यवतमाळ : या वर्षी कृत्रिम हौद बांधणार नाही, तर मातीच्या मूर्ती सिद्ध करणार्या मूर्तीकारांना पारितोषिके देणार आणि सार्वजनिक गणेशोत्सवात अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करणार, असे आश्वासन येथील समर्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. कशाळकर यांनी येथील हिंदु जनजागृती समितीला दिले.
‘कृत्रिम हौद संकल्पना ही धर्मशास्त्रविरोधी आहे, त्यामुळे ती राबवू नये’, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समर्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. कशाळकर आणि यवतमाळच्या नगराध्यक्षा सौ. कांचन चौधरी यांना देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते सर्वश्री सुधाकर कापसे, रवि देशपांडे आणि दत्तात्रेय फोकमारे उपस्थित होते. मागील वर्षी यवतमाळ नगर परिषदेने कृत्रिम हौद बांधले नाहीत; म्हणून कृत्रिम हौद बांधणारे समर्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. कशाळकर यांना मागील आणि या वर्षी निवेदन देऊन त्यांचे प्रबोधन करण्यात आले. प्रबोधनानंतर श्री. कशाळकर यांनी कृत्रिम हौद न बांधण्याचा निर्णय घेतला. (असे धर्मप्रेमी सर्वत्र हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
नगराध्यक्षा सौ. कांचन चौधरी म्हणाल्या, ‘‘यवतमाळ शहरात वाहता जलस्रोत नाही. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे मागील वर्षी शहरातील सर्व विहिरी स्वच्छ केल्या. त्यामुळे या वर्षी गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी विसर्जनासाठी कृत्रिम हौद करावेच लागणार आहेत.’’ (जेथे पाणीटंचाई आहे, त्या भागात श्री गणेशाची लहानमूर्ती आणणे, तसेच पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्यास मोठ्या भांड्यात मूर्तीविसर्जन करून ते पाणी आणि माती सात्त्विक वृक्षाला घालावे, ही उपाययोजना आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात