सांगली : डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसतांना २३ ऑगस्ट या दिवशी तासगाव येथील श्री. सूरज पोळ आणि श्री. सचिन कुलकर्णी या दोन सनातनच्या साधकांची नावे सामाजिक संकेतस्थळ, प्रसिद्धीमाध्यमे, तसेच दूरचित्रवाहिन्या यांद्वारे समोर आणण्यात आली. हा रचलेला कट असून या माध्यमातून साधकांची भरून न येणारी हानी झाली आहे. तरी अशी नावे सामाजिक संकेतस्थळे आणि प्रसिद्धीमाध्यमे यांद्वारे कुणी समोर आणली ? या साधकांची वैयक्तिक माहिती कुणी पुरवली ? याचा शोध घेऊन याला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य यांचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केली. हरिदास भवन येथे २५ ऑगस्ट या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य आणि सांगली जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता समीर पटवर्धन, शिवसेना कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री. सचिन चव्हाण, तासगाव येथील श्री. सूरज पोळ, श्री. सचिन कुलकर्णी आणि त्यांचे वयोवृद्ध वडील श्री. विठ्ठल कुलकर्णी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण पोळ उपस्थित होते.
या वेळी अधिवक्ता समीर पटवर्धन म्हणाले, ‘‘अलीकडील काही वर्षांत कोणत्याही पुरोगाम्याची हत्या झाल्यावर हिंदुत्वविरोधी विचारसरणी असलेल्या संघटनांकडून यामागे सनातनचा हात असल्याची सातत्याने आवई उठवली जात आहे. तासगाव येथे प्रत्यक्षात दोघांचे अन्वेषण झालेले नसतांना ‘त्यांना कह्यात घेतले, धाड टाकली’, अशी वृत्ते आली, तसेच काही ठिकाणी अटकेची वृत्ते आली. वस्तूत: असे काहीही घडलेले नाही. तरी या सर्व प्रकरणाचे प्रशासनाने सखोल अन्वेषण करून त्यातील सत्य बाहेर आणावे.’’
विशेष
१. पत्रकार परिषदेस प्रसिद्धीमाध्यमे आणि दूरचित्रवाहिन्या असे २४ प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. बहुतांश वाहिन्यांनी पत्रकार परिषद झाल्यावर स्वतंत्र मुलाखत घेतली.
२. पत्रकार परिषदेत श्री. सचिन कुलकर्णी, त्यांचे वडील श्री. विठ्ठल कुलकर्णी आणि श्री. सूरज पोळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. श्री. विठ्ठल कुलकर्णी यांनी अत्यंत पोटतिकडीने ‘आमच्याविषयी खोटी वृत्ते प्रसिद्ध झाल्यामुळे कुटुंबियांना कशा प्रकारे मनस्तापाला सामोरे जावे लागले’, हे पत्रकारांना सांगितले.
३. काही पत्रकारांनी ‘तुम्ही आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख आल्यावर त्यांना ओळखपत्र का विचारले नाही ? उद्या असे कोणीही पथकाचे नाव घेऊन येऊ शकतो’, अशी सूचना केली.
पत्रकार परिषदेसाठी गुप्तचर खात्यातील ३ पोलीस उपस्थित होते. यांतील दोघांनी भ्रमणभाषद्वारे छायाचित्रे काढली आणि पत्रकार परिषद, तसेच पत्रकार परिषदेनंतर वाहिन्यांनी घेतलेल्या मुलाखतीचेही ध्वनीचित्रीकरण केले. (राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्या व्यक्तींच्या पत्रकार परिषदेची माहिती घेण्यासाठी तीन-तीन पोलीस पाठवण्यापेक्षा पोलिसांनी हाच वेळ खर्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी वापरला असता, तर सार्थक झाले असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीच्या पत्रकाराकडून जाणीवपूर्वक सचिन कुलकर्णी यांच्या तोंडी चुकीची वाक्ये घालण्याचा प्रकार !
पत्रकार परिषद चालू असतांना ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने ‘तुम्हाला सुधन्वा गोंधळेकर यांच्या संदर्भात प्रश्न विचारला का ?’, असे विचारल्यावर श्री. सचिन कुलकर्णी यांनी ‘नाही’, असे उत्तर दिले. असे असतांना प्रत्यक्ष पत्रकार परिषदेत ‘झी २४ तास’चा पत्रकार तुम्ही ‘अगोदर तसे म्हटले आहे’, असेच रेटून बोलत होता. या वेळी तेथे उपस्थित असणार्या हिंदुत्वनिष्ठांनी ‘श्री. सचिन कुलकर्णी असे बोललेले नाहीत’, असे सांगितल्यावरही त्याची ऐकण्याची मन:स्थिती नव्हती.
त्याचप्रकारे प्रत्यक्षात वृत्त प्रसिद्ध होतांनाही ‘सचिन कुलकर्णी यांची स्वीकृती आणि नंतर घुमजाव’, असे वृत्त दाखवले. (अशा प्रकारे नसलेली वाक्ये तोंडी घालून आणि ‘घुमजाव’सारखी खोटी वृत्ते देऊन झी २४ तासने पीत पत्रकारितेचे उदाहरणच समोर ठेवले आहे ! अशी खोटी वृत्ते दिल्यानेच दिवसेंदिवस वृत्तवाहिन्यांची विश्वासार्हता अल्प होत आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात