीमाध्यमांना खडसावले !
सभा संपल्यानंतर सभागृहातून बाहेर पडतांना पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी प्रसिद्धीमाध्यमांना खडसावले. ते म्हणाले, ‘‘गेले तीन मास केवळ विषय चघळत ठेवलात, मला तुमचं तोंड बघायचे नाही.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात