नंदुरबार : जेएनयू येथे देशद्रोही घोषणा देणार्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचे समर्थन करणार्यांविरुद्धही देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी थाळीनाद मोर्च्याद्वारे ५ मार्च या दिवशी येथे करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी तरुणांनी थाळीनाद करून सर्वांचे लक्ष वेधले. शहरातील काही मार्गांनी गेलेल्या मोर्च्याचे तहसील कचेरीसमोर सभेत रूपांतर झाले. हिंदूंच्या सर्वच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. मोर्च्याच्या नियोजनात प्रा. डॉ. सतीश बागुल, भावना कदम, सौ. भारती पंडित, सौ. शोभना माळी, सौ. छाया सोनार, सौ. आव्हाड, राजेंद्र चौधरी, जितेंद्र मराठे आदींनी सहभाग घेतला.
मोर्च्यातील मान्यवरांच्या मागण्या
श्री. विश्वनाथ कदम, जय बजरंग व्यायाम शाळा : सातत्याने होणार्या हिंदुत्ववादी नेत्यांच्या हत्या पहाता त्यांनाच लक्ष्य केले जात असल्याचे स्पष्ट होते. याविषयी कसून चौकशी होऊन हत्या करणार्यांवर कठोर कारवाई करावी !
श्री. दिलीप ढाकणे पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान : काश्मीरच्या पम्पोर भागात अतिरेक्यांशी भारतीय सैनिक लढत असतांना स्थानिक प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवरून अतिरेक्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत आवाहन केले जात होते. हा प्रकार समाजहिताला घातक आहे. त्यामुळे प्रार्थनास्थळावरील अवैध भोंगे काढून टाकावेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात