धुळे : सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना खोट्या प्रकरणांत गोवून बंदी आणण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात येथे उपजिल्हाधिकारी श्री. अरविंद अंतुर्ले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. संजय शर्मा, स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास राजपूत, हिंदु एकता आंदोलन पक्षाचे श्री. मनोज घोडके, धर्मप्रेमी श्री. निलेश मिंड, कुणाल सुरपणी, श्री. भगवान चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल, सनातन संस्थेचे श्री. चेतन जगताप आणि अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. सनातन संस्था आणि तिचे साधक गेली दोन दशकांहून अधिक काळ निःस्पृहपणे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा प्रचार करून समाजाला अध्यात्म, साधना, संस्कृती आणि राष्ट्र यांविषयी जागृत करत आहेत. तसेच भ्रष्टाचार, जनतेची लुटालूट, अन्याय यांविरोधात वैध मार्गाने लढा देत आहेत. त्यामुळे समाज नैतिकता आणि धर्माचरण यांकडे वळून सुखशांतीच्या आणि समृद्ध जीवनाच्या मार्गाकडे जात आहे.
२. आताच्या केंद्र सरकारमधील केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनीही सनातन बंदीविषयी माहिती देतांना सांगितले होते की, केंद्र सरकारद्वारे सनातन संस्थेला कायदाद्रोही संघटना असे कोणत्याही प्रकारे घोषित केलेले नाही, तसेच आताच्या स्थितीत केंद्र शासनाकडे सनातन संस्थेवर बंदीचा कोणताही प्रस्ताव आणि विचार नाही. असे असतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे, हे चुकीचे आहे.
३. हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करत असल्यानेच ही संस्था आणि या संघटना, त्यांचे साधक, कार्यकर्ते विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर बंदी घालण्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास तो फेटाळण्यात यावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात