सानपाडा (नवी मुंबई) – ८ सप्टेंबर या दिवशी नक्षलवादाचे समर्थन करणार्यांना विरोध करणे आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर होणारे आरोप यांना विरोध करणे या उद्देशाने येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन चालू होते. आंदोलन चालू असतांना एका पोलिसाने हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याला बोलावले आणि चौकशी करण्यास आरंभ करून त्याच्यावर दबाव टाकण्याचा आणि त्याला राष्ट्रकार्य तसेच आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
नेहमीप्रमाणे आंदोलनासाठी लागणार्या सर्व आवश्यक त्या अनुमती घेऊन हिंदु जनजागृती समितीने सानपाडा येथे आंदोलन चालू केले. आंदोलनाला पंधरा जण उपस्थित होते. आंदोलन चालू झाल्यानंतर काहीच वेळात तेथे १५ ते २० पोलिसांचा फौज फाटा त्यांच्या वाहनांसह आला. काही पोलीस गणवेषात, तर काही साध्या गणवेषात आंदोलनाच्या आजूबाजूला उभे राहून ध्वनीमुद्रण करत होते. या वेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची चौकशी केली. हिंदु जनजागृती समितीचा एक कार्यकर्ता आणि पोलीस यांच्यात पुढील संवाद झाले.
पोलीस – कधीपासून सनातन ‘जॉईन’ केले आहे ?
कार्यकर्ता – हे राष्ट्रीय हिंदू आंदोलन आहे. सनातन संस्थेचे नाही.
पोलीस – मग तुम्ही तर सनातनला ‘सपोर्ट’ (साहाय्य) करत आहात.
कार्यकर्ता – आम्ही इथे हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संस्था यांवर होणारे आघात यांचा विरोध करण्यासाठी आलो आहोत. सनातनचे कार्य पहाता त्यांना ‘सपोर्ट’ करणे आम्हाला योग्य वाटते.
पोलीस – तुम्ही सनातनचा झेंडा का नाही वापरत ?
कार्यकर्ता – सनातनचा झेंडा वगैरे असे काही नाही. हे राष्ट्रीय हिंदू आंदोलन आहे आणि हा भगवा ध्वज आम्ही हिंदुत्वाचा ध्वज म्हणून वापरतो.
पोलीस – काही कामधंदा करतोस कि नाही ?
कार्यकर्ता – हो. मी एका खासगी आस्थापनात कामाला आहे. काम सांभाळून उरलेला वेळ देव-धर्माच्या कार्यात आम्ही देतो.
पोलीस – हे सगळे सोडा आणि आपल्या काम धंद्यावर लक्ष द्या. नाहीतर सुक्याबरोबर ओले पण जळेल.
कार्यकर्ता – देवा-धर्माचे देशाचे कार्य करणे गुन्हा असेल, तर मी सर्व भोगायला सिद्ध आहे. (असे धर्माभिमानी कार्यकर्ते हीच हिंदु राष्ट्राची शक्ती आहेत ! – संपादक)
पोलीस – ठीक आहे भेटूच.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात