मुंबई : सनातन संस्था ही खूप चांगली संस्था असून चांगल्या उद्देशाने कार्यरत आहे. ज्या संस्थेचे साधक सामाजिक आणि धार्मिक अंगाने, तसेच सहिष्णुता राखून कार्य करतात, अशा सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे, हा मोठा मूर्खपणा आहे. ज्या उद्देशासाठी ही संस्था कार्यरत आहे, ती मूलभूत भावना समजून घ्यायला हवी. सनातन संस्थेवरील बंदीची मागणी म्हणजे संकटकालीन स्थिती आहे. संस्था तिची भूमिका सांगत असतांना ती का ऐकून घेतली जात नाही ? हे षड्यंत्र देशासाठी घातक आहे. सनातन संस्थेवरील बंदीच्या षड्यंत्राच्या विरोधात करणी सेना उत्तर देण्यासाठी सिद्ध आहे, असे प्रतिपादन करणी सेनेचे संस्थापक श्री. लोकेंद्रसिंहजी कालवी यांनी केले. ६ सप्टेंबर या दिवशी ‘श्री राजपूत करणी सेना मुंबई’च्या वतीने घाटकोपर येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ष २०१८ च्या ‘पद्मिनी गौरव सन्मान सोहळ्या’साठी ते मुंबई येथे आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुरोगामी आणि हिंदुद्वेष्टी मंडळी यांच्याकडून सनातन संस्थेवर बंदीची आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. याविषयी ‘दैनिक सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने श्री. कालवी यांना त्यांची भूमिका विचारली असता त्यांनी उत्स्फूर्तपणे वरील प्रतिपादन केले. या वेळी २३ सप्टेंबर या दिवशी राजस्थान येथे होणार्या सर्वांत मोठ्या क्षत्रिय संमेलनामध्ये ‘पद्मावत’ चित्रपट आणि आरक्षण यांवर समीक्षण होणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी करणी सेनेचे श्री. जगदीशसिंह भानुजा आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ऐतिहासिक चित्रपटांच्या परीक्षणासाठी ‘पूर्वचित्रपट परिनिरीक्षण मंडळ’ असावे !
चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने ‘पद्मावत’ या चित्रपटाला अनुमती नाकारली होती. त्यानंतर या चित्रपटात अनेक पालट झाल्यानंतर चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने हा चित्रपट प्रदर्शित करण्याला अनुमती दिली; मात्र या चित्रपटात राणी पद्मिनी यांच्याऐवजी अल्लाऊद्दीन खिलजी यालाच अधिक महत्त्व देण्यात आले आहे. चित्रपट निर्माते भन्साळी यांच्याशी हातमिळवणी करून या चित्रपटाचा प्रचार केल्याचा आरोप करणी सेनेवर केला गेला; मात्र हा चित्रपट म्हणजे कचरा होता. अशाप्रकारे स्वत:च्या घरातील स्त्रीविषयी कुणी वेगळे चित्रण करत असेल, तर त्याला आम्ही थप्पड मारू. मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे, तसेच राणी पद्मिनी यांच्या पिढीतील आहे. आम्ही आमच्या इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नाही. अशा प्रकारे चित्रपटांमधून होणारे इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी ‘पूर्वचित्रपट परिनिरीक्षण मंडळ’ असावे, अशी मागणी या वेळी श्री. कालवी यांनी केली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये अलौकिक शक्ती असून ती राष्ट्रहितासाठी कार्यरत आहे : लोकेंद्रसिंहजी कालवी यांनी काढलेले गौरवोद्गार !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी गौरवोद्गार काढतांना श्री. कालवी म्हणाले, ‘‘गुरुजींमध्ये (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये) एक मोठी अलौकिक शक्ती आहे, जी राष्ट्रहितासाठी काही करू इच्छिते. त्यांच्यावर कोणता आरोप-प्रत्यारोप होत असेल, तर उत्तर देण्यासाठी करणी सेना सिद्ध आहे, असे करणी सेनेचा संस्थापक म्हणून मी येथे सांगतो.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात