जोधपूर (राजस्थान) : हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत नुकतीच राजस्थानच्या जोधपूर येथे बार एसोसिएशनमध्ये अधिवक्त्यांची एक बैठक घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान अन् मध्यप्रदेश राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी या बैठकीला संबोधित केले.
श्री. रमेश शिंदे यांनी सरकारकडून हिंदूंचा पक्षपात आणि मंदिर सरकारीकरण या मुद्यांवर मार्गदर्शन केले. श्री. शिंदे म्हणाले, मंदिर सरकारीकरणामुळे हिंदूंनी देवतेला भक्तीभावाने अर्पण केलेल्या धनाचा अपवापर होत आहे. दुसरीकडे देशातील बहुसंख्यांक हिंदूंना कायदा आणि अल्पसंख्यांकांना फायदा अशा भेदभावाच्या नि अन्यायी वागणुकीला हिंदूंना तोंड द्यावे लागत आहे. सद्य:स्थितीत अधिवक्त्यांनी समाजामध्ये कायद्याविषयी माहिती आणि माहिती अधिकार यांविषयी जागृती करावी.
बैठकीला उपस्थित सर्व अधिवक्त्यांनी या विषयी उत्सुकता दर्शवली. यासंदर्भात योजनाबद्ध कार्य करण्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त महाधिवक्ता के.एल्. ठाकुर यांच्यासह २५ अधिवक्ता उपस्थित होते. अधिवक्ता मोती सिंह राजपुरोहित यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.