मुंबई : मी सनातनच्या संभाव्य बंदीच्या विरोधात सरकारला लेखी कळवीन, असे आश्वासन शिवसेनेचे खासदार श्री. गजानन किर्तीकर यांनी दिले. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे आणि अन्य कार्यकर्ते यांनी त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते.
महाराष्ट्रात तथाकथित पुरोगामी आणि काँग्रेस पक्षाशी निगडित अनेक मंडळींनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांवर बंदी घाला, अशी मागणी केली आहे. सनातनच्या बंदीच्या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध करावा आणि सनातनच्या पाठीशी उभे रहावे यासाठी मुंबईतील शिवसेनेचे खासदार श्री. गजानन किर्तीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेला पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणात गोवण्याचे षड्यंत्र चालू आहे, याविषयी त्यांना अवगत करण्यात आले. ते त्यांनी सविस्तररीत्या समजून घेतले.
सनातन संस्थेवर बंदी येऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवतो ! – आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : सनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही. सनातन संस्थेवर बंदी येऊ नये, यासाठी मी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवतो, असे प्रतिपादन येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी येथे केले. १ सप्टेंबरला हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने श्री. राजेश क्षीरसागर यांना सनातनवरील संभाव्य बंदीच्या मागणीच्या विरोधात निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. मधुकर नाझरे, श्री. आदित्य शास्त्री, सनातनच्या सौ. अंजली कोटगी उपस्थित होत्या.