सद्य:स्थितीत देशभरातील अधिवक्त्यांनी राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होणे आवश्यक ! – ज्येष्ठ विधिज्ञ भरत देशमुख, महाराष्ट्र-गोवा बार काऊन्सिलचे माजी अध्यक्ष
जळगाव – भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात राष्ट्रनिष्ठ अधिवक्त्यांचे योगदान फार मोठे होते. सद्य:स्थितीतही राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी केवळ शिबिराला उपस्थित असलेल्यांनीच नव्हे, तर जळगाव जिल्ह्यातील, संपूर्ण भारतभरातील अधिवक्त्यांनी या कार्यात सहभागी होणे अनिवार्य आहे, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्र-गोवा बार काऊन्सिलचे माजी अध्यक्ष श्री. भरत देशमुख यांनी केले. ते हिंदु विधिज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या हिंदु अधिवक्ता शिबिरात बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ श्री. भरत देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ श्री. सुशील अत्रे, ज्येष्ठ विधिज्ञ श्री. प्रविणचंद्र जंगले, हिंदु विधिज्ञ परिषदेचे तसेच संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठात प्रॅक्टिस (काम) करणारे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी आणि सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यश लॉन, भिकमचंद जैन नगर येथे झालेल्या या शिबिराचा लाभ २५ अधिवक्त्यांनी घेतला.
शिबिराच्या प्रारंभ शंखनाद करून करण्यात आला. सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश श्री. वाघुळदे यांनी वाचून दाखवला. या वेळी हिंदु विधिज्ञ परिषदेच्या धर्मकार्यातील सहभागाची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. शिबिराचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी केले. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कार्यरत असणार्याला अधिवक्त्यांचे साहाय्य आणि मार्गदर्शन कुठे कुठे लागते याविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी सांगितले.
हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी वर्तमान कायद्यांचा प्रभावी वापर करणे आवश्यक ! – ज्येष्ठ विधिज्ञ सुशील अत्रे
राष्ट्रद्रोह्यांना वठणीवर आणण्यासाठी सध्या जे प्रचलित कायदे आहेत, त्यांचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व अधिवक्त्यांनी कायद्यांचा अभ्यास करून राष्ट्ररक्षणासाठी पुढे आले पाहिजे. निरपराध राष्ट्रभक्तांना खोट्या खटल्यांतून दोषमुक्त करण्यासाठीही या अभ्यासाचा लाभ निश्चित होईल.
राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याची इच्छा असणार्यांसाठी उत्तम व्यासपीठ ! – ज्येष्ठ विधिज्ञ प्रविणचंद्र जंगले
आजचे हे शिबिर म्हणजे एकप्रकारे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधिज्ञ परिषद यांनी राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याची इच्छा असणार्यांसाठी उत्तम व्यासपीठच निर्माण केले आहे. सध्या सनातन संस्थेवर जे आरोप होत आहेत, ते पाहून वाटते की राजकीय स्वार्थासाठी हे सर्वपक्षीय लोक सनातन सारख्या संघटनेला बळी बनवत आहेत.
देशातील सर्वच क्षेत्रात प्रादुर्भाव झालेल्या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात न्याय्य लढाई लढणे काळाची आवश्यकता ! – हिंदु विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी
आज देशाची वर्तमान स्थिती पहाता सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार, लाचलुचपत आदी गैरप्रकार होतांना दिसतात. शिक्षण क्षेत्र असो की, आरोग्य क्षेत्र असो, प्रशासकीय विभाग असोत की, अगदी न्यायव्यवस्था असो सर्वच क्षेत्रात दुष्प्रवृत्तींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या दुष्प्रवृत्ती सर्वसामान्य जनतेचे शोषण करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात न्याय्य लढा देऊन जनतेला शोषणमुक्त करण्यासाठी आता अधिवक्त्यांनाच कंबर कसावी लागणार आहे.
सध्या सनातन संस्थेच्या संदर्भात जो अपप्रचार चालू आहे किंवा जे बिनबुडाचे आरोप आज सर्वत्र केले जात आहेत, ते न्यायालयात अजिबात टिकणार नाहीत. एकेका हिंदुत्वनिष्ठाला अथवा हिंदुत्वनिष्ठ संघटनेला अशा पद्धतीने जर दडपले जात असेल तर त्यांनाही कायदेशीर साहाय्य करणे हे आपल्यासारख्या अधिवक्त्यांचे कर्तव्यच आहे.
क्षणचित्रे
१. या शिबिराच्या तयारीसाठी जून २०१८ मध्ये गोवा येथे झालेल्या अधिवक्त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या जळगावच्या २ अधिवक्त्यांनी (अधिवक्ता निरंजन चौधरी आणि अधिवक्ता योगेश पाटील) पुढाकार घेतला.
२. येथील ज्येष्ठ विधिज्ञ श्री. प्रविणचंद्र जंगले हे शिबिराच्या दिवशीच सकाळी मुंबईहून प्रवास करून आले होते, तरी त्यांनी अधिवेशनाला येण्याचे टाळले नाही. ते उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
३. शिबिरात झालेल्या गटचर्चेत उपस्थित सर्व अधिवक्त्यांनी विनामूल्य कायदेशीर साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवली.
४. अधिवक्त्यांनी धर्मशिक्षण घेण्यासाठी आणि कायदेशीर मार्गदर्शनासाठी १५ दिवसांतून एकदा एकत्र येण्याचे निश्चित झाले.
५. बर्याच वर्षांनी जळगावमधील हिंदुत्वनिष्ठ विचाराच्या ३ ज्येष्ठ विधिज्ञांचे (अधिवक्ता भरत देशमुख, अधिवक्ता सुशील अत्रे, अधिवक्ता प्रविणचंद्र जंगले) एकत्र मार्गदर्शन लाभले, याचाही आनंद झाला, असे एका अधिवक्त्याने उत्साहाने सांगितले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती समाजाला देत असलेल्या धर्मशिक्षणाविषयी गौरवोद्गार !
सनातन आणि समिती धर्माचरणाविषयी करत असलेले मार्गदर्शन अमूल्य ! – अधिवक्ता भरत देशमुख
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना देत असलेले धर्मशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. सनातनचे अधिवक्ता श्री. केसरकर यांनी मला १९९८ मध्ये याविषयी मार्गदर्शन केले होते. त्यात नमस्कार कसा करावा, प्रार्थना कशी करावी याविषयी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा मला पुष्कळ लाभ झाला. सर्वांनाच ते उपयुक्त आहे.