Menu Close

बांगलादेशी हिंदूंची दुर्दशा

ब्रिगेडियर हेमंत महाजन

काही राजकीय पक्ष, देशातील अनेक संस्था बांगलादेशी हिंदू शरणार्थींना कायमचा आश्रय देण्यास नकार देत आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशातून आलेल्या धर्मांध घुसखोरांना देशातील प्रत्येक शहरात घरे आणि नागरिकत्वही मिळत आहे. 1971च्या मुक्ती संग्रामच्या धगीत आजही हिंदू बांगलादेशी होरपळत आहे. ज्या अफगाणिस्तानला हिंदुस्थानकडून दिल्या जाणाऱया करातून अब्जावधी डॉलर्सची मदत केली जात आहे, हिंदुस्थानातील राजकीय पक्षांना बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील हिंदूंच्या दुर्दशेकडे लक्ष देण्यासाठी वेळ आहे का?

पाकिस्तानातील हिंदूंची संख्या, जी 1950 मध्ये 8 ते 9 टक्के होती, ती आज 10 लाखांवर म्हणजे 2 टक्क्यांहून कमी झालेली आहे. पूर्व पाकिस्तानात (आताच्या बांगलादेशात) फाळणीनंतर 1950 मध्ये 24 ते 25 टक्के हिंदू होते, 2011च्या जनगणनेनुसार बांगलादेशात आज केवळ 8.6 टक्के हिंदूच शिल्लक उरले आहेत. त्यांची संख्या आता एक कोटी आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचेही बांगलादेशातील हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येकडे दुर्लक्ष आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर या देशात हिंदूंची लोकसंख्या हळूहळू शून्याच्या दिशेने गेल्याशिवाय राहाणार नाही.

मूळचे बांगलादेशचे आणि सध्या अमेरिकेत शास्त्रज्ञ म्हणून वास्तव्यास असलेले दीपेन भट्टाचार्य ‘स्टॅटिस्टिकल फ्युचर ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या आपल्या लेखात सांगतात की, “2020पर्यंत बांगलादेशात केवळ 1.5 टक्के हिंदू उरतील. सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले बांगलादेशातील राजकीय अभ्यासक प्रोफेसर अली रियाझ, त्यांनी त्यांच्या  ‘गॉड विलिंगः द पॉलिटिक्स ऑफ इस्लामिझम’ या पुस्तकात असा निष्कर्ष काढला की, गेल्या 25 वर्षांत बांगलादेशातून 53 लाख हिंदूंनी पलायन केलेले आहे.

1970 मध्ये पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांत मुजिबूर रहमानच्या अवामी लीगचा विजय झाला. त्यांच्या हातात सत्ता जाऊ नये आणि पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) फुटून निघू नये म्हणून याह्याखाननी फार मोठय़ा प्रमाणावर दडपशाही चालू केली. तीस लाखांवर नागरिकांची कत्तल केली आणि एक कोटी निर्वासित हिंदुस्थानात आले. हा इतिहास गॅरी बास यांच्या पुस्तकात दिला आहे. अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक, पत्रकार गॅरी बास यांच्या 2014 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द ब्लड टेलिग्राम : निक्सन, किसिंजर ऍण्ड ए फॉरगॉटन जेनोसाईड’ या पुस्तकाने जगात खळबळ उडवून दिली. विदेशी लेखकाने बांगलादेश निर्मितीच्या वेळी हिंदूंवर झालेले भयानक अत्याचार जगापुढे मांडले आहेत, तरी त्यावर त्या वेळच्या हिंदुस्थान सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. हिंदुस्थानातील वर्तमानपत्रे, संघटना आणि मानवाधिकारवादी नेत्यांनीही या मुद्यावर तिखट आणि प्रभावी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती, पण असे काही घडले नाही. 1971 साली हिंदूंच्या नरसंहाराची बाब उजेडात आली असतानाही हिंदुस्थानने या नरसंहाराचे वर्णन ‘बांगलादेशातील नागरिकांवर झालेले ते अत्याचार आहेत’ अशा शब्दांत केली आणि ‘हिंदू’ शब्दाचा उल्लेख टाळला.

वास्तविक हेच पुस्तक हिंदुस्थानच्याच एखाद्या लेखकाने लिहायला हवे होते. एका विदेशी लेखकाने बांगलादेश निर्मितीच्या वेळी हिंदूंवर झालेले भयानक अत्याचार जगापुढे मांडले आहेत. पाकिस्तानी सैनिकांना हे जेव्हा लक्षात आले की, आपला पराजय निश्चित आहे तेव्हा त्यांनी जमाते इस्लामीला हाताशी धरून हिंदूंच्या घरासमोर पिवळे निशाण लावले, जेणेकरून हिंदू घरांची ओळख तत्काळ व्हावी. त्यानंतर अंगावर शहारे आणणारे हल्ले केले गेले, ज्यात हिंदू महिलांवर बलात्कार, घरांची लुटालूट, जाळपोळ, पुरुष, वृद्ध आणि बालकांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हिंदुस्थानात मानवाधिकार संघटना, ज्या देशाच्या बाहेरील अनेक मानवाधिकारांच्या उल्लंघनावर गळा काढतात, त्यांच्यापैकी एकानेही शेजारी देशातील रक्तबांधवांवर झालेल्या अमानुष अत्याचारावर एकही शब्द काढला नाही. परिसंवाद, चर्चासत्रे तर फार दूर राहिले. त्यावेळचे अमेरिकन सिनेटर एडवर्ड केनेडींनी निर्वासित छावणीतील स्वयंसेवकाला विचारले, ‘‘तुम्हाला सर्वात जास्त कशाची गरज आहे?’’ त्यावर स्वयंसेवकाने दिलेले उत्तर अंगावर शहारे आणते. तो म्हणाला होता ‘‘स्मशानांची!’’

हिंदुस्थानी जगाच्या कोणत्याही कोपऱयात हिंदू, शीख, जैन, बौद्ध यांच्यावर होणाऱया आघातांबाबत गप्प कसा काय बसू शकतो? त्यांची दुःखं, वेदना, अन्यायाबाबत आमची नैतिक जबाबदारी नाही का? शेख हसिना यांच्या अवामी लीगने 2008 साली निवडणुकीत 1971 च्या युद्ध गुन्हेगारांना शासन करण्याचे आश्वासन दिले आणि सत्ता मिळाल्यावर या सगळ्यांची पाळेमुळे खणून काढायला सुरुवात केली. सत्तेवर आल्या आल्या माजी उद्योगमंत्री आणि जमातचा नेता मतिऊर रहेमान नियाझी याला त्यांनी तुरुंगात धाडले आणि युद्ध गुन्हेगारांच्या चौकशीसाठी न्यायिक आयोगच स्थापन केला. या आयोगाने 2010 साली जमातच्या अब्दुल कादर मुल्ला यास दोषी ठरवलं. इंटरनेट आदी माध्यमांतून जमातचा धर्मवेडा चेहरा अधिकाधिक उघड होत गेला .

सुप्रीम कोर्टाने 17 सप्टेबर 2013 रोजी मुक्ती संग्रामात मीरपूर भागात हजरत अली लस्कर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येच्या आरोपाखाली कादरला फाशीची शिक्षा दिली. मुल्लाच्या फाशीनंतर ठिकठिकाणी सत्ताधारी अवामी लीगच्या बाजूचे मुस्लिम आणि हिंदू नागरिक यांच्यावर हल्ले चढवण्यात आले. युद्ध गुन्हेगारांचे खटले आज पण सुरू आहेत.

विडंबना ही आहे की, आंतरराष्ट्रीय लवादाच्या या निर्णयाची शिक्षा बांगलादेशातील हिंदूंना भोगावी लागत आहे. त्यांच्या घरांवर जमाते इस्लामीचे गुंड सातत्याने हल्ले करतात. घरांची जाळपोळ तसेच लुटालूट करीत आहेत व हिंदू स्त्रियांची विटंबना करीत आहेत. त्यांची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. परिणामी, हिंदूंना आपले प्राण वाचविण्यासाठी हिंदुस्थानात आश्रय घेणे भाग पडत आहे. बांगलादेशी छळाला भिऊन हिंदू पळून जेव्हा हिंदुस्थानात येतात तेव्हा त्यांना हिंदुस्थानचे नागरिकत्व दिले पाहिजे.

बांगलादेशामध्ये जिहादी आणि सुधारणावादी यांच्यामध्ये रस्त्यावरच्या संघर्षाला तोंड फुटलेले आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय बांगलादेशातील कट्टरपंथीयांना फूस लावून, चिथावणी देत त्यांचा वापर हिंदुस्थानविरुद्ध करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसते आहे.  मानवतेच्या नात्याने आम्ही रोहिंग्या निर्वासितांना आमच्या देशात आश्रय दिला, पण आता त्यांना मायदेशी परत पाठवण्यासाठी हिंदुस्थानने आमची मदत करावी असं आवाहन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिनांनी कोलकात्यामध्ये एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना केले.

हिंदुस्थानने एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक बांगलादेशात केली आहे. अर्थातच ही मदत केल्यानंतर बांगलादेशने हिंदुस्थानने प्रत्येक वर्षी पकडलेल्या अवैध बांगलादेशींना परत घेतले पाहिजे. बांगलादेशातील विकासाला चालना देणे, तिथे लोकशाही स्थिरावणे या गोष्टी हिंदुस्थानच्या हिताच्या आहेत. नाहीतर त्या देशात आज उरलेले एक कोटी बांगलादेशी हिंदू उद्या हिंदुस्थानात पळून येतील.

संदर्भ : सामना

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *