वाराणसी – राष्ट्र आणि धर्म हानी रोखण्यासाठी अधिवक्ता त्यांचे कर्तव्य बजावू शकतात, या उद्देशाने उत्तरप्रदेशातील वाराणसी, चंदौली आणि गाजीपूर या जिल्ह्यांमध्ये हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि हिंदु जनजागृती समितीचे वाराणसी समन्वयक श्री. राजन केशरी अन् श्री. नीलय पाठक यांनी अधिवक्त्यांच्या भेटीगाठी घेऊन बैठका घेण्याचा प्रयत्न केला.
१. वाराणसी न्यायालयातील बाबा विश्वनाथ चेम्बरचे अधिवक्ता आणि नागरिक उत्थान सेवा समितीचे अध्यक्ष अवनीश राय, तसेच ‘इंडिया विथ विजडम’चे अध्यक्ष अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये १३ अधिवक्ता सहभागी झाले होते. या वेळी अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी राष्ट्र आणि धर्म हानी रोखण्यासाठी अधिवक्ता काय करू शकतात, याची माहिती दिली. त्यावर अधिवक्ता अवनीश राय यांनी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. राय यांनी सीतापूर जिल्ह्यामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ‘यादव शक्ती’ नियतकालिकामध्ये देवतांचा अवमान केल्यावरून गुन्हा प्रविष्ट केल्याची माहिती दिली. यात गायत्री मंत्राचा अश्लील अनुवाद करून प्रसिद्ध करण्यात आला होता. अधिवक्ता सांगोलकर यांनी मांडलेला विषय ऐकल्यावर उपस्थित अधिवक्त्यांनी या कार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली.
२. वाराणसी न्यायालयातील सेन्ट्रल बार असोसिएशनमध्ये बनारस बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अधिवक्ता संजीवन यादव यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये १९ अधिवक्ता सहभागी झाले होते. अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी (काशी हिंदु विश्वविद्यालयाने अधिवक्ता यादव यांना ‘ग्रीन बॉय’ अशी उपाधी देऊन सन्मानित केले आहे. त्यांनी स्वतः १ लाख वृक्ष लावले आहेत. त्यांची स्वतःची २ जंगले आहेत.) हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘तुमच्या कार्यात सहभागी झालो, तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. हिंदुत्वाचे कार्य करणे आज पुष्कळ आवश्यक आहे.’’
३. चंदौली न्यायालयातील अधिवक्ता चंद्रमौली उपाध्याय म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या ध्येयामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल; कारण संपूर्ण जग अध्यात्माकडे जात आहे आणि ते तुमच्याकडे आहे. समाजातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे (अध्यात्माकडे) आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. पुढच्या वेळी मी एखादा कार्यक्रम आयोजित करीन.’’
४. सकलडीहा तालुक्यातील प्रसिद्ध अधिवक्ता आणि युवा जन मोर्चाचे अध्यक्ष शैलेन्द्र पांडेय भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्य करतात. ते म्हणाले, ‘‘ज्या विषयावर माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करायचा असेल, तेव्हा येथे आम्ही आवश्यक ते साहाय्य करू आणि तुमच्या कार्यात सहभागी होऊ.’’
५. गाजीपूर न्यायालयातील अधिवक्ता अजय सिन्हा आणि अधिवक्ता शक्ती सिंह व्यस्त असूनही त्यांनी अन्य अधिवक्तांशी भेट घालून दिली. तसेच जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची संपर्क करून दिला.