हिंदूंनी संकटकाळात स्वरक्षण होण्यासाठी प्रथमोपचार प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – नागेश गाडे, समूह संपादक, सनातन प्रभात
रामनाथी (गोवा) : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासह अनेक संतांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच संकटकाळास आरंभ होऊन जग तिसर्या महायुद्धात ढकलले जाणार आहे. येणार्या काळात नैसर्गिक संकटांसमवेत अनेक मानवनिर्मित संकटे जसे आतंकवाद, युद्ध इत्यादी निर्माण होणार आहेत. या संकटकाळात शासन-प्रशासन हिंदूंचे रक्षण करू शकेल अथवा त्यांना पुरेसे साहाय्य मिळेल याची शाश्वती नाही. नुकत्याच केरळ येथील पूरग्रस्त परिस्थितीसमवेत उत्तराखंड येथील जलप्रलय, मुंबईमधील महापूर अथवा विविध दंगली यांच्या काळात शासन-प्रशासन हिंदूंचे रक्षण करण्यास अयशस्वी झाल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर हिंदूंनी प्रथमोपचार प्रशिक्षण घेऊन संकटकाळात संत, साधक आणि सज्जन यांच्या रक्षणासाठी प्रयत्न करणे ही काळानुसार साधना आहे, असे प्रतिपादन सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक श्री. नागेश गाडे यांनी येथे केले. ते ३१ ऑगस्ट या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित तीन दिवसीय प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी डॉ. प्रकाश घाळी, डॉ. दुर्गेश सामंत यांच्यासह देशभरातून आलेले ७४ शिबिरार्थी उपस्थित होते.
श्री. नागेश गाडे पुढे म्हणाले, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रक्रियेत धर्मजागृती सभा, अधिवक्ता अधिवेशन, धर्मशिक्षण वर्ग यांसारख्या विविध उपक्रमांत साधक आणि धर्मप्रेमी सहभागी होतात. त्याचप्रमाणे प्रथमोपचार प्रशिक्षण या रूपातील साधनेच्या माध्यमातून प्रयत्न करता येतील. यामध्ये स्वत: प्रथमोपचार प्रशिक्षण घेणे आणि इतरांना देणे, या प्रशिक्षणातून हिंदूंचे व्यापक संघटन करणे, वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करणे आणि सर्वांत महत्त्वाचे आपले मनोबल कायम टिकवणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे हिंदू विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून अधिवक्त्यांचे व्यापक संघटन उभे राहिले, त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे व्यापक संघटन करायचे आहे. हे प्रयत्न साधनेच्या आधारावर करून सेवेतून आनंद मिळवा.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुरोहित श्री. चैतन्य दीक्षित यांनी शंखनाद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती घोडके यांनी केले.