Menu Close

हिंदु न्यायालयांमध्ये मनुस्मृतीच्या आधारे खटले सोडवले जाणार : हिंदू महासभा

हिंदु न्यायालय स्थापन करण्यावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाची उत्तरप्रदेश सरकारला नोटीस

शरीयत न्यायालये चालू असतांना गप्प बसणारे निधर्मीवादी आता हिंदु न्यायालये स्थापन झाल्यामुळे पेटून उठतील, हे वेगळे सांगायला नको !

नवी देहली : हिंदु महासभा देशभरात हिंदु न्यायालये स्थापन करणार आहे. या न्यायालयात मनुस्मृतीच्या आधारे खटले सोडवले जाणार आहेत. यांतील पहिले न्यायालय मेरठ येथे स्थापन करण्यात आले आहे. जुना आखाड्याच्या महंत डॉ. पूजा पांडे या त्याच्या पहिल्या न्यायाधीश असणार आहेत. या न्यायालयाच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्यावर न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला आणि मेरठच्या जिल्हाधिकार्‍यांना नोटीस बजावून या न्यायालयाची माहिती देण्यास सांगितले आहे. या याचिकेवर ११ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. (शरीयत न्यायालये स्थापन झाल्यावर नव्हे, तर हिंदु न्यायालये स्थापन झाल्यावर भारतीय घटना धोक्यात येते ! हेच का निधर्मीवाद्यांचे सेक्युलरिझम ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. हिंदु न्यायालयांमध्ये भूमीचे वाद, घराच्या वाटण्या आणि वैवाहिक समस्या सामंजस्याने सोडवल्या जाणार आहेत. ज्यांच्या आधारावर हिंदु न्यायालय काम करणार आहे, ते न्यायालयाचे नियम २ ऑक्टोबरला सार्वजनिक केले जाणार आहेत.

२. न्यायालयाने हिंदु न्यायालयाची नोंद घेतल्यावरून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, बरे झाले हे प्रकरण न्यायालयासमोर आले. जर या देशात मुसलमान समाजासाठी शरीयत न्यायालये असू शकतात, तर मग हिंदु न्यायालये असण्यात काय अयोग्य आहे ? तसेही देशाच्या न्यायालयात बरेच खटले प्रलंबित आहेत. त्यांतील काहींचा निवाडा आम्ही केला, तर न्यायालयाचा वेळही वाचेल. तसेच शरीयत न्यायालये बंद करण्यासाठी आम्ही सरकारला अनेक वेळा पत्रे पाठवली; पण त्याची कोणीही नोंद घेतली नाही. जर देशात शरीयत न्यायालये असल्याने कोणाला त्याची अडचण होत नाही, मग हिंदु न्यायालये चालू झाल्यास कोणती अडचण येईल?

महंत डॉ. पूजा पांडे यांनी हिंदु न्यायालयाविषयी मांडलेली सूत्रे

१. आम्ही पुन्हा सनातन न्यायपद्धत जिवंत करणार आहोत. ज्याप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम राम न्याय देत होते, आमच्या नारद संहितेमध्ये न्यायाधीश कसा असावा, याची माहिती आहे, मनुस्मृतीमध्ये न्यायाची पद्धत आहे, या सर्वांचा अवलंब आम्ही करणार आहोत.

२. कौटुंबिक प्रश्‍न, आपापसांतील वाद, हुंडा आदी समस्यांवर पंचायतमध्ये जसा निवाडा होतो, तसाच निवाडा या न्यायालयात करण्याचा प्रयत्न होणार आहे.

३. इंग्रजांनी भारतावर राज्य केले, तेव्हा भारतात धर्मशास्त्राद्वारे चालणारी न्यायप्रणाली होती आणि त्यामुळे भारतीय संघटित आहेत, हे इंग्रजांच्या लक्षात आले. त्यावर त्यांनी स्वतःची न्यायप्रणाली चालू करून त्याद्वारे न्याय देण्यास प्रारंभ केला. प्रत्यक्षात हिंदूंनी न्यायप्रणाली इतकी चांगली आहे की, आम्ही गुन्हेगाराला अध्यात्माच्या आधारे सुधारू शकतो. तसेच ती न्याय देण्यासही सोपी आहे. आमच्या सनातन न्यायप्रणालीमध्ये ६ मास गोसेवा करण्यासारख्या शिक्षा होत्या.

४. राजकीय नेते लोकांना धर्म आणि जात यांच्या आधारे विभागतात; मात्र न्याय कधी जातीच्या आधारे दिला जाऊ शकत नाही. न्याय देतांना जात आणि धर्म कधीही विचारण्यात येत नाही. या न्यायालयामध्ये केवळ हिंदू म्हणून न्याय दिला जाईल.

५. जसे कुटुंबामध्ये ज्येष्ठ वागतात, तसेच आम्ही आमच्या न्यायालयातून न्याय देणार आहोत. यात भेदभाव केला जाणार नाही. सध्याच्या न्यायप्रणालीमध्ये ज्याने हत्या केली, त्यालाही अधिवक्ता मिळतो आणि तो खुन्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो.

६. आम्ही आमच्या न्यायाद्वारे हृदयपरिवर्तन करणार आहोत. कुणी खुनी असला, तर त्याला आरोप मान्य करण्याच्या स्थितीत आणण्यासारखी परिस्थिती आमच्याकडे असेल.

७. आमच्या न्यायालयातून मिळालेल्या न्यायाविषयी कुणी समाधानी नसेल, तर तो भारतीय न्यायप्रणालीच्या आधारे न्याय मागू शकतो. त्याला कोणतेही बंधन असणार नाही. तसेच अशी प्रकरणे ज्या आमच्या न्यायव्यवस्थेच्या बाहेरची आहेत, त्यावर आम्ही सुनावणी करणार नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *