Menu Close

अमरावती, वणी आणि यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

अमरावती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ सप्टेंबर या दिवशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या आंदोलनामध्ये सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा आणि नक्षलवाद्यांच्या समर्थकांना विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आदी म्हणणार्‍यांचाही निषेध करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे, सौ. अनुभूती टवलारे, तसेच सनातन संस्थेच्या सौ. विभा चौधरी यांनी त्यांचे विचार मांडले. या वेळी ४५ धर्मप्रेमी उपस्थित होते. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ५ सहस्र २०० धर्मप्रेमींनी आंदोलनाचा लाभ घेतला.

क्षणचित्र : एक पायाने अपंग व्यक्ती तीनचाकी सायकल चालवत आंदोलन स्थळी येऊन विषय आवडल्याने सायकलसहित फलक धरून आंदोलनात पूर्णवेळ सहभागी झाली आणि ‘यापुढेही जमेल तसे कार्यात येईन’, असे ते म्हणाले.

वणी (यवतमाळ)

वणी (यवतमाळ) : येथील तहसील चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात श्रीराम गोरक्षण, योग वेदांत समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांसह ३० जणांचा प्रत्यक्ष, तर २७५ जणांनी निवेदनांवर स्वाक्षरी करून धर्मरक्षणाच्या कार्यात सहभाग घेतला.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. लोभेश्‍वर टोंगे म्हणाले की, नक्षलवादी आणि देशद्रोही यांचे समर्थन करणारे तथाकथित बुद्धीजीवी, विचारवंत, पुरोगामी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी. नक्षल समर्थक म्हणजे नक्षलवादीच आहेत. त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे.

समितीचे श्री. लहू खामणकर या वेळी म्हणाले की, प्रशासनाने हिंदुत्वनिष्ठांचा हेणारा नाहक छळ थांबवावा.

क्षणचित्र : गुप्तवार्ता पोलिसांनी आंदोलनाचे चित्रीकरण केले आणि छायाचित्रे घेतली.

यवतमाळ

यवतमाळ येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप !

राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांवर संशय घेणार्‍या पोलिसांनी धर्मांधांवर एवढे लक्ष कधी ठेवले आहे का ?

यवतमाळ : सनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि नक्षलवाद्यांचे समर्थन करणार्‍यांचा निषेध करण्याकरिता विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने स्थानिक पोस्टल ग्राउंडच्या बाजूला तिरंगा चौक, येथे सायंकाळी ४ ते ६ या वेळेमध्ये राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. मनोज औदार्य, वैदिक ब्राह्मण संघटनेचे श्री. राम साखरे, युवा सेवा संघाचे श्री. गणेश साठे आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समितीचे ४० कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाला ४०० हून अधिक जिज्ञासूंनी स्वाक्षरीद्वारे पाठिंबा दिला. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे.

कुठल्याही प्रकारची संवेदनशील परिस्थिती नसतांना या आंदोलनस्थळी प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. त्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा, शहर पोलीस, दामिनी पथक इत्यादी २५ ते ३० पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता.

क्षणचित्रे

१. गोपनीय शाखेच्या २ कर्मचार्‍यांनी संपूर्ण आंदोलनाचे चित्रीकरण केले. पोलिसांच्या गाडीवर कॅमेरा दिसत होता. आंदोलनस्थळी दोन पोलिसांच्या गाड्या होत्या.

२. आंदोलनाच्या वेळी गोपनीय शाखेचे कर्मचारी आंदोलनातील निवेदनाच्या प्रती सातत्याने मागत होते.

३. आंदोलनाचे निवेदन कोणाला आणि केव्हा देणार आहे, याची विचारणा गोपनीय शाखेचे कर्मचारी करत होते.

४. आंदोलनाला दोन पत्रकार आणि दोन वृत्तवाहिन्या यांचे प्रतिनिधी आले होते.

या आंदोलनांत करण्यात आलेल्या मागण्या !

१. व्यक्तीस्वातंत्र्याचा आधार घेऊन नक्षलवाद्यांचे समर्थन, देशविरोधी भाषणे करणारे, घोषणा देणारे, त्यांना आर्थिक आणि अन्य प्रकारे साहाय्य करणारे आदींवर कडक कारवाई करणारा कायदा बनवावा आणि त्याची प्रभावी कार्यवाही करावी.

२. ज्या राजकीय नेत्यांनी नक्षलसमर्थक नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना समर्थन दिले, अशा नेत्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, तसेच ज्या ज्या पक्षांनी नक्षल समर्थकांसाठी उघड उघड समर्थन दर्शवणारी भूमिका घेतली, त्यांचीही नोंदणी रहित करावी.

३. सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे देशभरात सक्रीय सदस्य, जंगलांत लपून बसलेले नक्षलवादी, तसेच शहरी नक्षलवादाला खतपाणी घालणार्‍या सर्वांची पाळेमुळे खणून ती नष्ट करावी.

४. सैन्य आणि पोलीस यांच्यावर आक्रमण करून नवी व्यवस्था उभारणीसाठीचा प्रयत्न हा देशद्रोह आहे. अशा सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा लावावा आणि नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी सैन्य आणि पोलीस यांना सर्वाधिकार द्यावेत.

५. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना लक्ष्य करणार्‍या षड्यंत्राचे अन्वेषण करून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी.

६. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांवर बंदी घालण्याविषयी अनाठायी मागण्या होत आहेत. अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास तो फेटाळण्यात यावा.

७. खटला बारगळवून हिंदुत्वनिष्ठांना नाहक कारावास भोगावा लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची सुनावणी ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात करावी. ज्या अधिकार्‍यांनी ही सुनावणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न केला, त्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *