Menu Close

नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी सनातनच्या अपकीर्तीच्या विरोधात पत्रकार परिषद

सनातनवर लादण्यात येत असलेली ‘अघोषित बंदी’ कदापि सफल होऊ देणार नाही ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

मुंबई : नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले वैभव राऊत यांच्यासह ८ जण हे सनातनचे साधक नाहीत. हे सर्व जण सनातनचे साधक असल्याचा दुष्प्रचार काही पुरोगामी, काँग्रेस आदी पक्षांचे राजकीय नेते, दाभोलकर कुटुंबीय यांच्यासारख्यांकडून जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. यामुळे संस्थेची मानहानी झाली आहे. जाणीवपूर्वक आमच्या विरोधात जी खोटी वृत्ते पसरवली जात आहेत, त्या विरोधात कायदेशीर कारवाई करू. हिंदुत्वाची अपकीर्ती करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा आणि सनातनसारख्या निष्पाप संस्थेला संपवण्याचा हा प्रकार आहे. ‘कुत्र्याला पिसाळलेले म्हणा आणि ठार मारा’ हे या धर्मविरोधकांचे राजकीय षड्यंत्र आहे. असे असले, तरी सनातन संस्थेवर लादण्यात येत असलेली ‘अघोषित बंदी’ आम्ही कदापि सफल होऊ देणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात २७ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केले. नालासोपारा प्रकरणी पुरोगामी, निधर्मी आणि माध्यमे यांच्याकडून सनातनची मोठ्या प्रमाणावर अपकीर्ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

माध्यमांनी ‘अनधिकृत सूत्रांकडून’ माहिती न घेता सनातनच्या प्रवक्त्यांकडून माहिती घ्यावी आणि खोट्या गोष्टी पसरवणे थांबवावे. सूज्ञ पत्रकारांनी या सनातनविरोधी षड्यंत्राला बळी पडू नये आणि सहस्रो समर्पित साधकांच्या श्रद्धेवर घाला घालू नये, असे आवाहनही श्री. राजहंस यांनी या वेळी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि मुंबई समन्वयक श्री. सागर चोपदारही उपस्थित होते.

‘या स्फोटकांचा वापर मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी केला जाणार होता, असा आरोप एका आमदाराने केला, तसेच बकरी ईदला बॉम्बस्फोट करण्याचा आरोप असल्याचे एका समाजवादी आमदाराने सांगितले, तर ५०० प्रशिक्षित कार्यकर्त्यांची सेना असल्याचा आरोप अन्य एका आमदाराने केला.

हे आरोप खोटे असून हा आमच्या विरोधात करण्यात आलेला अपप्रचार आहे. अशा प्रकारे जातीयवादी आरोप करणार्‍यांची सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही श्री. राजहंस यांनी या वेळी केली.

पत्रकार परिषदेत श्री. राजहंस यांनी मांडलेली रोखठोक सूत्रे

१. तपासयंत्रणा किंवा गृहविभाग ही ‘अधिकृत सूत्रे’ असतात. या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने कोणत्याही संघटनेचे नाव घेतलेले नाही, तसेच तपास प्राथमिक अवस्थेत असल्याचे म्हटले आहे, तसेच गृहराज्यमंत्र्यांनीही कोणाचेही नाव घेतलेले नाही. असे असतांना सनातनला जाणीवपूर्वक ‘लक्ष्य’ केले जात आहे. हा आमच्यावरील अन्याय आहे. हा अन्याय थांबवावा. आम्ही ज्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणले, ते आमच्यावर आरोप करत आहेत. आम्हाला प्रश्‍न पडला आहे की, मग या सर्व बातम्यांच्या मागे असा कोणता ‘सोर्स’ आहे ?

२. कोणत्याही कागदपत्रात आमचे नाव नसतांनाही बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. आमच्यावरील आरोपात तथ्यच नाही. त्यामुळे आमच्यावर बंदीचा प्रश्‍नच येत नाही. सनातन संस्थेने देशविघातक कृत्य केले, असा कुठेही उल्लेख नाही. असे असतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे, हे खोडसाळ आणि तथ्यहीन आहे.

३. आम्ही देशाच्या सुरक्षेत अडथळा आणलेला नाही. सनातन संस्था ही समाजात घटनात्मक मार्गाने अध्यात्मप्रसाराचे कार्य करणारी संस्था असून सनातनची कोणतीही शिकवण हिंसाचाराच्या दिशेने नाही. आजवर गेली २७ वर्षे अव्याहतपणे चालू असलेले तेजस्वी धर्मप्रसाराचे कार्य करणारी संस्था आहे. आजपर्यंत सनातन संस्थेच्या विरोधात एकही गुन्हा नोंद झालेला नाही.

४. आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेल्यांपैकी कळसकर, अंधुरे, सुरळे बंधू आणि रेगे ही पाच नावे तर आम्ही प्रथमच ऐकली आहेत. अन्य कार्यकर्ते सनातनच्या हिंदुत्वाच्या कार्यात सहभागी झाले, म्हणजे ते साधक आहेत असे नव्हे. त्यांना अटक केल्याने ‘सनातनवर बंदी घाला’ वा ‘सनातनच्या प्रमुखांना अटक करा’, असे म्हणणे, म्हणजे काँग्रेसचे समर्थन करणार्‍या पक्षाच्या नेत्याला अटक झाल्यावर ‘काँग्रेसवर बंदी घाला’ वा ‘राहुल गांधींना अटक करा’, असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे. सनातनशी ३२० हिंदुत्वनिष्ठ संघटना जोडलेल्या आहेत.

सायंकाळी ६ वाजेपर्यंत १ लक्ष ७७ सहस्रांहून अधिक जणांपर्यंत पत्रकार परिषद पोहोचली

प्रत्यक्ष पत्रकार परिषद १८ सहस्रांहून अधिक जणांनी पाहिली (व्ह्यूअर्स). सायंकाळी ६ वाजेपर्यंत पत्रकार परिषदेचा व्हिडिओ १ लक्ष ७७ सहस्रांहून अधिक जणापर्यंत पोहोचला (रीच), तर २ सहस्र ३२३ जणांनी अन्यांना पहाण्यासाठी पाठवली (‘शेअर’ केली). या समवेतच ३ सहस्र ६०२ हून अधिक धर्माभिमान्यांनी परिषद ‘लाईक’ केली. या पत्रकार परिषदेला ६० हून अधिक वृत्तपत्रांचे, तसेच राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीचे हिंदूसंघटनाचे कार्य रोखण्यासाठी षड्यंत्र ! – सुनील घनवट

हिंदु जनजागृती समिती ही समाजाला धर्मशिक्षण देऊन हिंदूसंघटनाचे कार्य करते. यामुळे विविध विचारसरणी, कार्यपद्धती असणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित करण्याचे कार्य समितीच्या माध्यमातून केले जात आहे. यामुळे देशभरातील संघटना जोडल्या जात आहेत. हिंदूंचे प्रभावी संघटन होऊन आज हिंदूंवरील अन्यायांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे रहात आहे. यामुळे हिंदूविरोधी शक्ती हे कार्य बंद पाडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला लक्ष्य करत आहेत; मात्र समितीचे हिंदूसंघटनाचे कार्य हिंदु समाज प्रत्यक्ष पहात असून अशा षड्यंत्राला तो बळी पडणार नाही, अशी आमची खात्री आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *