शिकागो (अमेरिका) येथील विश्व हिंदू संमेलन
‘विश्व हिंदू संमेलनामध्ये हिंदूंवरील आघात मांडण्यात आल्यावर त्यावर हिंदूंच्या सर्व संघटना काय उपाययोजना काढणार आहेत’, हे त्यांनी हिंदूंना सांगितले पाहिजे ! त्यामुळे पीडित हिंदूंना आधार वाटेल !
शिकागो (अमेरिका) : श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ, तसेच हिंदु समाज आणि मंदिरे यांचे रक्षण करणार्या शिवसेनाई संघटनेचे संस्थापक आणि ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. मरवनपुलावु सच्चिदानंदन् हे ८ सप्टेंबरपासून शिकागो येथे चालू झालेल्या विश्व हिंदू संमेलनाच्या ‘राजकीय हिंदु’ या सत्रात सहभागी झाले होते. या सत्रात ‘पॉवर प्रेझेन्टेशन’चा वापर करून श्री. सच्चिदानंदन् यांनी श्रीलंकेतील हिंदु धर्म, मंदिरे आणि हिंदू यांच्यावर तेथील बौद्ध, ख्रिस्ती आणि मुसलमान या तिन्हींकडून होणार्या आक्रमणामुळे उत्पन्न झालेल्या दयनीय स्थितीचे यथार्थ वर्णन केले. या आक्रमणामुळे श्रीलंकेतील बहुसंख्य असलेली हिंदूंची लोकसंख्या आता १५ ते २० टक्क्यांपर्यंत खाली घसरली आहे. या उलट तेथील बौद्ध, ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या लोकसंख्येत वाढ होत आहे, असे त्यांनी सांगितले. या संमेलनात उपस्थित असलेल्या ६० देशांतील २ सहस्र ५०० हिंदु प्रतिनिधींनी श्री. सच्चिदानंदन् यांच्या भाषणाची प्रशंसा केली. (श्री. सच्चिदानंदन् हे ७८ वर्षांचे आहेत. असे असतांनाही ते या वयातही श्रीलंकेतील हिंदूंसाठी झटतात. इतरत्रच्या हिंदूंनी त्यांच्याकडून हे शिकण्यासारखे आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
काही जणांकडून ‘हिंदु’ शब्दाला अस्पृश्य ठरवण्याचे प्रयत्न ! – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
शिकागो (अमेरिका) : सध्या काही लोकांकडून ‘हिंदु’ शब्दाला अस्पृश्य ठरवण्याचे प्रयत्न चालू आहेत. लोकांनी त्यांचे विचार योग्यपणे मांडायला हवेत. त्यामुळे प्रामाणिक दृष्टीकोन जगासमोर येईल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे आयोजित विश्व हिंदु संमेलनात केले. नायडू पुढे म्हणाले, ‘‘हिंदु धर्मातील खर्या मूल्यांच्या संरक्षणाची आवश्यकता आहे. सर्व गोष्टी एकमेकांशी वाटून घेणे आणि एकमेकांची काळजी घेणे ही हिंदु धर्माची मूळ तत्त्वे आहेत. सध्या हिंदु धर्माविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात