‘गणेशमूर्तींचे विसर्जन आणि जलप्रदूषण’, असा संबंध जोडण्याचा प्रयत्न मागील अनेक वर्षांपासून होत आहे. प्रत्यक्षात ‘श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे कोणतेही जलप्रदूषण होत नसल्याचा निष्कर्ष ‘गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने वर्ष २०१४ आणि वर्ष २०१५ मध्ये केलेल्या अभ्यासाअंती काढला आहे.’ ‘गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होते’, असे म्हणणार्या आणि अध्यात्मशास्त्राचा अभ्यास नसलेल्या काही जणांनी कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती वापरण्याचा उपाय सुचवला. एका संप्रदायाकडून कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलेे. त्या संप्रदायाच्या वतीने अशा मूर्तींची विक्रीही करण्यात आली. त्यांच्याकडून एका जिज्ञासू मूर्तीकाराने दोन गणेशमूर्ती विकत घेतल्या. याविषयी त्या मूर्तीकाराला आलेल्या नकारात्मक अनुभवातून त्याच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. हे प्रश्न आणि ‘उपासकांनी कागदी लगद्याची मूर्ती का वापरू नये ?’, याविषयीची माहिती या लेखात दिली आहे.
(संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, २८.८.२०१६)
१. शाडूमातीच्या मूर्ती बनवणार्या मूर्तीकाराला कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्ती वापरण्याविषयी एक संप्रदाय करत असलेल्या आवाहनाचे आश्चर्य वाटणे
‘मी एक मूर्तीकार आहे. ‘शाडूमातीची शास्त्रानुसार बनवलेली गणेशमूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असते’, हे कळल्यापासून मागील ११ वर्षे मी अशाच मूर्ती बनवत आलो आहे. काही दिवसांपूर्वी मला कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती वापरण्याविषयी एका संप्रदायाकडून करण्यात आलेल्या आवाहनाविषयी कळले. ‘कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्ती वापरणे धर्मशास्त्राला धरून नाही’, हे ठाऊक असल्याने या संप्रदायाच्या आवाहनाविषयी मला आश्चर्य वाटले.
१ अ. मूर्तीकाराने जिज्ञासेपोटी त्या संप्रदायाच्या विक्री केंद्रातून कागदी लगद्यापासून बनवलेल्या दोन गणेशमूर्ती विकत घेणे; पण विक्रेत्याने त्या मूर्तींचे देयक न देणे : या संप्रदायाच्या वतीने कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तींचे प्रदर्शन आणि विक्री केंद्र उभारले होते. तेथे जाऊन जिज्ञासेपोटी मी दोन गणेशमूर्ती विकत घेतल्या. मी त्यांच्याकडून देयकाची मागणी केल्यानंतर त्यांनी देयक देण्यास नकार दिला. त्यांचे हे वागणे मला खटकले.
१ आ. कागदी लगद्याची मूर्ती मातीच्या मूर्तीपेक्षा स्वस्त असायला हवी; परंतु प्रत्यक्षात तिची किंमत मातीच्या मूर्तीएवढीच असणे : मी विकत घेतलेल्या मूर्तींपैकी छोट्या मूर्तीचे मूल्य ५०० रुपये, तर मोठ्या मूर्तीचे मूल्य १ सहस्र रुपये होते. त्याच आकाराच्या मातीच्या मूर्तीही साधारण तेवढ्याच किमतीला मिळतात. कागदी लगदा मातीपेक्षा स्वस्त असतो आणि त्यापासून मूर्ती बनवण्यासाठी लागणारे श्रम, हे मातीची मूर्ती बनवण्यासाठी लागणार्या श्रमाच्या तुलनेत अल्प असतात. असे असूनही कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींची किंमत मात्र मातीच्या मूर्तींपेक्षा अधिक होती, म्हणजे मूर्तीविक्रेता अधिक नफा मिळवत होता. यामुळे मला वाटले, ‘केवळ कागदी लगदा विकल्यास मिळणार्या किमतीपेक्षा त्याच लगद्यापासून गणेशमूर्ती बनवल्यास कित्येक पट अधिक किंमत मिळते’, हे आर्थिक गणित जाणून त्यापासून लाभ मिळवू इच्छिणार्यांनी कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती वापरण्यास प्रोत्साहन दिले असेल का ? ‘उपासकांना आध्यात्मिक लाभ मिळू न देणे आणि काही जणांना आर्थिक लाभ मिळवून देणे’, हा त्यांचा उद्देश आहे का ?’
१ इ. मूर्तीविक्रेत्याने सनातनवर अभ्यासशून्य टीका करणे आणि एका संप्रदायाच्या प्रमुखाचे नाव पुढे करून स्वतःच्या धर्मशास्त्रविरोधी कृतीचे समर्थन करणे : त्या मूर्ती विकत घेतांना त्या संप्रदायाच्या विक्रेत्याशी माझे पुढील संभाषण झाले.
मी : ‘कागदी लगद्याच्या मूर्ती पूजेत वापरणे धर्मशास्त्रानुसार योग्य नाही’, असे मी ऐकले आहे.
मूर्तीविक्रेता : तसे सनातनवाले (सनातन संस्थेचे साधक) सांगतात. (‘धर्मशास्त्रानुसार श्री गणेशाची मूर्ती कशी असावी ?’, याविषयी संक्षिप्त माहिती या लेखातील सूत्र ‘२ अ’ मध्ये, तसेच विस्तृत माहिती सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’ यामध्ये दिली आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) प्रत्यक्षात तसे काही नाही. आम्ही ** (संप्रदायाच्या प्रमुखाचे नाव घेऊन) सांगणार, तेच करणार. पुढे काय होईल, ते **च (संप्रदायाच्या प्रमुखाचे नाव) बघून घेतील.
त्या विक्रेत्याचे उत्तर ऐकून माझ्या मनात विचार आला, ‘धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे उपासक श्री गणेशचतुर्थीला नवीन गणेशमूर्तीचे पूजन करतात. असे असतांना हा विक्रेता धर्मशास्त्राच्या विरुद्ध वागत आहे आणि पुढे काही झाले, तर ‘** (संप्रदायाच्या प्रमुखाचे नाव) पाहून घेतील’, असे म्हणत आहे. हा ‘अंधविश्वास’ नाही का ?’
१ ई. मूर्तीसाठी कागदाचा लगदा नव्हे, तर कागद वापरलेला आढळणे : कागदी लगद्यापासून मूर्ती बनवतांना कागदाचा लगदा वापरला जातो, कागद नव्हे; परंतु या संप्रदायाकडून विकत घेतलेल्या मूर्तींच्या आतील बाजूस वर्तमानपत्राचा कागद चिकटवलेला आढळून आला. त्यावरील अक्षरे दिसत होती. जर कागदाचा लगदा वापरला असता, तर त्यात कागदावरील अक्षरे दिसली नसती.
१ उ. कागदासह खडूच्या पावडरचा वापर केलेला असणे : या मूर्तीचे अधिक निरीक्षण केल्यानंतर लक्षात आले, ‘ही मूर्ती बनवतांना खडूच्या पावडरचाही वापर केला आहे.’ खडूची पावडर ही ‘जिप्सम’ची म्हणजे ‘प्लास्टर ऑफ पॅरिसचा’च एक प्रकार आहे.
१ ऊ. कागदी लगद्याची मूर्ती नाजूक असल्याचे कळल्याने आश्चर्य वाटणे : कागदाची मूर्ती ही मातीच्या मूर्तीपेक्षा मजबूत असते; पण या संप्रदायाच्या विक्रेत्याने ‘ही मूर्ती नाजूक असून
ती मातीच्या मूर्तीप्रमाणे काळजीपूर्वक हाताळावी’, असे सांगितल्याने मूर्तीसाठी वापरलेल्या घटकांविषयी माझ्या मनात साशंकता निर्माण झाली.’
– एका राज्यातील एक मूर्तीकार
२. उपासकांनी कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती पूजेसाठी वापरणे का अयोग्य आहे ?
२ अ. आध्यात्मिक कारण : अध्यात्मशास्त्रदृष्ट्या कागदी लगदा हा असात्त्विक घटक आहे, तसेच कागदी लगद्याची गणेशमूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी आहे. अशा मूर्तीकडे श्री गणेशाची पवित्रके आकर्षिली जात नाहीत. त्यामुळे अशा मूर्तींच्या पूजनाने उपासकांना पूजनाचा जो आध्यात्मिक लाभ मिळायला हवा, तो मिळू शकत नाही.
याउलट चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून शास्त्रानुसार बनवलेली गणेशमूर्ती पूजेसाठी वापरणे आध्यात्मिकदृष्ट्या सर्वाधिक लाभदायक आहे. ही मूर्ती आकाराने लहान (एक ते दीड फूट उंच), पाटावर बसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. (संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गणपति – खंड १’)
२ आ. पर्यावरणाशी संबंधित कारण : वरील आध्यात्मिक कारणच कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती न वापरण्यास पुरेसे आहे; परंतु ‘अध्यात्मशास्त्राविषयी गांभीर्य नसणारे; पण पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी जागरूक असणारे यांचा ‘कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती वापरून जलप्रदूषण टाळूया’, असा समज असेल, तर तो चुकीचा आहे’, हे पुढील उदाहरणांतून लक्षात येईल.
२ आ १. कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींमुळे जलप्रदूषण होत असल्याचे सांगून ‘राष्ट्रीय हरित लवादा’कडून संबंधित शासन निर्णयास स्थगिती ! : ‘महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने ३.५.२०११ या दिवशी ‘कागदी लगद्यापासून बनलेल्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन मिळावे, तसेच अशा प्रकारच्या मूर्ती सर्वत्र उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पुढाकार घ्यावा अथवा तसे करणार्यांना विशेष सवलत द्यावी’, अशा आशयाचा आदेश काढला. शासनाच्या या आदेशाला ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’ने ‘राष्ट्रीय हरित लवाद, पुणे’ यांच्यासमोर आव्हान दिले. लवादाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर ‘कागदी लगद्याच्या मूर्तींमुळे जलप्रदूषण होते. शासनाने असे अभ्यासहीन काम करणे चुकीचे आहे’, असे सांगत शासनाच्या आदेशाचा तो भाग स्थगित केला आहे.’ – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद. (सप्टेंबर २०१६)
२ आ २. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही शाडूच्या मातीची गणेशमूर्ती वापरण्याचे आवाहन ! : ‘काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात गणेशोत्सव साजरा करण्याच्या संदर्भात प्रबोधन करतांना सांगितले, ‘‘शाडूच्या मातीची मूर्ती वापरून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा !’’
(संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, ५.९.२०१६)’
स्रोत : दैनिक सनातन प्रभात