पावसाळ्यात जशा भुईछत्र्या उगवतात, त्याप्रमाणे काही हिंदुद्वेषी संघटना हिंदूंच्या सणांच्या काळात ‘सक्रीय’ होतात. त्यांतीलच एक म्हणजे ‘पेटा’ म्हणजे ‘पीपल्स फॉर दि एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स’ ही संघटना ! भारतात हिंदूंकडून कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी होत असतांना या पेटावाल्यांनी एक नवीन टूम आणली. या वेळी त्यांनी लक्ष्य केले, ते गायीच्या तुपाला ! ‘या सणाच्या काळात हिंदूंनी देशी गायीचे तूप न वापरता ‘शाकाहारी तुपा’चा वापर करावा’, असा फुकाचा सल्ला या पेटावाल्यांनी दिला. त्याही पुढे जाऊन ‘जन्माष्टमीच्या काळात दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनापासून लांब रहा आणि जन्माष्टमी उत्सव आनंदाने साजरा करा’, असा फुकाचा सल्लाही दिला आहे. ‘देशी गायीचे तूप हे शुद्ध आणि पवित्र असते आणि तेच मुळात ‘शाकाहारी’ असते. त्यामुळे पेटावाल्यांचे ‘शाकाहारी तूप’ हा काय प्रकार आहे ?’, असा प्रश्न सर्वांना पडणे साहजिक आहे. पेटावाल्यांचे शाकाहाराचे निकष वेगळे आहेत. ‘हे कथित ‘शाकाहारी तूप’ बनवण्यासाठी खोबरेल तेल, पेरूच्या झाडाची पाने, कढीपत्ता, मीठ, हळद आणि हिंग यांचा वापर करावा’, असे पेटावाल्यांनी सांगितले आहे. ‘देशी गायीचे तूप आरोग्याच्या दृष्टीने किती चांगले आहे’, हे येथे वेगळे सांगायला नको. या देशी तुपाचे गुणधर्म पेटावाल्यांनी बनवलेल्या ‘शाकाहारी’ तुपात आहेत का ?, हाही एक संशोधनाचा विषय आहे. असे ‘शाकाहारी’ तूप हे देशी गायीपेक्षा वरचढ आहे, असे कुठेही संशोधनाअंती सिद्ध झालेले नाही. श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीला आपल्याला आठवतो तो दह्याची मडकी फोडणारा, लोणी खाणारा नटखट बाळकृष्ण ! श्रीकृष्ण हा गोपालक होता. त्यामुळे गाय आणि श्रीकृष्ण यांचेही अतूट नाते आहे. असे असतांना हिंदूंना असा शहाणपणा शिकवण्यासाठी पेटावाल्यांनी गोकुळाष्टमीच का निवडली ?, हा हिंदूंना पडलेला प्रश्न आहे.
केवळ हिंदूंच्या सणांनाच विरोध !
‘हिंदूंचे सण आले की, पेटावाल्यांच्या अंगात १०० हत्तींचे बळ संचारते’, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. भारतात ‘पेटा’ला मोठ्या प्रमाणात विरोध झाला, तो तमिळनाडूतील जल्लीकट्टू या बैलांच्या संदर्भातील पारंपरिक खेळाला त्याने विरोध केला म्हणून. त्यानंतर या खेळावर बंदी आली. नंतर तमिळनाडूमध्ये हा खेळ पुन्हा चालू करण्यासाठी, तसेच त्याला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. त्यानंतर ही बंदी उठवण्यात आली. नागपंचमीच्या काळातही पेटावाल्यांना जाग येते. ‘जिवंत नागाची पूजा करणे अथवा त्यांना या दिवशी धरणे, हे अमानवी असून त्यामुळे नागांना हानी पोहाचतेे’, असे त्यांचे म्हणणे आहे. वास्तविक हिंदु धर्मात प्राण्यांचा यथोचित सन्मान करण्यास शिकवले आहे. काही ठिकाणी प्राण्यांना हानी पोहोचवण्याचा भाग होतोही. असे असले, तरी सरसकट हिंदूंच्या सणांना लक्ष्य करणे, हा हिंदुद्वेष होय. दुसरे सूत्र म्हणजे हेच पेटावाले बकरी ईदच्या काळात होणार्या प्राण्यांच्या ‘कुर्बानी’विषयी मौन पाळतात. या वेळी झालेल्या बकरी ईदला एकट्या मुंबई शहरात २ लाख बकर्यांची कत्तल करण्यात आली. याविषयी ‘पेटा’च्या प्रमुखांनी अथवा इतर कुठल्याही कार्यकर्त्याने त्याचा जाहीर निषेध केला नाही. याला धर्मांधांची दहशतही उत्तरदायी आहे. वर्ष २०१४ मध्ये भोपाळमध्ये एके ठिकाणी पेटावाल्यांनी कुर्बानीच्या विरोधात एका मशिदीच्या समोर निदर्शने केली असता, त्यांना मारहाण करण्यात आली. ‘ईदच्या काळात अशा प्रकारचे हिंसक अनुभव आल्यानंतर ‘कुर्बानी’विषयी न बोललेलेच बरे’, अशी भूमिका बहुदा पेटावाल्यांनी घेतलेली दिसते. ईदच्या काळात काही हिंदुत्वनिष्ठांनी ‘पेटा’च्या कार्यालयात दूरभाष करून त्यांना बकर्यांच्या कत्तलीविषयी सांगितले. त्या वेळी ‘हे सूत्र प्रशासनाच्या अधीन आहे. त्यांच्याशी संपर्क करावा’, असे ठोकळेबाज उत्तर देण्यात आले. याचा अर्थ ‘धर्मांध हिंसक कारवाया करतील’, या भीतीने बकरी ईदच्या काळात दडी मारायची आणि हिंदू सहिष्णु असल्यामुळे ‘ते काही करणार नाहीत’, हे जाणून हिंदूंच्या सणांच्या वेळी कुरघोडी करायची, हे पेटावाल्यांचे धोरण दिसते ! जमीन मऊ लागल्यास कोपराने खणण्याचा हा प्रकार होय. असे दुटप्पी धोरण राबवणारे प्राणीप्रेमी प्राण्यांचेही भले करणार नाहीत.
हिंदूंसाठी धर्माचरण महत्त्वाचे !
मुक्या प्राण्यांविषयी प्रेम अथवा सहानुभूती असणे, यात चुकीचे असे काहीच नाही. हिंदूंच्या धर्मशास्त्रात तर केवळ मानवजातीचा नव्हे, तर अखिल जिवांचा विचार करण्यात आला आहे. सध्या मनुष्य हा स्वार्थी आणि आत्मकेंद्री बनल्यामुळे तो निसर्गापासून लांब गेला आहे. अशा या आत्मकेंद्री मनुष्याने साधना केल्यास हा तुटलेला दुवा पुन्हा जोडला जाणे सहज शक्य आहे. पूर्वीच्या काळात ऋषि-मुनींचे आश्रम हे एखाद्या घनदाट जंगलात असत. त्या काळात त्यांचे आश्रम आणि त्याचा परिसर येथे अनेक प्राण्यांचा सहज वावर असे. एवढेच काय ऋषि-मुनी ध्यानधारणेला बसल्यावर हिंस्र श्वापदेही त्यांच्या आजूबाजूला फिरत. या काही कपोलकल्पित कथा नाहीत, तर सत्य घटना आहे. त्या काळी प्राण्यांना ‘या ऋषींनी आमच्या जंगलात अतिक्रमण केले’, असे वाटत नसे. सत्त्वगुणसंपन्न व्यक्ती ही निसर्गाशी म्हणजे पशू-पक्ष्यांची सहजतेने जवळीक साधू शकते, हे दिसून येते. आजकाल सेलिब्रेटींना हाताशी धरून पेटासारख्या प्राणीप्रेमी संघटनांकडून प्राणीप्रेमाचे अवडंबर माजवले जात आहे. ‘दूध काढतांना गायीला त्रास होईल; म्हणून दूध, दही, तूप टाळा’, असे सांगणारे पेटावाले गोहत्येच्या वेळी मात्र शाब्दिक निषेधही करत नाहीत. यातून त्यांचे प्राणीप्रेम किती फोल आहे, हे स्पष्ट होते !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात