महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत समाजसेवेच्या संदर्भात सादर केलेला शोधनिबंध सर्वोत्कृष्ट असल्याचे घोषित !
साऊथ कॅरोलिना (अमेरिका) : ८ ते १० सप्टेंबर २०१८ या कालावधीत साऊथ कॅरोलिना, अमेरिका येथे संपन्न झालेल्या ‘ज्ञान, साहित्य आणि संस्कृती’ या विषयावरील ७ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’ या विषयावरील सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा शोधनिबंध सर्वोत्कृष्ट म्हणून घोषित करण्यात आला. श्री. कृष्ण मंडावा आणि श्री. शॉन क्लार्क हे या शोधनिबंधाचे सहलेखक आहेत. आंतरराष्ट्रीय आर्थिक विकास आणि संशोधन केंद्र, हाँगकाँग हे या परिषदेचे आयोजक होते.
शोधनिबंध मांडतांना श्री. मंडावा म्हणाले, ‘‘अलीकडच्या काळात समाजसेवेच्या क्षेत्रात अध्यात्म आणि धर्म यांविषयी संवेदनशील राहून त्यांचा समावेश करण्याकडे कल वाढत आहे. याचा अर्थ ‘समाजसेवक, तसेच ते ज्यांची सेवा करतात त्या व्यक्ती, यांच्या धर्म आणि आध्यात्मिक श्रद्धा यांविषयी संवेदनशील असणे’, असा आहे.’’ ‘अध्यात्म आणि समाजसेवा यांचा काय संबंध आहे ?’, ‘समाजसेवा हे आध्यात्मिक उन्नती करण्याचे प्रभावी माध्यम आहे का ?’ या प्रश्नांना उत्तरे देतांना ‘आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य, हेच खरे साहाय्य असते’, असे श्री. मंडावा यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात