८६ गोविंदा घायाळ !
- काही ठिकाणी अश्लाघ्य नृत्यांमुळे उत्सवाला विकृत स्वरूप !
- मोठ्या रकमेची पारितोषिके ठेवून बाजारीकरण !
मुंबई : गोपाळकाल्याच्या निमित्ताने ३ सप्टेंबरला मुंबई आणि ठाणे येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. धारावी येथील कुश खंदारे (२० वर्षे) या गोविंदाचा दहीहंडीचे थर रचतांना आकडी आल्याने मृत्यू झाला. मुंबईत ८६ गोविंदा घायाळ झाले काहींवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. यामध्ये बालगोविंदांचाही समावेश आहे. बोरीवली येथे सेलिब्रेटींच्या अश्लाघ्य आणि थिल्लर नृत्यांमुळे उत्सवाला विकृत स्वरूप आले. (धर्मशिक्षणाअभावी हिंदू भरकटत आहेत. हे असेच चालू राहिले, तर चंगळवाद फोफावेल. याची भयावहता लोकप्रतिनिधी केव्हा लक्षात घेणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
अनेक ठिकाणी महिलांच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडल्या. (महिलांनी दहीहंडी फोडणे, हे धर्मशास्त्रविसगंत आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ठाणे शहरात ११७ दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आल्याचे, तसेच आयोजकांनी ११ लाखांपासून २१ लाखांपर्यंतच्या पारितोषिकांची घोषणा केल्याचे वृत्त एका वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे. (दहीहंडीवर पैसे लावणे, हे उत्सवाचे बाजारीकरणच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
नौपाडा (ठाणे) येथे दहीहंडी उत्सवात अफझलखानवधाचा देखावा सादर !
नौपाडा (ठाणे) येथे मनसेचे अविनाश जाधव यांच्या दहीहंडीत अफझलखान वधाचा देखावा सादर करण्यात आला. येथे पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. (राष्ट्र-धर्मपर देखावे सादर करणार्या मंडळाचे अभिनंदन ! असे राष्ट्र-धर्म यांविषयीचा अभिमान वृद्धींगत करणारे कार्यक्रम अन्यत्रच्या मंडळांनी आयोजित केल्यास उत्सवांचे खर्या अर्थाने सार्थक होईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
घाटकोपर आणि हिरानंदानी (ठाणे) येथील दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती !
घाटकोपर येथे आमदार राम कदम यांच्या तसेच हिरानंदानी (ठाणे) येथील स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांकडून राष्ट्र-धर्मभक्तीपर घोषणा म्हणवून घेतल्या, तसेच हिरानंदानी येथे केलेल्या मार्गदर्शनात ‘भगवान श्रीकृष्णाचा कृपाशीर्वाद असून अन्याय-अत्याचाराची दहीहंडी फोडायची आहे’, असे सांगितले. ‘जय जवान’ या पथकाने ९ थरांची दहीहंडी लावून मुख्यमंत्री फडणवीस यांना सलामी दिली.
वरळी येथे दहीहंडीच्या माध्यमातून केरळ येथील पूरग्रस्तांसाठी आर्थिक साहाय्य घोषित !
शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी वरळी येथील जांबोरी मैदानात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी केली. या दहीहंडीच्या माध्यमातून केरळ येथील पूरग्रस्तांसाठी आर्थिक साहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार शिंदे यांनी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात