हिंदुद्वेषी विद्यार्थ्यांची मोगलाई !
रस्त्यावर नमाजपठण करून वाहनधारकांची मुस्कटदाबी करणार्या मुसलमानांना हिंदुद्वेषी विद्यार्थी संघटनांनी कधी विरोध केला आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : शहरातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयातील मुख्य कार्यालय असणार्या इमारतीत २४ ऑगस्टला श्रावण मासानिमित्त घालण्यात आलेल्या सत्यनारायण महापूजेला काही विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. ‘महाविद्यालयात अशा प्रकारची पूजा करून विशिष्ट धर्माच्या धार्मिक रूढींना प्रोत्साहन दिले जात आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. (धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली वाढत चाललेला हिंदुद्वेष ! हिंदूबहुल देशात हिंदूंच्याच धार्मिक प्रथा-परंपरांना हिंदुद्वेष्ट्यांकडून विरोध होणे, हे मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लज्जास्पद होय ! मुसलमान विद्यार्थी-विद्यार्थिनी तेथेही नमाज पढतात. विद्यार्थी संघटना यालाही विरोध करणार का ? हिंदु विद्यार्थ्यांनी संघटित होऊन वैध मार्गाने याला विरोध केला पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘अन्य कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे सत्यनारायणाची महापूजा घालण्यात येत असतांना येथे महापूजा घातली, तर विरोध करण्याचे कारण काय ?’, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला.
१. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी आंदोलकांशी चर्चा करतांना म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचार्यांकडून सत्यनारायणाची पूजा घातली जाते. आम्ही केवळ परंपरा पाळली आहे.
२. आंदोलनकर्ता विद्यार्थी कुलदीप आंबेकर म्हणाले की, महाविद्यालयाच्या आवारात कुठल्याही एका धर्माचे उदात्तीकरण करणे, हे चुकीचे आहे. जर तुम्ही सत्यनारायणाची पूजा केली, तर आम्हाला ‘बकरी ईद’ साजरी करण्याची अनुमती द्याल का ? प्राचार्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आम्ही शिक्षणमंत्र्यांकडे करणार आहोत. (सत्यनारायणाच्या महापूजेला इतर प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विरोध केलेला नसतांना आंबेकर यांचाच विरोध का ? ‘बकरी ईद’ साजरी करणार्या आंबेकर मुसलमानांचा पुळका का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
सत्यनारायण पूजेला केला जाणारा विरोध म्हणजे विवेक हरवून बसल्याचेच लक्षण ! – अभाविप
१. या महाविद्यालयास शासनाचे अनुदान मिळते. त्यामुळे ‘शासनाचे महाविद्यालय’ असे याला संबोधता येणार नाही. यावर मालकी शासनाची नाही, तर एका संस्थेची आहे. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाला अनुमती द्यायची कि नाही, हा पूर्णपणे त्या संस्थेचा अधिकार आहे.
२. ‘सत्यनारायणाची पूजा’ हा परंपरेने चालत आलेला सामाजिक एकत्रीकरणाचा आणि सामाजिक एकोपा वाढवणारा उपक्रम आहे. तो कार्यक्रम तशाच पद्धतीने साजरा होत असेल, तर काही हरकत असण्याचे कारण नाही. गेली अनेक वर्षी हा कार्यक्रम येथे वादविवाद न होता पार पडत आहे, हे येथे आवर्जून लक्षात घ्यायला हवे.
३. हा त्या महाविद्यालयाच्या आवारातील त्यांच्या कर्मचारी वर्गाचा अंतर्गत विषय असून हा त्या कर्मचार्यांच्या श्रद्धेचा आणि परंपरेने चालत आलेल्या धार्मिक अनुष्ठानाचा विषय आहे.
४. अशा पद्धतीने विरोध होत असेल, तर ‘आपण विवेक हरवून बसलो आहोत’, असे वाटते.
सत्यनारायण पूजेमुळे थयथयाट, हा हिंदुद्वेषच ! – हिंदु जनजागृती समिती
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने काही विद्यार्थी आणि संघटना यांनी विरोध दर्शवला. हा विरोध म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली होणारे हिंदुविरोधाचे प्रकटीकरणच म्हणावे लागेल. देहली येथे ‘जेएन्यु’मध्ये महिषासुर जयंती साजरी केली जाते, ‘भारत तेरे तुकडे होंगे’, ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जातात; केरळ येथील महाविद्यालयात ‘बीफ पार्टी’ आयोजित केली जाते; तेव्हा मात्र या सेक्युलरवाद्यांची दातखीळ बसलेली असते. सत्यनारायण पूजेसंदर्भात थयथयाट हा हिंदुद्वेषच आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी व्यक्त केले आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयात गेली अनेक वर्षे तेथील कर्मचारी स्वखर्चाने सत्यनारायणाची पूजा करत आहेत. महाविद्यालयात पूजा होणे अथवा न होणे हा पूर्णपणे महाविद्यालयाचा अधिकार आहे. अशा प्रकारे पूजेला विरोध करून बहुसंख्य हिंदूंच्या परंपरा आणि धार्मिक आस्था यांना दुखावण्याचा होत असलेला प्रयत्न निषेधार्ह आहे. ज्या वेळी बीफचा विषय येतो, तोकड्या कपड्यांचा विषय येतो, त्या वेळी ‘आम्ही काय खावे, आम्ही काय घालावे’ अशी भूमिका घेणारे विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या टेंभा मिरवतात; मात्र हिंदूंनी कोणती पूजा करावी आणि करू नये, याबाबत विरोध करून आमच्या विचारस्वातंत्र्यावर घाला का घातला जात आहे. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आज सत्यनारायणाची पूजा करायला विरोध करणारे उद्या एकमेकांना भेटून नमस्कार करणे, कुंकू, टिळा लावणे आदींवरही आक्षेप घेतील. फर्ग्युसन महाविद्यालयाने अशा धर्मविरोधकांसमोर न झुकता अनेक वर्षांची परंपरा तशीच चालू ठेवावी, असे आवाहनही श्री. गोखले यांनी केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात