कृत्रिम हौद, मूर्तीदान, तसेच अमोनियम बायकार्बोनेट वापरणे या उपक्रमांना विरोध
पुणे : कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींना प्रोत्साहन देऊ नये, असा निर्णय ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने दिला असतांनाही शहरात कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींची सर्रास विक्री केली जात आहे. कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे अहवाल आहेत. अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी यांनी केली.
४ सप्टेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर तांदळे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता नीलेश निढाळकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री. मयुरेश अरगडे, अमरज्योत मित्रमंडळाचे श्री. विजय गावडे आणि पर्यावरण अभ्यासक श्री. विकास भिसे हे उपस्थित होते. ‘समितीच्या वतीने एक गस्तीपथकही नेमण्यात येईल. हे पथक कागदी लगद्याच्या
श्री गणेशमूर्तींची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास पोलिसांना सूचित करेल’, असेही श्री. धर्माधिकारी यांनी सांगितले. मूर्तीदान, श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन, अमोनियम बायकार्बोनेटचा वापर, यांसारख्या अशास्त्रीय पर्यायांनाही समितीचा विरोध असून त्या संदर्भात जागृती करण्यात येईल.
श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशमूर्तींची विक्री करणारे अनेक विक्रेते त्यांच्या वितरण कक्षामध्ये भग्नावस्थेतील श्री गणेशमूर्ती तशाच ठेवून जात असल्याचे आढळून येते. यातून श्रीगणेशाची घोर विटंबना होते. असे होऊ नये; म्हणून समितीच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात येत आहे, तसेच गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, अपप्रकारांना आळा घातला जावा, यासाठी व्यापक स्तरावर आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात येत आहे, असेही श्री. धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले.
श्री गणेशमूर्तीच्या अवमानाविषयी न्यायालयात जाऊ ! – अधिवक्ता नीलेश निढाळकर
कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्ती, तसेच कृत्रिम हौदातील श्री गणेशमूर्ती यांची धर्मभावना दुखावतील, अशा पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. याच्या विरोधात महापालिकेला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून पालिकेकडून प्रतिसाद न मिळाल्यास न्यायालयात जाऊ.
‘पेपरगणेश’ संकेतस्थळावर अद्याप कारवाई नाही ! – विजय गावडे
‘पेपरगणेश’ या संकेतस्थळावर कागदी श्री गणेशमूर्तींचा प्रसार, प्रचार आणि सर्रासपणे वितरण होत आहे. या संदर्भात रीतसर तक्रार करूनही अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
विसर्जनाच्या कालावधीत नदीत पाण्याचा अतिरिक्त विसर्ग करावा ! – मयुरेश अरगडे
गणेशोत्सवाच्या काळात दीड दिवस, ५ वा, ७ वा दिवस, तसेच अनंत चतुर्दशी या विसर्जनाच्या सर्व दिवशी नदीमध्ये पाण्याचा अतिरिक्त विसर्ग करण्यात यावा.
उत्सव धर्मशास्त्राप्रमाणे साजरा व्हावा ! – चंद्रशेखर तांदळे
उत्सवात अपप्रकारांना फाटा देऊन परंपरेप्रमाणे आणि धर्मशास्त्राप्रमाणे तो साजरा व्हावा.
अमोनियम बायकार्बोनेटमुळे नायट्रेट हे प्रदूषक वाढते ! – विकास भिसे, पर्यावरण अभ्यासक
गेल्या ३ वर्षांपासून पुणे महापालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करण्याचे आवाहन करून एक चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न चालू केला आहे. अमोनियम बायकार्बोनेटमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसची श्री गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर अमोनियम सल्फेट हे खत सिद्ध होते. ते आम्ल गुणधर्माचे आहे. त्यातून नायट्रेट हे प्रदूषक वाढते. एकीकडे सेंद्रीय खते वापरण्याचे आवाहन करायचे, तर दुसरीकडे अमोनियम बायकार्बोनेटच्या माध्यमातून रासायनिक खतांचा प्रसार करायचा, हे अनाकलनीय आहे. यामागे काही छुपा उद्देश आणि स्वार्थ असण्याची शंका येते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींमुळे जलप्रदूषण होते, असा होणारा प्रचारही अयोग्य आहे. जिप्समपासून प्लास्टर ऑफ पॅरिस बनवले जाते. जिप्सम पर्यावरणाला कधीच घातक नाही. जिप्सममुळे जलशुद्धीकरणाची प्रक्रिया होते.
पत्रकार परिषदेचे फेसबूकद्वारे थेट प्रक्षेपण
या पत्रकार परिषदेचे फेसबूकद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या माध्यमातून एकूण ११ सहस्र ४०० हून अधिक लोकांपर्यंत विषय पोहोचला. १ सहस्र ८०० हून अधिक जणांनी पत्रकार परिषद ‘ऑनलाइन’ पाहिली. २७० जणांनी ‘शेअर’ केली.
क्षणचित्र : २० हून अधिक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.