Menu Close

पनवेल येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा मोर्चाद्वारे दृढनिश्‍चय !

सनातन संस्थेसाठी सर्व संघटना आणि संप्रदाय एकत्र येऊ ! : मोर्च्याला आलेल्या सर्व हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

पनवेल (रायगड) : सनातन संस्थेमुळे समस्त हिंदु समाजाला धर्मशिक्षण मिळत आहे. सनातन संस्थेने सांगितलेल्या साधनेमुळे अनेकांचे जीवन आनंदी झाले आहे. एक हिंदू म्हणून आम्हा प्रत्येकाला सनातनच्या कार्याचा अभिमान आहे. आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्‍या सनातनचा गौरव करण्याचे सोडून, राजकीय स्वार्थासाठी सनातनला लक्ष्य करण्यात येत आहे. आध्यात्मिक क्षेत्रात दीपस्तंभासम मार्गदर्शक असलेल्या सनातन संस्थेची अशा प्रकारे होणारी गळचेपी हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. सर्व संघटना आणि संप्रदाय एकत्र येऊन हिंदुतेज जागवणार्‍या सनातनच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असा दृढनिश्‍चय पनवेल येथे सनातनच्या समर्थनासाठी एकवटलेल्या समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला.  मोर्च्यात ५०० हून अधिक हिंदू उपस्थित होते.

पनवेल येथील हिंदुत्व सन्मान मोर्च्यातील मान्यवरांचे जाज्वल्य विचार आणि हिंदुत्वप्रेमींचे अभिप्राय !

शिवसेना नेहमीच सनातनच्या समवेत आहे ! – बबनदादा पाटील, माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना

शिवसेना आणि शिवसेनापक्षप्रमुख आतापर्यंत नेहमीच हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्याप्रमाणे आजही ते सनातनच्या पाठीशी उभे आहेत. सनातन हिंदु धर्माचा प्रचार करते; म्हणून तिच्यावर बंदी घालणे निषेधार्ह आहे. प्रसिद्धी आणि प्रसार माध्यमांनी कोणालाही आरोपी करून चुकीचे छापू नये. हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये. सनातनचे विचार मनाला भिडणारे आहेत. वर्ष २००८ मध्ये बंदी आणण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी आमदारांना विधानसभेत आवाज उठवण्यास सांगितला होता. शिवसेना नेहमीच तुमच्या समवेत आहे !

मान्यवरांचे मार्गदर्शक विचार

आतंकवादी ठरवून हिंदूंची अपकीर्ती करण्यासाठीच सनातनवर आरोप ! – सौ. सुनीता पाटील, सनातन संस्था

सनातन संस्था समाजात संविधानिक मार्गाने अध्यात्मप्रसाराचे कार्य करत असून सनातनची कोणतीही शिकवण हिंसाचाराच्या दिशेने नाही. त्यामुळे सनातनवर बंदीची मागणी करणेच हास्यास्पद आहे. पुरोगामी मंडळी आणि काही राजकीय पक्षाचे हिंदुद्वेष्टे नेते सनातन संस्थेला गुन्हेगार ठरवू पहात आहेत. प्रत्यक्षात मात्र आतंकवादविरोधी पथकाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सनातन संस्थेचे चौकशीमध्ये नाव आले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. असे असतांना केवळ हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी सनातनवर बेछूट आरोप करण्यात येत आहेत.

‘सनातन संस्थेचा मास्टरमाईंड कोण आहे’, असे विचारले जाते. सनातनचा मास्टरमाईंड साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे.

सनातनच्या बंदीची मागणी करणार्‍या हिंदुद्वेषी राजकीय पक्षांना समस्त हिंदु समाज जागा दाखवून देईल ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मागील २७ वर्षांपासून सनातन संस्थेचे अव्याहतपणे चालू असलेले धर्मप्रसाराचे कार्य हिंदु समाजाने पाहिले आहे. त्यामुळे खरे कोण आणि खोटे कोण, हे हिंदु समाज चांगलाच जाणतो. जे राजकीय पक्ष सनातनच्या बंदीची मागणी करत आहेत, त्यांनी प्रथम स्वत:च्या पक्षाची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी पहावी आणि एकही गुन्हा नोंद नसलेल्या सनातनवर आरोप करण्याचा निर्लज्जपणा सोडून द्यावा. सनातनसारख्या आध्यात्मिक संस्थेची जे अपकीर्ती करत आहेत, त्यांना समाज लक्षात ठेवून आहे. सनातनच्या बंदीची मागणी करणार्‍या हिंदुद्वेषी राजकीय पक्षांना समस्त हिंदु समाज जागा दाखवून देईल.

वारकरी सनातनच्या पाठीशी ! – ह.भ.प. बापू महाराज रावकर, अध्यक्ष, कोकण प्रांत राष्ट्रीय वारकरी सेना

सनातन संस्था ही संत निर्मिती करणारी संस्था आहे. अशा संस्थेवर बंदीची मागणी करणे दुर्दैव आहे. आम्ही वारकरी सनातनच्या पाठीशी आहोत. सरकार सनातनवर बंदी आणू पहात आहे, ती केवळ सनातनवर नसून आम्हा सर्व हिंदुत्वनिष्ठांवर आहे. सर्व हिंदु संघटना सनातनच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत, हे सरकारने विसरू नये.

सनातन संस्थेविषयी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

केवळ आणि केवळ सनातनच हिंदु राष्ट्र स्थापन करू शकते ! – गिरीश नंदलाल गुप्ता, शिवसेना शहर संघटक, खारघर

सर्व महत्त्वाची कामे बाजूला ठेवून एक हिंदू म्हणून मोर्च्यात सहभागी झालो आहे, हे मी माझे कर्तव्यच समजतो. केवळ आणि केवळ सनातनच हिंदु राष्ट्र स्थापन करू शकते. हेच साम्यवाद्यांना नको आहे; म्हणूच हे सनातनवर बंदीची मागणी करत आहेत. काही झाले, तरी आम्ही सर्व सनातनच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

आतंकवादविरोधी पथकाचीच चौकशी केल्यास सत्य समोर येईल ! – प्रियेष जैयस्वाल, हिंदू राष्ट्र सेना, अंधेरी

आज आतंकवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित, श्री. सुधाकर चतुर्वेदी यांच्या आयुष्याची अपरिमित हानी केली. सबळ पुरावे नसतांना निर्दोष हिंदूंना अटक केली जात आहे. चौकशी करायची असेल, तर सनातनची नाही, तर आतंकवादविरोधी पथकाचीच करा. म्हणजे संपूर्ण जगाला नक्की कळेल की, या षड्यंत्रामागे कोण आहे ?

सनातन संस्था मंदिराप्रमाणे असून तिच्या विरोधात रचल्या जाणार्‍या कटाला एकत्र येऊन विरोध करा ! – सौ. शीतल सोनवणे, अध्यक्ष, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, रायगड

सनातन संस्था ही काळाची आवश्यकता आहे. संस्थेचे विचार आणि कार्यप्रणाली यांचा मी मनापासून आदर करते. संस्थेने उत्कृष्ट असे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले आहेत. संस्थेतील साधक आम्हाला सामाजिक कार्यासाठीही पुष्कळ साहाय्य करतात. सनातन आमच्यासाठी मंदिराप्रमाणे आहे. या मंदिरावर जर अन्याय होत असेल, मीडियावाले संस्थेचे नाव मलीन करण्याचा कट रचत असतील, तर याचा आपण सर्वांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. समाजकंटकांना आवाहन आहे की, जे बोलाल, ते पुराव्यांसाहित बोला. पुराव्याअभावी संस्थेवर कोणत्याही प्रकारची टीका करू नका !

विश्‍व हिंदू परिषद आणि महाराणा प्रताप बटालियन यांचा संस्थेला पाठिंबा ! – अजय सिंग सेंगर, अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन

सनातन संस्थेविरुद्ध अहिंदूंकडून जो अपप्रचार केला जात आहे, त्याचा मी निषेध करतो. सनातन एक धर्मनिष्ठ आणि आदर्श अशी संस्था आहे. आम्हाला अभिमान आहे. विश्‍व हिंदू परिषद आणि महाराणा प्रताप बटालियन यांचा संस्थेला पाठिंबा आहे. सर्व क्षत्रिय हिंदूंना मी आवाहन करतो की, त्यांनी मोर्च्यात सहभागी व्हावे. छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप, प्रभु श्रीरामचंद्र यांचा आदर्श घेऊन ही संस्था कार्य करत आहे. संस्थेला पाठिंबा देणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे.

  • हिंदुत्वनिष्ठांना होणारा विरोध मतांच्या राजकारणासाठी चालू आहे. शिवसेना कायम हिंदुत्वाच्या बाजूने भक्कमपणे उभे राहील ! – श्री. माधवराव भिडे, ज्येष्ठ शिवसैनिक आणि रायगडचे माजी जिल्हाप्रमुख
  • सनातन संस्थेला आम्ही अनेक वर्षे ओळखतो. धर्माचे कार्य करणार्‍यांवर बंदी घालणे चुकीचे आहे. – हरचंद सिंग सग्गु, गुरुद्वारा, पनवेल
  • कलियुगात सनातन संस्था धर्मरक्षणासाठी कार्य करीत असल्याने तिच्यावर बंदी आणू नये, अशी जनतेची मागणी आहे ! – ह.भ.प. भोपतराव महाराज, पेण, रायगड.
  • हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एकत्र येणे आवश्यक असून हिंदू संघटित व्हायला हवेत. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातनच्या माध्यमातून प्रयत्न करणार. एक दिवस हिंदु राष्ट्र नक्की स्थापन होईल ! – श्री. विनोद वाघमारे, उपसरपंच, देवद, पनवेल
  • सनातन संस्था साधनेच्या माध्यमातून देशाची सेवा, धर्माचे रक्षण आणि पारंपरिक संस्कृती जपण्याचे कार्य करते. स्वार्थी हिंदूंना हे बघवत नाही. – श्री. वसंत दहिफळे, धर्मप्रेमी आणि अध्यक्ष, जनता सेवाभावी संस्था
  • सनातनला म्हणजे पर्यायाने हिंदूंना दाबण्याचा हा प्रयत्न आहे. हे पूर्णतः चुकीचे आहे. हिंदुत्वनिष्ठ असे करूच शकत नाहीत. मीही आता सनातनचा साधक होईन. – श्री. संजय मालजी, अध्यक्ष, भक्तशक्ती श्री हनुमान मंदिर, मानसरोवर
  • सर्व हिंदु संस्थांना माझी विनंती आहे की, संस्थेवर बेछूट आणि बेताल आरोप करणार्‍या प्रसारमाध्यमांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदु संस्थांनी एकत्रित येऊन याचा निषेध करावा. सर्वांनी मोर्च्यामध्ये सहभागी व्हावे ! – अशोक गिलडा, सचिव, बालाजी मंदिर विश्‍वस्त

मोर्च्याचे ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. हा मोर्चा २९ सहस्र लोकांपर्यंत पोहोचला. ५ सहस्र ९०० जणांनी पाहिला, तर ४२३ पेक्षा अधिक लोकांनी तो इतरांना शेअर केला. १९८ जणांनी ‘आवडले’ असा अभिप्राय नोंदवला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *