कोल्हापूर येथे गणेशोत्सव विसर्जन मोहिमेत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांना पूर्ण सहकार्य करू ! – आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मोहिमेत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था येथील पंचगंगा घाटावर राबवणार असलेल्या उपक्रमांना पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी येथे दिले. सांडपाणी अन् घनकचरा यांद्वारे होणार्या भयंकर प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून प्रशासनाद्वारे वर्षातून एकदाच येणार्या गणेशोत्सवातील कथित प्रदूषणाविषयी ‘कृत्रिम तलाव’, ‘गणेशमूर्तीदान’ आणि ‘कागदी लगद्याची गणेशमूर्ती’ या चुकीच्या संकल्पना राबवून त्याद्वारे होत असलेली गणेशमूर्तींची विटंबना, तसेच जलप्रदूषण त्वरित थांबवण्यात यावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांना नुकतेच देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
मागील वर्षीही पंचगंगा घाटावर ‘मूर्ती दान नको, तर वहात्या पाण्यात मूर्तीचे विर्सजन करा’, असे आवाहन करण्यासाठी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्या सौजन्याने ‘हिंदु धर्मरक्षक संघटन’ नावाने व्यासपीठ उभे केले होते. या व्यासपिठाच्या शेजारी ‘वाहत्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करा’, असे आवाहन करणारे शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर आणि सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या नावाचे होर्डिंग्ज फलक लावण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर आमदार श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले की, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोहीम आणखी चांगल्या प्रकारे राबवू. माझ्याकडून विद्युत् जनित्र आणि हॅलोजनचे दिवे वापरण्यासाठी दिले जातील. माझ्या वतीने पंचगंगा घाटावर ‘हिंदु धर्मरक्षक संघटन’ नावाने व्यासपीठ उभे केले जाईल.
फलक लावण्यासाठी तेथे मंडप उभा करून देण्याची मागणी मान्य करून ‘मंडप उभा करून देतो’, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. श्री. क्षीरसागर यांनी प्रतिवर्षी ही मोहीम राबवत असल्याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे कौतुकही केले.