Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राजस्थान येथे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राजस्थान येथील रानोली (जिल्हा सीकर) आणि मुकुंदगड येथे हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत विविध बैठकांचे आयोजन

शरिरामध्ये आत्म्याचे जितके महत्त्व, तितके राष्ट्रामध्ये धर्माचे महत्त्व ! – रमेश शिंदे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मुकुंदगड (झुंझुनू, राजस्थान) : राजस्थानमधील हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत मुकुंदगड येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि समितीचे राजस्थान अन् मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी भूमिका मांडली. श्री. रमेश शिंदे म्हणाले, शरिरामध्ये आत्म्याचे जितके महत्त्व आहे, तितके राष्ट्रामध्ये धर्माचे आहे. देशातून धर्म वेगळा केला, तर देश नष्ट होतो. आज देशामध्ये असेच होत आहे. देशात अल्पसंख्यांक त्यांच्या धर्माचे आचरण करतात; मात्र हिंदु जर टिळा लावून धर्माचरण करत असेल, तर त्याला हसले जाते. देशात आज हिंदू हा धर्मनिरपेक्ष झाला आहे. तो स्वतःच्या धर्माला विसरत चालला आहे. शाळांमधून गीता किंवा रामायण शिकवले जात नाही; कारण भारत निधर्मी आहे. दुसरीकडे मदरशांतून कुराण आणि चर्चमधून बायबल शिकवले जाते. अल्पसंख्यांकांना त्यांच्या धर्माचे शिक्षण घेण्याची अनुमती आहे. हे षड्यंत्र देशाच्या स्वातंत्र्यापासून चालू आहे. याला रोखण्यासाठी हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्याची मागणी केली पाहिजे.

देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली असतांना भारत निधर्मी का ? – रमेश शिंदे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

रानोली (सीकर, राजस्थान) : देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. मुसलमानांना पाकिस्तान देण्यात आल्यावर उर्वरित भारत हिंदूंचे हिंदु राष्ट्र आहे; मात्र स्वातंत्र्याच्या वेळी नेत्यांनी भारताला हिंदु राष्ट्र बनवले नाही. तसेच वर्ष १९७६ मध्ये आणीबाणीचा लाभ घेऊन हिंदुविरोधी काँग्रेसने घटनेत असंविधानिकरित्या संशोधन करून भारताला धर्मनिरपेक्ष बनवले. देशाच्या राज्यघटनेत अल्पसंख्यांकाच्या संरक्षणासाठी विशेष तरतूद आहे; मात्र हिंदूंसाठी असा कोणताही कायदा नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास, आज निधर्मीपणा म्हणजे बहुसंख्यांक हिंदूंसाठी कायदा आणि अल्पसंख्यांकांसाठी फायदा बनलेला आहे. यासाठीच हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी येथे केले. ते समितीच्या हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात असलेल्या रानोली येथे सनातन धर्म संघटनेद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते. बैठकीचा लाभ अनेक धर्माभिमान्यांनी घेतला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *