साधना हाच हिंदु राष्ट्र निर्मितीचा एकमेव मार्ग ! – रमेश शिंदे
बूंदी (राजस्थान) : येथील बालाजी मंदिरात वानर सेनेचे श्री. संदीपकुमार श्रुंगी यांच्या पुढाकाराने एक बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे म्हणाले की, आपण रामराज्यासाठी कार्य करत आहोत; मात्र भगवान श्रीरामाचे स्मरण करत नाही. आपणास ज्या आध्यात्मिक शक्तीची आवश्यकता आहे, ती मिळत नाही. श्रीरामाचे नाव दगडांवर लिहिल्यावर ते दगड पाण्यात तरंगू लागले, हे रामायणातील प्रत्यक्ष उदाहरण आहे. त्याप्रमाणेच आपण साधना केल्याने शक्ती मिळेल आणि हिंदु राष्ट्राची निर्मिती करणे शक्य होईल. या वेळी राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांचे समिती समन्वयक श्री. आनंद जाखोटियाही उपस्थित होते.
हिंदु राष्ट्र हा हिंदु समाजाचा मूलभूत अधिकार ! – रमेश शिंदे
जोधपूर (राजस्थान) : हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत राजस्थानच्या जोधपूर येथे हिंदुत्वनिष्ठांची एक बैठक नुकतीच घेण्यात आली. श्री. शक्ती सिंह यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वश्री रमेश शिंदे आणि आनंद जाखोटिया यांनी या बैठकीला संबोधित केले. या वेळी बोलतांना श्री. रमेश शिंदे म्हणाले, देशातील सर्व हिंदु संघटना हिंदूंवर होणारे अत्याचार, गोहत्या, मंदिर सरकारीकरण, धर्मांतर, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद इत्यादी सर्व समस्यांच्या विरोधात वेगवेगळे लढत आहेत; परंतु या सर्व समस्यांचे तोडगा केवळ हिंदु राष्ट्र आहे. देशाला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करणे आणि साधना करणे आवश्यक आहे. देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याची मागणी करणे, हा हिंदूंचा मूलभूत अधिकार आहे. हिंदूंनी राजकीय नेत्यांसमोर हिंदु राष्ट्राची मागणी ठेवली पाहिजे.
मंदिर अधिग्रहित करणे राज्यघटनेच्या विरुद्ध ! – रमेश शिंदे
झुंझुनू (राजस्थान) : हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत राजस्थानच्या झुंझुनू येथे श्री. रूपेश अग्रवाल यांच्या पुढाकाराने हिंदुत्वनिष्ठांची एक बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत सर्वश्री रमेश शिंदे आणि आनंद जाखोटिया यांनी मार्गदर्शन केले. सध्याच्या लोकशाहीमध्ये बळावलेल्या दुष्प्रवृत्ती आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता यांविषयी उपस्थितांचे दिशादर्शन करण्यात आले. या वेळी बोलतांना श्री. रमेश शिंदे म्हणाले, सरकार हिंदूंची मंदिरे कह्यात घेत आहे आणि त्यामध्ये मोठमोठे घोटाळे केले जात आहेत. तिरुपती मंदिराचा विश्वस्त ख्रिस्ती आहे. ख्रिस्ती एखाद्या हिंदु मंदिराचा विश्वस्त होऊ शकतो का ? भक्तांकडून अर्पण स्वरूपात येणार्या मंदिरांच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय केला जात आहे. सरकारने आजपर्यंत एकही चर्च किंवा मशीद कह्यात घेतलेली नाही. देश धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे सरकारने मंदिर कह्यात घेणे राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे.
बैठकीला उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी विषय समजून घेतला आणि समाजामध्ये जागृती करण्याच्या दृष्टीने सिद्धता दर्शवली.
हिंदु जनजागृती समितीकडून बीकानेर (राजस्थान) येथील पू. भुमानंदजी गिरी महाराज यांची भेट
भीनासर (राजस्थान) : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्याच्या भीनासर येथील पू. भुमानंदजी गिरी महाराज यांची भेट घेतली. या वेळी समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया हेही उपस्थित होते. पू. स्वामीजींना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करतांना पू. स्वामीजींनी धर्मांधांकडून हिंदूंवर होणार्या अत्याचारांचा निषेध केला, तसेच हिंदूंनी संविधानिक मार्गाने स्वत:वर होणार्या अन्यायाच्या विरोधात लढा द्यावा, असा सल्ला दिला. समितीकडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होणार्या प्रयत्नांची पू. स्वामीजींनी प्रशंसा केली.
बीकानेरमध्ये हिंदु युवकांशी भेट !
बीकानेर येथे हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत श्री. सावन सोनी यांच्या माध्यमातून हिंदु युवकांची एक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सर्वश्री रमेश शिंदे आणि आनंद जाखोटिया यांनी मार्गदर्शन केले. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने आवश्यक कार्यक्रमाविषयी त्यांनी माहिती दिली.