पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली प्रशासनाकडून राबवण्यात येणार्या चुकीच्या संकल्पनांना विरोध
अकोला : सांडपाणी आणि घनकचरा यांद्वारे होणार्या भयंकर प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून प्रशासन वर्षातून एकदाच येणार्या गणेशोत्सवातील कथित प्रदूषणाविषयी ‘कृत्रिम तलाव’, गणेशमूर्तीदान आणि ‘कागदी लगद्याची गणेशमूर्ती’ या चुकीच्या संकल्पना राबवत आहे. याद्वारे होत असलेली गणेशमूर्तीची विटंबना, तसेच जलप्रदूषण तातडीने थांबवण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महापौर श्री. विजय अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात ‘पर्यावरणाचे रक्षण करणे, हे प्रशासनाचे घटनात्मक आणि मूलभूत दायित्व आहे; मात्र प्रशासनाकडून अपेक्षित कृती होतांना दिसत नाही’, असे नमूद करण्यात येऊन पर्यावरणाच्या गंभीर स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
या वेळी शाडूमातीच्या मूर्ती बसवण्याविषयी महापौरांनी सकारत्मकता दर्शवली. त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना या निवेदनाची प्रत देऊन त्यांच्याशी यासंदर्भात बोलणार असल्याचे सांगितले. शाडू मातीची मूर्ती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती यांच्यातील खर्चाचा तुलनात्मक अभ्यास आणल्यास शाडू मातीची मूर्ती बनवणार्या मूर्तीकारांना काही प्रमाणात सबसिडी देणार असल्याचेही सांगितले.
निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय खोत, ज्ञानेश्वर शेळके, शंकर कडू, आशिष घनघाव, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) श्रुती भट उपस्थित होत्या.