Menu Close

उत्तर आणि मध्य भारतात हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत विविध कार्यक्रम

हिंदूंवर होणारा अन्याय रोखण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करावा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

डावीकडून श्री. सुरेंद्र त्रिपाठी, डॉ. ज्ञानशंकर शर्मा, निवृत्त शिक्षक श्री. शांतिलाल शर्मा, बोलतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि डॉ. संजय शर्मा

मुरैना (मध्यप्रदेश) : भारतीय राज्यघटनेमध्ये अन्य धर्मियांचे संरक्षण करण्याच्या संदर्भात कायदा आहे. त्यांना धर्मशिक्षण देण्याचीही व्यवस्था आहे. मात्र दुसरीकडे हिंदूंना संरक्षण देण्याची सुविधा नाही. या समवेतच हिंदूंना तीर्थयात्रेसाठीही कर द्यावा लागतो, तर सरकार अन्य धर्मियांना त्यांच्या तीर्थयात्रांसाठी अनुदान देते. यातून हिंदूंशी होत असलेला भेदभाव स्पष्ट होतो. यामुळे हिंदूंनी आता जागृत होऊन त्यांच्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. यामुळे हिंदूंचे संरक्षण होऊन हिंदू जागृतही होतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. रोटरी क्लबचे सदस्य श्री. सुरेंद्र त्रिपाठी यांनी येथे एका व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे बोलत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. सुरेंद्र त्रिपाठी यांनी केले. या वेळी पतंजलि योग पिठाचे श्री. प्रदीप व्यास आणि श्री. तरुण शर्मा यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात साहाय्य केले.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी गौरवोद्गार !

या प्रसंगी डॉ. ज्ञानशंकर शर्मा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी म्हणाले, एखादा उच्चविद्याविभूषित १० वर्षे डॉक्टर बनण्यासाठी घालवल्यानंतर डॉक्टरकी सोडत असेल, धोतर आणि सदरा घालून संपूर्ण जीवन हिंदु धर्माचा प्रसार अन् प्रचार करण्यासाठी अर्पण करत असेल, तर ते पाहून मनात त्यांच्या प्रती श्रद्धा निर्माण होते.

नामजप करत भोजन ग्रहण केल्याने सहज यज्ञ होतो ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

पंचकुला (हरियाणा) : नामजप केल्याने निर्माण होणार्‍या ऊर्जेमुळे मन, बुद्धी आणि चित्त यांची शुद्धी होते. तसेच सप्तचक्रांचे आणि त्रिगुणाचे संतुलन होते. नामजप करत ग्रहण केलेले भोजन जठराग्नीत गेल्याने सहज यज्ञ होतो. यामुळे नामरूपी साधना करणे महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पंचकुला येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित जिज्ञासूंना केले.

या वेळी समितीचे श्री. कार्तिक साळुंके, तसेच चंडीगड येथील सौ. सुखमणी गुप्ता उपस्थित होत्या.

सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी या वेळी नामजप कार्य कसे करते, या संदर्भात उपस्थितांना माहिती देऊन साधनेचे महत्त्वही विशद केले.

साधना केल्याने समस्यांचा सामना करण्यास आत्मबळ प्राप्त होते ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

ग्वाल्हेर येथे झालेल्या बैठकीला उपस्थित धर्माभिमानी आणि १. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि २. श्री. आनंद जाखोटिया

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) : आज हिंदु समाजाला धर्मशिक्षण मिळत नसल्याने त्यांना जीवनाच्या ध्येयाची माहितीच नाही. स्वतःमधील दिव्य चेतना जागृत करणे, हेच जीवनाचे लक्ष्य आहे. यासाठी साधना केली पाहिजे. साधनेद्वारे सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकते. तसेच त्यांचा सामना करण्याचे आत्मबल प्राप्त होते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. येथील डॉ. सेनगर यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया हेही उपस्थित होते.

सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी या वेळी कुलदेवता आणि श्री दत्तात्रेय देवता यांचा नामजप केल्याने काय लाभ होतात, या विषयीही माहिती दिली.

आगरा येथे हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर बैठकीचे आयोजन

आगरा येथील श्री. सत्संगी यांच्या घरी झालेल्या बैठकीला उपस्थित धर्माभिमानी आणि त्यांच्यासमवेत १. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

आगरा : येथे श्री. सत्संगी यांनी त्यांच्या घरी हिंदु राष्ट्राविषयी आयोजित केलेल्या बैठकीत हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले.

हिंदूंना धर्मशिक्षण मिळाले, तर त्यांच्यात चैतन्य निर्माण होऊन भारत पुन्हा एकदा गौरवशाली बनेल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

जोरा (मुरैना, मध्यप्रदेश) : येथील निवृत्त मुख्याध्यापक श्री. रामविलास शर्मा यांनी येथील गायत्री मंदिरामध्ये शहरातील धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि गायत्री उपासक यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटून गेली. तरी येथील बहुसंख्यांक हिंदूंना धर्माचे शिक्षण दिले गेलेले नाही. हिंदु समाजाला धर्मशिक्षण न मिळाल्यानेच आज हिंदूंमध्ये चैतन्य निर्माण झालेले नाही. यामुळेच हिंदू अजूनही भौतिक सुखामध्ये मग्न आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले, तर ते धर्माचरण करून ईश्‍वरी कृपा संपादन करू शकतील आणि त्यामुळे त्यांच्यात चैतन्य निर्माण होईल. या चैतन्यवृद्धीच्या माध्यमातूनच भारताचा वास्तविक विकास होऊ शकेल. त्याद्वारेच धर्माभिमानी हिंदु समाज भारताला पुन्हा गौरवशाली बनवू शकेल. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंदु जनजागृती समिती गेल्या १६ वर्षांपासून संपूर्ण भारतात हेच कार्य अविश्रांतपणे करत आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *